जलशक्ती मंत्रालय

यशोगाथा: मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन (MHM) आता स्वच्छ भारत अभियान ग्रामीणमध्ये


मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापनात पथदर्शी पुढाकार

Posted On: 28 JUN 2022 4:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जून 2022

 

युनिसेफच्या सहाय्याने गडचिरोली जिल्हा प्रशासनाने मुली आणि महिलांना मासिक पाळीदरम्यान कुर्मा घर किंवा ‘पाळी झोपडीत’ पाठविण्याच्या क्रूर पद्धतीचे टप्प्याटप्प्याने निर्मूलन करण्यासाठी एक ‘मूक क्रांती’ सुरु केली. 

गोंड आणि माडिया जमातींच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याचा आणि या जमातींतील किशोरावस्थेतील मुली आणि महिलांना मासिक पाळीदरम्यान सोसाव्या लागणाऱ्या अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक निर्बंधांचा होणारा त्रास संपवण्याचा, जिल्हा प्रशासनाने 2018 पासून निर्धार केला. या प्रयत्नांना आता यश येत आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001VMED.jpg

कुर्मा घरांच्या ऐवजी, अधिक सुरक्षित महिला विसावा केंद्रे बनविण्यात येत आहेत. यात शौचालय, न्हाणीघर, हात धुण्यासाठी साबण, नळाद्वारे पाणी तसेच स्वयंपाकाच्या सोयी आहेत. इथे महिलांच्या वास्तव्यादरम्यान या महिला, बचत गटांच्या कामात सहभाग घेऊ शकतात किंवा या केंद्रांत वाचनालय, शिलाई मशीन, परसबाग अशा सोयी असल्याने, त्यांच्या आवडीची इतर कामे करू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे, या ठिकाणी मुली आणि महिलांना मोकळ्या वातावरणात मासिक पाळीदरम्यान सन्मानाने जगता येते.

हा बदल घडवून आणण्यासाठी, ही प्रथा बंद करण्यासाठी आणि मानसिकतेत अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी एका मोहिमेची गरज होती. महिलांनी स्वतः यासाठी पुढाकार घेतला आणि या बदलासाठी त्यांना अंतःकरणातून प्रेरणा मिळाली. यासाठी मुलींना आणि तरुण महिलांना क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण देण्याची गरज होती. ज्यामुळे मासिक पाळीदरम्यान घराबाहेर जाण्याच्या पारंपारिक पद्धतीला विरोध करण्यासाठी आणि मासिक पाळीचे जीवशास्त्रीय महत्व समजावून सांगण्यासाठी तसेच सुरक्षित मासिक पाळी व्यवस्थापन पद्धती याबाबत माहिती सत्रे आयोजित करण्यात आली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002RNFV.jpg

जिल्हा नियोजन विकास समितीने सुरवातील अशा प्रकारची 23 केंद्रे बांधली, त्यानंतर आकांक्षी जिल्हा कार्यक्रम तसेच PESA अंतर्गत विशेष मध्यवर्ती सहाय्य निधी उभारण्यात आला, त्या सोबतच UMED-MSRLM (राज्य ग्रामीण उपजीविका अभियान) अंतर्गत बचत गटांमार्फत महिलांचे श्रम योगदान याचा यात समावेश आहे. या महिला विसावा केंद्रांचे स्थापत्यशास्त्र आणि तेथे पुरविण्यात आलेल्या सुविधा स्थानिक गृहनिर्माण पद्धती आणि प्रकारांशी सुसंगत अशा आहेत. येत्या दोन वर्षांत 400 केंद्रे उभारण्याचा आणि या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे.

 

आधी आणि नंतर

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0030JY7.jpg

 

स्वच्छ भारत अभियान-ग्रामीण मध्ये मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन:

खरे तर, मासिक पाळी स्वच्छत व्यवस्थापन ही गोष्ट केवळ स्वच्छतेशी संबंधित नाही.

लहान मुलींच्या आरोग्याचे रक्षण करतांनाच त्यांची प्रतिष्ठा जपणे आणि त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नवे आयुष्य देणारे हे एक महत्वाचे पाऊल आहे. यामुळे, लैंगिकदृष्ट्या समतोल जगाची निर्मिती साध्य  होण्यासाठी  मदत होणार आहे.

या अत्यंत महत्वाच्या पैलूचा विचार करुन हा, केंद्र सरकारचा पथदर्शी कार्यक्रम स्वच्छ भारत अभियान-ग्रामीण मध्ये एक महत्वाचा घटक म्हणून मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापनाचा समावेश करण्यात आला आहे. या पैलूमुळे, प्रत्येक घरात आणि शाळांमध्ये शौचालय बांधण्याची गरज अधोरेखित होते. कारण, स्वच्छतागृहे, मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनाचे अविभाज्य अंग असून, त्यातून सुरक्षित मासिक पाळी स्वच्छता साधनांचा/पद्धतींचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळू शकेल. यातून कौशल्य विकास आणि सॅनिटरी नॅपकिन्सची योग्य विल्हेवाट लावणे, शाळांमध्ये आणि सार्वजनिक स्वच्छतागृहात त्यांच्या ज्वलनाची व्यवस्था यासारख्या उपायांची आवश्यकताही अभिप्रेत  आहे.  

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004235P.png

सर्व किशोरवयीन मुली आणि महिलांना मदत व्हावी, या हेतूने, पेयजल आणि स्वच्छता विभागाने मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापनविषयक मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, त्यानुसार, राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन, महत्वाच्या विभागातील अभियंते आणि तंत्रज्ञ, तसेच शाळाप्रमुख आणि शिक्षकांनी काय काय करणे अपेक्षित आहे, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियान- ग्रामीण कार्यक्रमाअंतर्गत, आयईसी घटकांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनाविषयी जनजागृती आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी हा निधी वापरला जाणार असून, स्वयंसहाय्यता बचत गटांच्या मदतीने ही मोहीम चालवली जाणार आहे.

या अनुषंगाने, सर्व राज्यांनी मासिक पाळीशी संबंधित सार्वजनिक संकोच आणि गैरसमज दूर करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. किशोरवयीन मुली आणि महिलांना याबाबत स्पष्ट बोलून आपल्या शंकाकुशंकांचे निरसन करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005718T.jpg

उपक्रमांचा परिणाम: विविध राज्यात यासंदर्भात सुरु असलेल्या उपक्रमांचा परिणाम म्हणून, आज ग्रामीण भागातही मासिक पाळी बद्दल अधिक मोकळेपणाने बोलले जात आहे.महिला आणि मुलींना आज मासिक पाळीच्या काळातील स्वच्छतेचे महत्त्व समजले असून, ज्यांना शक्य आहे, अशा सगळ्या जणी सॅनिटरी नॅपकिन्स किंवा स्वच्छ कपड्यांचा वापर करत आहेत. या काळात तिसऱ्या दिवसापर्यंत स्नान न करण्याच्या, मंदिरात किंवा स्वयंपाकघरात न जाण्याच्या जुन्या पद्धतींबद्दलही मुली प्रश्न विचारू लागल्या असून, असे सगळे गैरसमज दूर केले जात आहेत. सर्व शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स जाळून नष्ट करता येतील अशी यंत्रे बसवली जात आहेत. ही पद्धत देशभरातल्या शाळा आणि घरोघरी देखील सुरू करण्याची गरज आहे. महिलांना आणि  मुलींना मासिक पाळीच्या काळातही कार्यरत राहता येईल, यासाठी इतर अनेक उपाययोजना करण्याची गरज आहे.  

सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचऱ्याची विल्हेवाट: सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही समस्या आहे कारण डिस्पोजेबल (म्हणजे एकदाच वापरुन फेकून देण्याच्या) सॅनिटरी नॅपकिन्समध्ये वापरलेले प्लास्टिक जैव-विघटनशील नसते आणि यामुळे आरोग्य आणि पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो. घनकचरा व्यवस्थापन धोरणाचा एक भाग म्हणून, आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अनेक राज्यांनी अशा कचऱ्याचे संकलन, विल्हेवाट आणि वाहतूक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. सुरक्षित आणि योग्य कचरा व्यवस्थापन उपाय ही काळाची गरज आहे.

मुली आणि स्त्रियांना यापुढे मासिक पाळीबद्दल बोलण्यास किंवा त्यांच्या शंकांचे निरसन करण्यास लाज वाटू नये. जर आपण त्यांना प्रोत्साहन दिले नाही, तर त्या जीवनाच्या विविध पैलूंपासून वंचित राहतील किंवा त्याचा परिणाम म्हणून आरोग्यावर परिणाम होईल.
 

* * *

N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1837603) Visitor Counter : 2152