अर्थ मंत्रालय
केंद्रीय वित्तमंत्र्यांच्या हस्ते ‘धरोहर- राष्ट्रीय सीमाशुल्क आणि जीएसटी संग्रहालयाचे' गोव्यात राष्ट्रार्पण
Posted On:
11 JUN 2022 4:51PM by PIB Mumbai
पणजी/मुंबई : जून 11, 2022
केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज गोव्यात “धरोहर”-राष्ट्रीय सीमाशुल्क आणि जीएसटी संग्रहालयाचे राष्ट्रार्पण झाले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून वित्त मंत्रालय 6 ते 12 जून ह्या कालावधीत, आयकॉनिक वीक साजरा करत आहे. त्याचाच भाग म्हणून गोव्यात आज हा कार्यक्रम झाला. हा राष्ट्रार्पण सोहळा अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यात, अर्थमंत्र्यांनी हे संग्रहालय ज्या इमारतीत आहे, त्या 400 वर्षे जुन्या वास्तूमध्ये स्थापन असलेल्या, एकाच दगडातून बनवण्यात आलेल्या शिल्पकृतीवरील सोनेरी वाळू बाजूला सरकावून हे उद्घाटन केले. या दुमजली निळ्या इमारतीचे आधीचे, म्हणजे पोर्तुगीज काळातील नाव ‘अल्फांडेगा’ असे होते. गेल्या 400 वर्षांपासून ही इमारत मांडवी नदीच्या काठी उभी आहे.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि गोव्याचे वाहतूक, पर्यटन आणि पंचायत राज मंत्री मॉउवीन गुडीन्हो यावेळी उपस्थित होते.
‘धरोहर’ हे भारतातील एक वैशिष्ट्यपूर्ण वस्तू संग्रहालय आहे, जिथे भारतीय सीमाशुल्क विभागाने, तस्करी, चोरी होत असतांना जप्त केलेल्या देशातल्या प्राचीन मूर्ती आणि इतर स्थापत्य वस्तू तर ठेवण्यात आल्या आहेतच; त्याशिवाय, देशाच्या आर्थिक आघाड्यांचे, देशाच्या वारशाचे, सौंदर्याचे आणि समाजाचे रक्षण करताना, भारतीय सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवायांची माहिती देखील इथे बघायला मिळेल. अशाप्रकारचे हे देशातील पहिलेच संग्रहालय आहे.
“धरोहर’ मध्ये एकूण आठ प्रेक्षक दीर्घा (गॅलरी) असतील. संग्रहालयाची ओळख करुन देणारी, कररचनेचा इतिहास सांगणारी, आर्थिक आघाड्या सांभाळणाऱ्या कामांविषयीची, भारतातील कला आणि वारसा जपणारी, भारतातील निसर्ग-प्राणीसृष्टिचे रक्षण करणारी, आपल्या सामाजिक कल्याणाची विश्वस्त असणारी आणि भारतीय अप्रत्यक्ष कराचा प्रवास- मीठावरील करापासून जे जीएसटी पर्यंतचा प्रवास सांगणारी दीर्घा.
या धरोहर संग्रहालयाचे खास सामर्थ्य आणि वैशिष्ट्य म्हणजे, तिथली, ‘बॅटल ऑफ विट्स’ गॅलरी म्हणजे, मेंदूच्या, बुद्धीकौशल्याची लढाई सांगणारी दीर्घा. नावाप्रमाणेच, यात तस्कर आणि सीमाशुल्क अधिकारी यांच्यातल्या बुद्धीकौशल्याच्या लढाईची रोचक माहिती आहे. तसेच, यात, सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केलेली प्राचीन नाणी, मूर्ती, धोकादायक स्थितीतील दुर्मिळ प्राणी, हत्यारे आणि अंमली पदार्थ अशा सगळ्या वस्तूंचा समावेश असेल. गेली अनेक वर्षे, आपल्या कार्यपद्धतीत वेळोवेळी बदल करत, आव्हांनांवर मात करणाऱ्या या विभागाच्या देशसेवेच्या कार्यक्षम मोहिमा आणि कार्यपद्धतीत डोकावण्याची संधी सर्वसामान्य लोकांना या संग्रहालयामुळे पहिल्यांदाच मिळणार आहे.
या संग्रहालयात प्रदर्शनात असलेल्या वस्तूंपैकी विशेष म्हणजे, ‘ऐन-ए-अकबरी’ ह्या अकबरकालीन दस्तऐवजाचे दुर्मिळ मूळ हस्तलिखित जे भारतीय सीमाशुल्क विभागाने भारत-नेपाळ सीमेवर रक्सौल इथून हस्तगत केले होते, कुरूक्षेत्रावरील अमीन पिलर्सची प्रतिकृती, मध्ययुगीन काळातील खगोलशास्त्रीय उपकरणे, धातू आणि दगडांची जप्त केलेली दुर्मिळ शिल्पे, हस्तिदंती वस्तू आणि वन्यजीव संबंधित वस्तूंचा समावेश आहे.
धरोहर संग्रहालयात, जीएसटी गॅलरी ही नवी जोड आहे. देशात, पहिल्यांदाच राबवल्या जात असलेल्या या उपक्रमातील ही जीएसटी गॅलरी आपल्याला जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा करायच्या संकल्पनेपासून-निर्मिती ते अंमलबजावणी पर्यंतच्या 20 वर्षांच्या प्रवासाचा फेरफटका घडवते. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात, म्हणजे 2000 साली पहिल्यांदा जीएसटी वर चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर जीएसटीच्या या सगळ्या क्रमवार घडामोडींमधले विविध टप्पे आणि प्रक्रिया, ज्यामुळे देशात 1 जुलै 2017 रोजी सुधारित एकीकृत अप्रत्यक्ष करव्यवस्था लागू होऊ शकली, हा सगळा प्रवास यात मांडलेला आहे.
या संग्रहालयाच्या ‘ई-कॅटलॉगमध्ये संग्रहालयातील विविध गॅलरीजचे अत्यंत उत्तम दर्जा असलेले फोटो ठेवण्यात आले आहेत, त्यासोबत त्यांची माहिती देखील आहे. QR कोड वापरुन या ई-कॅटलॉगला डाऊनलोड करता येईल. यातून इथे येणाऱ्या पर्यटकांना, संग्रहालयाविषयीची सर्वच माहिती एकाच ठिकाणी मिळू शकेल, तसेच पुरातत्व आणि प्राचीन इतिहासाच्या अभ्यासकांसाठी देखील, ही माहिती उपयुक्त ठरेल.
‘धरोहर’ हे संग्रहालय भारताच्या पर्यटनाच्या नकाशावरील एक महत्वाचे स्थान ठरणार असून, गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी देखील हे ‘मस्ट सी’ असे आकर्षण असेल.
***
Source : CBIC PIB Goa/PK/Mum/001
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1833156)
Visitor Counter : 294