शिक्षण मंत्रालय

धर्मेंद्र प्रधान यांनी इंडिया टुडे शिक्षण परिषद 2022 ला संबोधित केले

Posted On: 28 JUN 2022 5:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जून 2022

 

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री  धर्मेंद्र प्रधान यांनी आज इंडिया टुडे शिक्षण परिषद  2022 ला संबोधित केले.

उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आणि आपल्या मोठ्या लोकसंख्येला औपचारिक शिक्षण आणि प्रमाणित कौशल्य संरचनेअंतर्गत आणण्यासाठी अभिनव  आणि चाकोरीबाहेरच्या पद्धतींचा अवलंब करण्याची गरज व्यक्त केली.

सुगम्यतेबद्दल बोलताना ते म्हणाले की, सर्वांना शिक्षण  सहज उपलब्ध करण्यासाठी मजबूत आणि लवचिक यंत्रणा निर्माण करण्याला  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्राधान्य आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण  2020 च्या धर्तीवर तंत्रज्ञान-प्रणित  दृष्टीकोन आणि डिजिटल विद्यापीठ  सारखे उपक्रम सर्वांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी बोलताना ते म्हणाले की,या  धोरणाने  प्रत्येक विद्यार्थ्याच्या अगदी बालवयातील शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि एक उत्साही  आणि भेदभावरहित ज्ञान समाज निर्माण करण्याची  दूरदृष्टी आणि मार्ग आखून दिला आहे. रोजगारक्षमता वाढवण्यासाठी आम्ही  शालेय आणि उच्च शिक्षणामध्ये कौशल्य शिक्षण समाविष्ट  करण्याचे काम करत आहोत, असे ते पुढे म्हणाले.

रोजगार आणि कौशल्याच्या भवितव्याविषयी ते म्हणाले की, नोकऱ्यांचे स्वरूप बदलत आहे आणि IR 4.0  आपल्या विशाल लोकसंख्येच्या  कौशल्य विकासाचे  आव्हान आणि संधी आपल्यासमोर  सादर करते. आपण कौशल्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला पाहिजे आणि IR 4.0 चा वापर करण्यासाठी तसेच आपल्या तरुणांना भविष्यासाठी तयार करण्याच्य दृष्टीने ते अधिक महत्त्वाकांक्षी बनवले पाहिजे.

ते म्हणाले  की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आपल्या  विद्यार्थ्यांना आणि तरुणांना नव्या  युगातील कल्पना आणि कौशल्ये असलेले जागतिक नागरिक म्हणून विकसित करण्यासाठी अभ्यासक्रम आखते . तसेच भारताला 21 व्या शतकाची ज्ञान अर्थव्यवस्था बनवण्यासाठी  भारतीय भाषांमध्ये शिक्षण घेण्यास प्राधान्य देते.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1837645) Visitor Counter : 147