शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शिक्षण मंत्रालयाकडून पहिल्यांदाच वर्ष 2018-19 आणि 2019-20 या वर्षांसाठी जिल्ह्यांचा श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांक अहवाल (PGI-D) प्रकाशित


या अहवालात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 2018-19 वर्षासाठी 725 जिल्ह्यांची तर 2019-20 वर्षासाठी 733 जिल्ह्यांची गुणात्मक क्रमवारी प्रकाशित

Posted On: 27 JUN 2022 7:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2022

 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय आणि साक्षरता विभागाने आज शैक्षणिक वर्ष 2018-19 आणि 2019-20 साठीचा श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला.यात व्यापक  विश्लेषणासाठी निर्देशांक निर्मितीद्वारे जिल्हा पातळीवर शालेय शिक्षण प्रणालीच्या कामगिरीचे  दर्जाचे मूल्यांकन करण्यात आले आहे.  

सुमारे 15 लाख शाळा, 97 लाख शिक्षक आणि विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीचे सुमारे 26 कोटी विद्यार्थी असलेली भारतीय शिक्षण प्रणाली जगातील सर्वात मोठ्या शिक्षण प्रणालीपैकी एक  आहे. शालेय आणि साक्षरता विभागाने राज्यांसाठी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (PGI) तयार केला आणि संदर्भ वर्ष 2017-18 ते 2019-20  हे धरून अहवाल जारी केला.

राज्यस्तरावरील परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स म्हणजेच  श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकाच्या यशावर आधारित, 83-निर्देशांक आधारित जिल्ह्यांसाठी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स -डिस्ट्रिक्टची रचना शालेय शिक्षणातील सर्व जिल्ह्यांच्या कामगिरीची श्रेणी देण्यासाठी केली गेली आहे. जिल्ह्यांद्वारे ऑनलाइन पोर्टलद्वारे डेटा भरला जातो. जिल्हा स्तरावरील या कामगिरी निर्देशांकामुळे राज्याच्या शिक्षण विभागांना जिल्हा स्तरावरील तफावत ओळखण्यास आणि  विकेंद्रित पद्धतीने त्यांची कामगिरी सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यांद्वारे ऑनलाइन पोर्टलद्वारे डेटा भरला जातो. 

ह्या अहवालातील निर्देशांक-निहाय कामगिरी श्रेणी, संबंधित  जिल्ह्याला  कोणत्या क्षेत्रात सुधारणा करणे आवश्यक आहे, ते क्षेत्र दर्शवते.  जिल्हास्तरीय कामगिरी श्रेणीत्मक निर्देशांकात एकसमान निकष वापरुन, सर्व जिल्ह्यांची सापेक्ष कामगिरी देण्यात आली आहे. यानुसार, जिल्ह्यांना आपल्याला नेमकी कुठे सुधारणा करायची आहे, ते नेमकेपणाने कळू शकेल आणि त्यासाठी प्रोत्साहन मिळू शकेल.

जिल्हास्तरीय  श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकाच्या –(PGI-D) रचनेत एकूण 83 निर्देशकांमध्ये 600 गुण समाविष्ट असून  त्यांची  6 श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. उदा. परिणाम,  वर्गांमधील व्यवहारांचा प्रभाव,शाळेतील  पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचे हक्क, शाळा सुरक्षा आणि बाल संरक्षण, डिजिटल शिक्षण आणि नियमन प्रक्रिया.

या श्रेणींची पुढे आणखी 12 गटात विभागणी करण्यात आली आहे. उदा., शिक्षण परिणाम आणि गुणवत्ता, प्रवेश परिणाम, शिक्षक उपलब्धता आणि व्यावसायिक विकास परिणाम, ज्ञान व्यवस्थापन,  ज्ञानग्रहण समृद्ध करणारे उपक्रम, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांचे हक्क, शाळा सुरक्षा आणि बाल संरक्षण ,डिजिटल शिक्षण, निधी अभिसरण आणि त्याचा उपयोग,  उपस्थितीवर देखरेख ठेवणारी प्रणाली आणि शाळा नेतृत्व विकास

जिल्हानिहाय कामगिरी निर्देशांकात जिल्ह्यांसाठी 10 प्रकारच्या  श्रेणी देण्यात आल्या आहेत. जसे की, सर्वोच्च साध्य करण्यायोग्य श्रेणी म्हणजे ‘दक्ष’,जो त्या श्रेणीतील किंवा एकूण गुणांच्या 90% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या जिल्ह्यांसाठी आहे. जिल्हास्तरीय श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकामधील सर्वात कमी श्रेणीला ‘आकांक्षी-3’ असे म्हणतात ज्यात असे जिल्हे आहेत ज्यांना केवळ 10% पर्यंत गुण मिळाले आहेत. अशा जिल्ह्यांना शालेय शिक्षणात सुधारणा करण्यासाठी प्राधान्य असलेल्या क्षेत्रांमध्ये मदत करणे आणि उच्च श्रेणी गाठण्यासाठी मदत करणे हे, या जिल्हास्तरीय  श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकाचे अंतिम उद्दिष्ट आहे.

2020-21 या वर्षासाठीचे जिल्हास्तरीय  श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकाचे सध्या संकलन सुरू आहे. जिल्हास्तरीय  श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकाचे   - 2018-19 आणि 2019-20 मुळे शालेय शिक्षणाच्या प्रगतीची राज्यांतर्गत तुलना करण्यासाठीचा एक दृष्टिकोन आपल्याला मिळतो. 

2018-आणि 2019 साठीचा जिल्हास्तरीय श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकाचा अहवाल खालील लिंकवर बघता येईल.

 https://pgi.udiseplus.gov.in/#/home

 

* * *

N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1837351) Visitor Counter : 668


Read this release in: Odia , English , Urdu , Hindi , Punjabi