कृषी मंत्रालय

खते आणि कीटकनाशके यांचा वापर कमी करण्यासाठी खासगी क्षेत्राने देखील सरकारला सहयोग द्यायला हवा- केंद्रीय मंत्री तोमर


केंद्रीय कृषिमंत्र्यांनी फिक्कीच्या 11 व्या कृषीरासायनिक परिषदेला केले संबोधित

Posted On: 23 JUN 2022 7:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जून 2022

 

कृषी क्षेत्रात होणारा खते तसेच कीटकनाशके यांचा वापर कमी करण्यासाठी खासगी क्षेत्राने देखील सरकारला सहयोग द्यायला हवा, असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटले आहे.  फिक्की अर्थात भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या 11 व्या कृषीरासायनिक परिषदेला हिमाचल प्रदेशातील सोलन येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना तोमर बोलत होते.

आपला देश शेतीवर आधारित आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे योगदान फार मोठे आहे असे त्यांनी सांगितले.

आपल्या देशामध्ये आता फलोत्पादन क्षेत्राला देखील प्रोत्साहन द्यायला हवे जेणेकरून आपण सर्व दृष्टीने आत्मनिर्भर होऊ शकू असे ते म्हणाले. आपला देश आता अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत अत्यंत सुस्थितीत आहे. जागतिक पातळीवरील स्पर्धेत उतरण्याच्या दृष्टीने आपल्याला शेतीच्या बाबतीत अधिक विकसित राष्ट्रांकडे पाहून नव्या गोष्टी शिकाव्या लागतील आणि त्यांच्यासोबतच पुढे जावे लागेल. देशात सध्या 10 हजार नव्या शेतकरी उत्पादक संघटना उभारल्या जात आहेत, शेतकऱ्यांना त्यांचा मोठा लाभ होत आहे आणि भविष्यातही त्या अधिक लाभदायक ठरतील. पिकांमध्ये वैविध्य आणण्याला देखील प्रोत्साहन दिले गेले पाहिजे, तोमर म्हणाले.

कृषी विज्ञान केंद्रे शेतकऱ्यांसाठी फार उपयुक्त ठरत आहेत, असे त्यांनी सांगितले.  फिक्कीसारख्या औद्योगिक संस्थांनी कृषीविकासासाठी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

केंद्रीय रसायने आणि खते तसेच नवीन आणि नूतनीकरणीय उर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

 

 

 

S.Kulkarni/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 



(Release ID: 1836568) Visitor Counter : 182


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil