आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय विज्ञान राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या 21 वा दीक्षांत समारंभ संपन्न


"समृद्ध भारतासाठी, आपल्याला निरोगी भारताची आवश्यकता आणि निरोगी भारतासाठी आपल्याला सुदृढ नागरिकांची आवश्यकता आहे"

Posted On: 20 JUN 2022 2:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2022


नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र  येथे  आयोजित  वैद्यकीय विज्ञान राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या (एनबीइएमएस )  21 व्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी भूषवले. डॉ. भारती प्रवीण पवार या  कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून तसेच इतर मान्यवरही उपस्थित होते. या दीक्षांत समारंभात तब्बल 17467 तज्ज्ञ आणि सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांना, डिप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड, डॉक्टरेट ऑफ नॅशनल बोर्ड आणि फेलो ऑफ नॅशनल बोर्ड या पदवी प्रदान करण्यात आल्या. या दीक्षांत समारंभात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 210 डॉक्टरांना गुणवंत पुरस्कारांनी गौरविण्यात आले.नव्या भारताच्या निर्मितीमध्ये आजच्या डॉक्टरांची भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि त्यांची खरी वचनबद्धता आणि समर्पण हे  शक्य करू शकते, असे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी 21 व्या दीक्षांत समारंभात अध्यक्षीय भाषण करताना सांगितले.

सहज उपलब्ध होणाऱ्या, परवडणाऱ्या आणि रुग्णस्नेही आरोग्य सेवा प्रणालीकडे देशाची वाटचाल सुरु झाली आहे, असे  यावेळी डॉ.मनसुख मांडविया यांनी सांगितले.“आज,आपल्या माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा यांच्यात समन्वय साधून आरोग्य क्षेत्रात सर्वसमावेशक कार्य करणे हे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. सहज उपलब्ध होणारी, परवडणारी आणि रुग्ण-स्नेही आरोग्य सेवा प्रणालीचा  दृष्टीकोन  पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टीने,  सर्व सरकारी योजना महत्वाचे टप्पे असल्याचे सिद्ध झाले आहे. याच  दृष्टीकोनातून काम करत आम्ही एम्सची (AIIMS)संख्या देखील वाढवली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय बांधण्याचे नियोजन आहे.”, असे ते म्हणाले.

''प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय श्रेणी आरोग्य सेवा बळकट करून देशाच्या दूरवरच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी परवडणाऱ्या दर्जेदार आरोग्यसेवेचा विस्तार करण्यासाठी आपले लक्ष केंद्रित असायला हवे. समृद्ध भारतासाठी आपल्याला सुदृढ भारत आवश्यक आहे आणि सुदृढ भारतासाठी आपल्याला निरोगी नागरिक आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
 
आपण एखाद्या व्यक्तीचे शैक्षणिक यश साजरे करणे हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे असे सांगत आरोग्य आणि  कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांनी डॉक्टरांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ज्यांच्या कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि वचनबद्धतेमुळे हे शक्य झाले आहे त्या शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. तुमचे विद्यार्थी असण्याचे स्वातंत्र्य संपले आहे, आणि आता तुम्ही वैद्यकशास्त्राच्या या महत्वाच्या व्यवसायात प्रवेश करणार आहात त्यामुळे तुमची पुन्हा सज्ज होण्याची वेळ आली आहे. आतापासून, तुमचा संबंध  देवाने निर्माण केलेल्या  मौल्यवान निर्मितीशी येणार आहे त्यामुळे  व्यावसायिक आणि माणूस म्हणून तुम्हाला  सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. ही खूप मोठी जबाबदारी आहे. तुमच्या सर्व क्षमता आणि सामर्थ्याने  भारताला आरोग्य सेवेत अग्रेसर बनवण्यात तुम्ही योगदान देऊ शकता.”, असे डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.

R.Aghor/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1835898) Visitor Counter : 144