आदिवासी विकास मंत्रालय
डिजिटल उद्यमशीलतेच्या माध्यमातून आदिवासी समुदायांच्या उत्थानासाठी GOAL (ऑनलाईन माध्यमातून नेतृत्व विकास) या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात
प्रविष्टि तिथि:
28 JUN 2022 9:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जून 2022
आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी आज त्यांच्या मंत्रालयाच्या जीओएएल म्हणजेच ऑनलाईन माध्यमातून नेतृत्व विकास (गोइंग ऑनलाईन अॅज लिडर्स) अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात केली. आदिवासी विकास मंत्रालय आणि मेटा(फेसबुक) यांनी संयुक्तपणे हे अभियान सुरू केले आहे. जीओएएल- 2.0 या उपक्रमाचा उद्देश, 10 लाख आदिवासी युवकांना डिजिटल माध्यमातून अपस्कील म्हणजेच कौशल्य वाढवत, त्यांच्यात उद्यमशीलतेला चालना देणे हा आहे. तसेच यामुळे, डिजिटल तंत्रज्ञानासाठीच्या सर्व संधी त्यांच्यासाठी खुल्या होणार आहेत.

या GOAL कार्यक्रमाद्वारे विकसित होणारे लोक त्यांच्या समाजाला नेतृत्व देत असून हा कार्यक्रम एक मूक क्रांती ठरत आहे, असे मुंडा यावेळी म्हणाले. आदिवासी समुदायांना सशक्त करण्यासाठी आमच्या समुदायांकडे असलेले मूळ स्त्रोत आता आधुनिक साधनांसह वापरता येतील, असेही मुंडा यांनी सांगितले.

लोकांना या साधनांशी जोडणे आणि कौशल्य, क्षमता विकसित करणे आणि त्यांच्या समुदायाच्या जीवनात बदल घडवणे - ही या उपक्रमाची मूलभूत उद्दिष्टे आहेत, असेही मुंडा यांनी पुन्हा सांगितले. ही अतिशय महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे आहेत आणि 10 लाख लोकांपर्यंत थेट पोहोचणे आणि त्यांच्याद्वारे आणखी अनेक लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना सक्षम करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.

या उपक्रमात सहभागी होणाऱ्या GOAL प्रतिनिधींना मेटा बिझनेस कोचमध्ये प्रवेश मिळेल - व्हाट्स अॅप आधारित लर्निंग बॉट - जे या सहभागी युवकांना फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्स अॅप या सोशल मीडियाचा वापर करून त्यांचा व्यवसाय कसा उभा करायचा आणि वाढवायचा याची कौशल्ये शिकण्याची संधी त्यांना मिळू शकेल.

आदिवासी समुदायातील तरुण आणि महिलांना डिजिटल प्लॅटफॉर्मच्या पूर्ण क्षमतेचा वापर करून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे, तसेच, आदिवासी समुदायाच्या विकासाला चालना देण्यासाठी त्यांचे नेतृत्व कौशल्य वाढवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. डिजिटल समावेशासोबतच, आदिवासी जिल्ह्यातल्या सर्वात दुर्बल समुदायांचे आदिवासी तरुण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांवर लक्ष केंद्रित करून त्यांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणे, हा ही या उपक्रमाचा उद्देश आहे.
* * *
N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1837758)
आगंतुक पटल : 219