संरक्षण मंत्रालय

जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात संरक्षण मंत्र्यांचा दौरा; सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा

Posted On: 16 JUN 2022 5:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जून 2022

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज म्हणजेच 16 जून 2022 रोजी जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागांचा दौरा केला तसेच या भागातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, जनरल ऑफिसर, कमांडिग-इन-चीफ, उत्तर विभाग लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, 15 चे लेफ्टनंट जनरल ए.एस अलुजा आणि 19 इन्फ्रंट्री विभागाचे मेजर जनरल अजय चांदपुरिया यावेळी संरक्षण मंत्र्यांसोबत ह्या दौऱ्यात सहभागी झाले असून त्यांनी इथल्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती सिंह यांना दिली.

त्यानंतर राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दल, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि जम्मू काश्मीर पोलिस अशा सर्व दलांच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत सुद्धा आपल्या जबाबदाऱ्या अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असल्याबद्दल त्यांनी ह्या कर्मचाऱ्यांचे कौतूक केले. त्यांचा पराक्रम आणि उत्साह वाखणण्याजोगा असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.  हे  सैनिक अत्यंत हिंमत आणि समर्पण वृत्तीतून देशाची सेवा करत असून, त्यातून सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांच्याविषयी, विशेषतः तरूणांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत होत आहे, असे त्यांनी सांगितले.  

आपला शेजारी देश सतत भारत विरोधी कारवाया करण्यात गुंतलेला असतो. गेल्या काही काळात राज्यांतही दहशतवादी कारवाया झाल्याचे आपण पहिले. मात्र, लष्करी दलांचे कर्मचारी, बीएसएफ, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलीस या सगळ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे राज्यांत दहशतवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. पाकिस्तान सातत्याने देशाची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी देशात असे छोटे-मोठे हल्ले केले जात आहेत. मात्र, आपली सुरक्षा दले, आपल्यासाठी असं भक्कम संरक्षण कवच आहेकी जे आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, ते स्वतःच घायाळ होतात. देशाचा आपल्या संरक्षण दलांवर पूर्ण विश्वास आहे, की ते कायम कोणत्याही प्रकारची स्थिती हाताळण्यासाठी सक्षम आहेत. असं संरक्षण मंत्री म्हणाले.

भारत हा शांतताप्रिय देश आहे, आपण जगाला 'वसुधैव कुटुंबकम' असा संदेश दिला आहे, याचा पुनरुच्चार करून राजनाथ सिंह म्हणाले की, आम्ही कधीही कोणत्याही देशाला दुखावण्याचा प्रयत्न केलेला नाही. आम्ही कोणाची एक इंचही जमीन काबीज करण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, राष्ट्राची एकता आणि अखंडतेला धक्का लावण्याचा प्रयत्न कधी झाला तर सशस्त्र सेना चोख प्रत्युत्तर देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 



(Release ID: 1834565) Visitor Counter : 168


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil