पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या मशाल रिले उद्‌घाटन प्रसंगी भाषण

प्रविष्टि तिथि: 19 JUN 2022 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जून 2022

 

बुद्धिबळ ऑलिंपियाड या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातील  माझे सहकारी, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष आर्केडी द्वोरकोविच, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष, विविध देशांचे राजदूत, उच्चायुक्त, बुद्धीबळ आणि इतर खेळांशी संबंधित संस्थांचे प्रतिनिदही, राज्य सरकारमधील प्रतिनिधी, इतर सर्व मान्यवर, बुद्धिबळ ऑलिम्पियाड संघाचे सदस्य आणि बुद्धीबळाचे इतर खेळाडू, बंधू आणि भगिनींनो !

आज बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडास्पर्धेची पहिली मशाल रिले भारतातून सुरू होणार नाही. यावर्षी पहिल्यांदाच, भारताकडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे यजमानपदही आले आहे. एक असा क्रीडाप्रकार, जो भारतात जन्माला आला, त्याने आता भारतातून बाहेर पडून संपूर्ण जगावर आपली छाप सोडली आहे. आज अनेक देशांसाठी तो खेळ एक ध्यास, एक अत्यंत लोकप्रिय प्रकार ठरला आहे, याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. आम्हाला याचा अतिशय आनंद आहे, की इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या स्वरूपात, आपल्या जन्मस्थानी बुद्धिबळ स्पर्धा अतिशय उत्साहात आनंदात आयोजित केली जात आहे. शेकडो वर्षांपूर्वी, ‘चतुरंग’ ह्या खेळाच्या रूपाने, बुद्धीबळाची मशाल जगभरात पोहोचली होती. आज जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाल्यानिमित्त अमृत महोत्सव साजरा करतो आहे, अशावेळी बुद्धिबळ ऑलिम्पियाडची ही मशाल देखील देशातील 75 शहरांमध्ये नेली जाणार आहे. मला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ- फिडेच्या एका निर्णयाचाही खूप आनंद होत आहे. यापुढे प्रत्येक बुद्धीबळ ऑलिम्पियाड ची मशाल रिले देखील भारतातूनच सुरु होईल. हा सन्मान, केवळ भारताचाच सन्मान नाही, तर बुद्धिबळाच्या भारतातील अभिमानास्पद वारशाचाही सन्मान आहे. मी यासाठी फिडे आणि त्याच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करतो. मी 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची कामगिरी उत्तम व्हावी, अशा शुभेच्छा मी देतो. आपल्यापैकी जो कोणी या स्पर्धेत जिंकेल, त्याचा विजय खिलाडूवृत्तीचा विजय असेल. महाबलिपूरम येथे मस्त खेळा, खिलाडूवृत्ती, खेळण्याची जिद्द सर्वोपरी ठेवून खेळा.

मित्रांनो,

हजारो वर्षांपासून जगासाठी एक मंत्र घुमतो आहे--'तमसो मा ज्योतिर्गमय' म्हणजे आपण अंध:कारकडून प्रकाशाकडे निरंतर पुढे चालत राहायचे आहे. प्रकाश म्हणजे, मानवतेचे उज्ज्वल भवितव्य, प्रकाश म्हणजे सुखी आणि निरोगी आयुष्य, प्रकाश म्हणजे प्रत्येक क्षेत्रात सामर्थ्य वाढवण्यासाठीचे प्रयत्न. आणि म्हणूनच भारताने एकीकडे गणित, विज्ञान आणि खगोलशास्त्र या क्षेत्रात संशोधने केलीत. तर दुसरीकडे, आयुर्वेद,योग आणि खेळांना जीवनाचा भाग बनवले. भारतात कुस्ती आणि कबड्डी, मल्लखांब अशा क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जात असे. म्हणजे, सुदृढ आणि निरोगी शरीरासोबतच एक सामर्थ्यवान नवी पिढी तयार करता येईल. त्याचवेळी आकलनशक्ती वाढावी आणि समस्या सोडवण्यास सक्षम असे मेंदू तयार व्हावेत, यासाठी आपल्या पूर्वजांनी चतुरंग किंवा बुद्धिबळ सारख्या खेळांचा शोध लावला. भारतातून बाहेरच्या अनेक देशात गेलेला बुद्धीबळ खेळ तिकडे खूप लोकप्रिय झाला. आज शाळांमध्ये बुद्धीबळ हा खेळ युवकांसाठी, मुलांसाठी एक शैक्षणिक साधन म्हणून वापरले जात आहे.बुद्धिबळ शिकणारे युवा विविध क्षेत्रात समस्या सोडवण्यात चांगले योगदान देत आहेत. बुद्धिबळाच्या पटापासून ते आक संगणकावर खेळल्या जाणाऱ्या डिजिटल चेस पर्यंत भारत प्रत्येक पावलावर बुद्धिबळाच्या या लांब प्रवासाचा साक्षीदार राहिला आहे.

भारताने या खेळात, नीलकंठ वैद्यनाथ, लाला राजा बाबू आणि तिरुवेंगदाचार्य शास्त्री यांच्यासारखे महान खेळाडू दिले आहेत. आजही आपल्यासोबत उपस्थित असलेले विश्वनाथन आनंद जी, कोनेरू हम्पी, विदित, दिव्या देशमुख यांच्यासारखे प्रतिभावान खेळाडू बुद्धीबळात आपल्या तिरंग्याचा सन्मान वाढवत आहेत. आताच मी कोनेरू हम्पी जी यांच्यासोबत बुद्धीबळाच्या समारंभीय चालीचा रोचक अनुभव घेतला आहे.

मित्रांनो,

मला हे बघून अतिशय आनंद होतो की गेल्या सात-आठ वर्षात भारताने बुद्धिबळ खेळात आपल्या कामगिरीत सातत्याने सुधारणा केली आहे. 41 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये भारताने आपले पहिले कांस्यपदक जिंकले होते.  2020 आणि 2021 मध्ये झालेल्या आभासी बुद्धिबळ ऑलिंपियाड मध्ये भारताने सुवर्ण आणि कांस्य पदक जिंकले होते. यावर्षी तर आधीच्या तुलनेत आपले सर्वाधिक खेळाडू बुद्धिबळ ऑलिंपियाड मध्ये सहभागी होत आहेत. म्हणूनच मला आशा आहे की या वर्षी भारत पदकांच्या बाबतीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. जशी आशा मला वाटते आहे, तशीच आशा सर्वांनाच आहे ना?

मित्रांनो,

मला बुद्धिबळाचे खूप काही ज्ञान तर नाही, मात्र इतकं निश्चित समजतं की या खेळांच्या नियमांचे अर्थ खूप खोल असतात. जसे की बुद्धिबळाच्या प्रत्येक गोटीची आपली विशेष ताकद असते, त्याची खास क्षमता असते. जर आपण एक सोंगटी घेऊन योग्य चाल खेळली त्याच्या ताकदीचा योग्य वापर केला, तर ती साधी सोंगटी सुद्धा खूप शक्तिशाली बनू शकते. इतकेच काय, एक प्यादा, जो खेळातली सर्वात दुर्बळ सोंगटी समजली जाते, ती सुद्धा सर्वात शक्तिशाली सोंगटी बनू शकते. त्यासाठी गरज आहे ती सतर्क राहून योग्य ती चाल खेळण्याची, योग्य ते पाऊल उचलण्याची. मग ते प्यादे असले तरी बुद्धिबळाच्या पटावर हत्ती, उंट किंवा वजीराची ताकद मिळवू शकते.

मित्रांनो,

बुद्धिबळाचे हेच वैशिष्ट्य आपल्याला आयुष्याचा मोठा संदेश देतात. योग्य पाठबळ आणि उत्तम वातावरण मिळाले तर अगदी दुर्बळ व्यक्तीसाठी सुद्धा कोणतेही उद्दिष्ट अशक्य नसते. कोणीही, कुठल्याही पार्श्वभूमीतील असेल, कितीही संकटे, अडचणी आल्या असतील तरीही, पाहिले पाऊल उचलताना जर त्याला योग्य दिशा मिळाली, तर तो सामर्थ्यवान बनून आयुष्यात हवे ते मिळवू शकतो.

मित्रहो,

बुद्धीबळाच्या खेळाचे आणखी एक ठळक वैशिष्टय आहे – दूरदृष्टी. छोट्या पल्ल्याच्या यशापेक्षा दूरवरचा विचार करणाऱ्यालाच खरे यश मिळते हे आपल्याला बुद्धीबळ शिकवते. आज भारताच्या क्रीडा धोरणाबद्द्ल बोलायचे झाले तर खेळाच्या क्षेत्रात TOPS म्हणजेच टारगेट ऑलिम्पिक पोडियम स्किम आणि खेलो इंडिया सारख्या योजना याच विचारांनी काम करत आहेत आणि त्याचे परिणाम आपण सातत्याने बघत आहोतच.

नव्या भारतातील तरुण आज बुद्धीबळाच्या सोबत प्रत्येक खेळात कमाल करत आहे. गेल्या काही काळातच आपण ऑलिंपिक्स, पॅरालिंपिक्स आणि डेफीलिंपिक्स यासारख्या मोठ्या जागतिक क्रीडा स्पर्धा बघितल्या आहेत. भारताच्या खेळाडूंनी या सर्व आयोजनात दिमाखदार खेळ केला, जुने विक्रम तोडले आणि नवीन विक्रमांची नोंद केली. टोक्यो ऑलिंपिक्स मध्ये आपण पहिल्यांदाच 7 पदके जिंकली, पॅरालिंपिक्स मध्ये पहिल्यांच 19 पदके जिंकली. नुकतेच भारताने अजून एक यश मिळवले आहे. आपण सात दशकात प्रथमच थॉमस कप जिंकला आहे. जागतिक चॅम्पियनशीपमध्ये आपल्या तीन महिला मुष्टीयोध्यांनी सुवर्णपदक आणि कांस्य पदक जिंकले आहे. ऑलिंपिक्समध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या नीरज चोपडाने काही दिवसांपूर्वीच आणखी एक आंतरराष्ट्रीय पदक जिंकले आहे, एक नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे.

भारताच्या तयारीचा वेग किती आहे, भारताच्या तरुणाचा जोश काय आहे, याची वरुन आपल्याला कल्पना येईल. आता आपण 2024 पॅरिस ऑलिंपिक्स आणि 2028च्या लॉस एंजलिस ऑलिंपिकचे लक्ष्य निश्चित करुन काम करत आहोत. आता TOPS  योजनेतून शेकडो खेळाडूंना सहाय्य दिले जात आहे, आणि यामध्ये सर्वात खास बाब ही की छोट्या शहरातील युवावर्ग, क्रीडाविश्वात आपला झेंडा फडकवण्यासाठी पुढे येत आहे. 

