पंतप्रधान कार्यालय

अहमदाबादमधील बोपल येथे भारतीय राष्ट्रीय अंतराळ प्रोत्साहन आणि  प्राधिकरण केंद्राच्या (इन -स्पेस) उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 10 JUN 2022 8:44PM by PIB Mumbai

 

नमस्‍कार!

केंद्रीय  मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि या  प्रदेशातील खासदार, केंद्रीय गृहमंत्री  अमित शहा, गुजरातचे लोकप्रिय मृदू आणि खंबीर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संसदेतील माझे सहकारी  सी.आर. पाटीलइन-स्पेसचे अध्यक्ष  पवन गोयंका,अंतराळ विभागाचे सचिव  एस. सोमनाथ जी, भारताच्या अंतराळ उद्योगांचे  सर्व प्रतिनिधी, इतर मान्यवर,

आज  21 व्या शतकातील आधुनिक भारताच्या विकासाच्या  प्रवासात एक शानदार अध्याय जोडला गेला आहे.भारतीय राष्ट्रीय अंतराळ प्रोत्साहन  आणि प्राधिकरण केंद्र म्हणजेच इन स्पेस च्या मुख्यालयासाठी मी सर्व देशवासियांचे आणि विशेषतः वैज्ञानिक समुदायाचे  खूप खूप अभिनंदन करतो.आजकाल आपण पाहतो की, तरुणांना समाज माध्यमांवर  काहीतरी उत्कंठावर्धक  किंवा मनोरंजक पोस्ट करायचे असते, त्याआधी ते सज्ज राहण्यासाठी  संदेश देतात- 'वॉच धिस स्पेसभारताच्या अंतराळ उद्योगासाठी, इन स्पेसची सुरुवात ही  'वॉच धिस स्पेस'' म्हणजे उत्कंठावर्धक क्षणासारखी आहे.' इन स्पेस  ही भारतातील तरुणांसाठी भारतातील सर्वोत्तम वैज्ञानिक विचार असलेल्यांना  त्यांची प्रतिभा दाखवण्याची अभूतपूर्व संधी आहे.मग ते सरकारी किंवा  खाजगी क्षेत्रात कार्यरत असोत.  इन स्पेस  सर्वांसाठी उत्तम संधी घेऊन आले आहे.इन स्पेस मध्ये भारताच्या अंतराळ उद्योगात क्रांती घडवून आणण्याची मोठी क्षमता आहे. आणि म्हणूनच मी आज नक्कीच म्हणेन की 'वॉच धिस स्पेसइन स्पेस  हे (स्पेस) अंतराळासाठी  आहे, इन स्पेस हे (पेस )वेगासाठी आहे,इन स्पेस हे (एस) नैपुण्यासाठी  आहे. 

 

मित्रांनो,

अनेक दशकांपासून, भारतातील अंतराळ क्षेत्राशी निगडित खाजगी उद्योगाकडे केवळ विक्रेता म्हणून पाहिले गेले. सरकारच  सर्व अंतराळ मोहिमा आणि प्रकल्पांवर काम करत असे.गरजेनुसार आपल्या  खाजगी क्षेत्रातील लोकांकडून काही भाग आणि उपकरणे घेतली जात असत .खासगी क्षेत्राला केवळ विक्रेते बनवल्यामुळे त्यांचा  नेहमीच रस्ता अडवला गेला, भिंत उभी राहिली.जे सरकारी यंत्रणेत नाहीत, मग ते शास्त्रज्ञ असोत वा तरुण, त्यांना अंतराळ  क्षेत्राशी संबंधित त्यांच्या कल्पनांवर काम करता आले नाही.आणि या सगळ्यात नुकसान कोणाचे होत होते ? देशाचे नुकसान होत होते.  अखेर  केवळ  मोठ्या कल्पनाच विजेते बनवतात, ही गोष्ट याची साक्षीदार आहे. अंतराळ क्षेत्रात सुधारणा करून, या क्षेत्राला सर्व निर्बंधांपासून मुक्त करून,इन स्पेसच्या माध्यमातून खाजगी उद्योगाला पाठबळ देऊन, देश आज  विजेते घडवण्याची  मोहीम सुरू करत आहे.आज खाजगी क्षेत्र हे केवळ विक्रेता म्हणून राहणार नाही तर अंतराळ  क्षेत्रात बलाढ्य  विजेत्यांची भूमिका बजावेल.भारताच्या सरकारी अंतराळ संस्थांचे सामर्थ्य  आणि भारताच्या खाजगी क्षेत्राचा ध्यास  जेव्हा एकत्र येईल तेव्हा त्यासाठी आकाशही अपुरे पडेल. भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची ताकद आज जग पाहत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात भारताच्या अंतराळ क्षेत्राची ताकद नवीन उंची गाठेल.अंतराळ उद्योग, स्टार्टअप्स आणि इस्रो यांच्यातील तंत्रज्ञानाचे हस्तांतरण सुलभ करण्यासाठीचे काम देखील इन स्पेस  करेल.

