दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

जिनिव्हातल्या संयुक्त राष्ट्रांच्या ‘पॅलेस दे नेशन्स’ कार्यालयात वापरल्या जाणाऱ्या ‘वे फाइंडिंग ऍप्लिकेशन’बाबत भारत आणि संयुक्त राष्ट्र यांच्यातील कराराला केन्द्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

Posted On: 14 JUN 2022 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जून 2022

 

जिनिव्हातल्या (UNOG) संयुक्त राष्ट्रांच्या पॅलेस दे नेशन्स कार्यालयात वापरल्या जाणाऱ्या ‘वे फाइंडिंग ऍप्लिकेशन’बाबत, म्हणजेच, ‘मार्ग शोधण्यासाठीचे अॅप’विकसित करण्यासाठीच्या भारत आणि संयुक्त राष्ट्र यांच्यातील करारावर स्वाक्षरी करण्याच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.

संयुक्त राष्ट्रे (UN) ही 1945 मध्ये स्थापन झालेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. सध्या यात 193 सदस्य राष्ट्रे आहेत. भारत संयुक्त राष्ट्रसंघाचा संस्थापक सदस्य आहे.

जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांचे कार्यालय (UNOG), पाच इमारती आणि 21 मजले असलेल्या, ऐतिहासिक पॅलेस दे नेशन्स इथे आहे. विविध सभा आणि अधिवेशनांमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने प्रतिनिधी, नागरी समाजाचे सदस्य आणि सामान्यजन UNOG ला भेट देत असतात.

या इमारतीची व्याप्ती आणि तिची गुंतागुंतीची रचना आणि तिथे होणारे कार्यक्रम लक्षात घेता, दिशादर्शक (नेव्हिगेशनल) ऍप्लिकेशनची आवश्यकता होती. त्याद्वारे सर्व सुरक्षा निकषांचे पालन करत, अभ्यागतांना आणि इतर प्रतिनिधींना परिसरात त्यांचा मार्ग शोधण्यात मदत होऊ शकेल.

ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (GPS) आधारित अॅप्स खुल्या जागेत कार्य करत असताना, इमारतीच्या आत विशेष दिशादर्शक अॅप अधिक अचूकपणे  अभ्यागतांना दालने आणि कार्यालये शोधण्यात मदत करेल.

भारताने 75 व्या वर्धापनदिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांना देणगीस्वरुपात हे अॅप देण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. ‘वे फाइंडिंग ऍप्लिकेशन’ विकसित करण्याच्या प्रकल्पाची संकल्पना 2020 मध्ये मांडली गेली होती.  अॅपच्या विकासासाठी आणि देखभालीसाठी अंदाजे 20 लाख अमेरीकी डॉलर्स इतका खर्च अपेक्षित आहे.

प्रकल्पामध्ये UNOG च्या ‘पॅलेस दे नेशन्स’ परिसरामध्ये सुलभ दिशादर्शन करण्यासाठी सॉफ्टवेअर-आधारित 'वे फाइंडिंग ऍप्लिकेशन' विकसित केले आहे. यात अॅपचे व्यवस्थापन आणि देखभाल करणेही समाविष्ट आहे.  हे अॅप्लिकेशन वापरकर्त्यांना UNOG च्या पाच इमारतींमध्ये पसरलेल्या 21 मजल्यांमध्ये त्यांचे इच्छीत स्थान शोधण्यात साहाय्यक ठरेल. अॅप इंटरनेट जोडणीसह अॅन्ड्रॉइड आणि आयओएस मोबाईल आदी उपकरणांवर कार्य करेल. अॅपचा विकास भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या (DoT) स्वायत्त दूरसंचार संशोधन आणि विकास केंद्र, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DoT) वर सोपवण्यात आला आहे.

हा प्रकल्प म्हणजे संयुक्त राष्ट्रांमधे भारताचे महत्त्वपूर्ण योगदान असेल. केवळ भारताच्या तांत्रिक क्षमतांवर प्रकाश टाकणाराच नाही तर संयुक्त राष्ट्र स्तरावरील व्यासपीठावर देशाची प्रतिष्ठा देखील हा प्रकल्प वाढवेल. जगभरातून आलेल्या लोकांच्या मोबाईलमध्ये या ‘मेड इन इंडिया’ अॅपच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचं अस्तित्व जाणवेल. मजबूत सॉफ्टवेअर तंत्रज्ञान कौशल्याच्या रूपात भारताचे सुप्त सामर्थ्य सॉफ्ट पॉवर) जगासमोर येईल.

 

* * *

R.Aghor/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1833956) Visitor Counter : 337