मित्रहो,

जेव्हा प्रतिभा योग्य संधींशी जोडली जाते तेव्हा यशाचे शिखर नतमस्तक होते आणि स्वतःचे स्वागत करते. आपल्या देशात टॅलेंटची कमतरता नाही. देशातील तरुणांमध्ये धैर्य, समर्पण आणि शक्तीची कमतरता नाही. पूर्वी आमच्या या तरुणांना योग्य व्यासपीठाची वाट पाहावी लागत होती. आज 'खेलो इंडिया' मोहिमेअंतर्गत देश स्वतः या कलागुणांचा शोध घेत आहे, त्यांना पैलू पाडत आहे. आज 'खेलो इंडिया' मोहिमेंतर्गत देशातील दुर्गम भागातील, खेड्यापाड्यातून, शहरांमधून, आदिवासी भागातील हजारो तरुणांची निवड करण्यात आली आहे.प्रतिभा आणि योग्य संधी एकत्र येतात तेव्हा यशाची शिखरे स्वतः झुकून स्वागत करतात. आणि आपल्या देशात प्रतिभेची कमतरता नाही. देशातील युवकांमध्ये साहस, समर्पण आणि सामर्थ्याची कमतरता नाही. आधी आमच्या या तरुणांना योग्य व्यासपीठासाठी वाट पहावी लागत होती. आज खेलो इंडिया मोहिमेच्या अंतर्गत देश या प्रतिभेचा शोध घेत आहे तिला आकारही देत आहे. आज देशाच्या दूरदूरच्या भागातून, खेडेगावातून, आदिवासी प्रदेशातून हजारो युवकांना खेलो इंडिया मोहिमेंतर्गत निवडले गेले आहे.

देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये आधुनिक स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केले जात आहे. देशाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही क्रीडा विषयाला दुसऱ्या विषयांएवढेच महत्व दिले गेले आहे.  प्रत्यक्ष खेळण्याखेरीज इतरही अनेक संधी तरुणांना क्रीडा विश्वात उपलब्ध होत आहेत. स्पोर्ट्स फिजिओ, स्पोर्ट्स रिसर्च असे अनेक नवीन आयाम उपलब्ध होत आहेत. आपल्याला करियर आकाराला आणता यावे या हेतूने देशात अनेक क्रीडा विद्यापीठे उघडली जात आहेत.

मित्रहो,

आपण सर्व खेळाडू जेव्हा खेळाच्या मैदानात किंवा समजा कोणत्याही टेबलच्या किंवा बुद्धीबळाच्या पटासमोर असता तेव्हा फक्त आपल्या विजयासाठी नाही तर देशासाठी खेळत असता. स्वाभाविकपणे यामुळे कोट्यवधी लोकांच्या आशा आकांक्षाचे ओझे आपणावर असते. परंतू माझी अशी इच्छा आहे की देश आपली मेहनत आणि दृढनिश्चय बघत असतो हे पक्के लक्षात ठेवा. आपल्याला शंभर टक्के देणे आवश्यक आहे. आपण आपले शंभर टक्के द्या, पण शून्य टक्के ताण घेऊन, टेन्शन फ्री. जिंकणे हा जसा खेळाचा भाग आहे तेवढाच जिंकण्यासाठी मेहनत करणे हासुद्धा खेळाचाच भाग आहे. म्हणूनच, या खेळात आपण जेवढे शांत रहाल, आपल्या मनाला जेवढे नियंत्रणात ठेवाल तेवढी उत्तम कामगिरी आपण कराल. या कामी योग आणि आणि मेडिटेशन आपल्याला मदत करु शकेल. आता परवा म्हणजे 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. योग हा आपल्या जीवनाच्या नित्याचा भाग बनवताना त्याचबरोबर आपण योग दिनाचा भरपूर प्रचार करावा असे मला वाटते. यामुळे, आपण कोट्यवधी लोकांना दिशा दाखवू शकता. मला संपूर्ण भरवसा आहे की आपण सर्व याच निष्ठेने खेळाच्या मैदानात उतराल. आणि आपल्या देशाचा गौरव वाढवाल. आपणा सर्वांना पुन्हा एकदा ही आठवणीत राहण्याजोगी संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा क्रीडा विश्वाला अनेकानेक शुभेच्छा.

खूप खूप धन्यवाद.

 

S.Thakur/R.Aghor/V.Sahajra/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1835655) आगंतुक पटल : 261
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Telugu , Kannada , Malayalam , Bengali , Assamese , Odia , English , Manipuri