खाजगी क्षेत्र देखील इस्रोच्या संसाधनांचा वापर करू शकेल,इस्रो सोबत एकत्र काम करू शकेल हे देखील सुनिश्चित केले जात आहे.

 

मित्रांनो,

अंतराळ क्षेत्रात या सुधारणा  करत असताना, भारतातील तरुणांमधली अफाट क्षमता माझ्या मनात नेहमीच घर करून राहिली आहे आणि ज्या स्टार्टअप्सना भेट देऊन मी आलो आहे, अत्यंत कमी वयाचे तरुण ज्या धडाडीने पुढे पावले टाकत आहेत, त्यांना पाहून, त्यांना ऐकून मन खूप प्रसन्न झाले.या सर्व तरुणांचे मी अभिनंदन करतो.अंतराळ क्षेत्रात पूर्वीच्या व्यवस्थेत भारतातील तरुणांना तेवढ्या संधी मिळत नव्हत्या. देशातील तरुण त्यांच्यासोबत नवोन्मेष , ऊर्जा आणि संशोधनाची  भावना घेऊन येतात.त्यांची जोखीम घेण्याची क्षमता देखील खूप जास्त आहे. कोणत्याही देशाच्या विकासासाठी हे खूप महत्त्वाचे असते. पण जर एखाद्या तरुणाला इमारत बांधायची असेल तर त्याला आपण  केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बांधायला सांगू शकतो का? जर एखाद्या तरुणाला नवनवीन शोध घ्यायचा असेल तर त्याला आपण सांगू शकतो का की हे काम केवळ सरकारी सुविधेतूनच होईल.ऐकायला विचित्र वाटेल पण आपल्या देशात वेगवेगळ्या क्षेत्रात हीच परिस्थिती होती.कालांतराने नियमन आणि निर्बंध यातील फरक विसरला गेला हे देशाचे दुर्दैव आहे.आज जेव्हा भारतातील तरुणांना  देश  उभारणीत अधिकाधिक सहभागी व्हायचे आहे, तेव्हा आपण त्यांच्यासमोर जे काही करायचे आहे ते सरकारी मार्गाने करा ही अट ठेवू शकत नाही. अशा अटी घालण्याचे युग संपले आहे. आमचे सरकार भारतातील तरुणांसमोरील प्रत्येक अडथळे दूर करत आहे, सातत्याने सुधारणा करत आहे.संरक्षण क्षेत्र खाजगी उद्योगांसाठी खुले करणे, आधुनिक ड्रोन धोरण बनवणे, भू स्थानीय  डेटा मार्गदर्शक तत्वे तयार करणे , दूरसंचार-माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कुठूनही  काम करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे , सरकार प्रत्येक दिशेने काम करत आहे.भारतातील खाजगी क्षेत्रासाठी जास्तीत जास्त व्यवसाय सुलभतेचे वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून देशाचे खाजगी क्षेत्र देशवासियांचे जीवनमान सुलभ करण्यात तितकीच  मदत करेल.

 

मित्रांनो,

इथे येण्यापूर्वी मी इनस्पेसची तांत्रिक प्रयोगशाळा आणि क्लीन रूम पण बघत होतो.येथे उपग्रहांची रचना, संरचना, जुळवाजुळव ,एकीकरण आणि चाचणीसाठी अत्याधुनिक उपकरणे भारतीय कंपन्यांना उपलब्ध असतील.आणखी अनेक आधुनिक सुविधा आणि पायाभूत सुविधा येथे निर्माण केल्या जातील ज्यामुळे अंतराळ उद्योगाचे  सामर्थ्य वाढण्यास मदत होईल. आज मला प्रदर्शन क्षेत्राला भेट देण्याची, अंतराळ उद्योगातील लोकांशी आणि अंतराळ स्टार्ट अप्सशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मला आठवते , जेव्हा आपण अंतराळ क्षेत्रात सुधारणा करत होतो, तेव्हा काही लोकांना भीती वाटत होती की अंतराळ  उद्योगात कोणत्या खाजगी कंपन्या येतील ? पण आज 60 हून अधिक भारतीय खाजगी कंपन्या अंतराळ क्षेत्रात आल्या, आज त्या त्यात अग्रेसर आहेत आणि आज त्यांना पाहून मला अधिक आनंद  झाला आहे.मला अभिमान आहे की ,आपल्या खाजगी उद्योगातील सहकाऱ्यांनी   प्रक्षेपक , उपग्रह, ग्राउंड सेगमेंट आणि स्पेस ऍप्लिकेशन या क्षेत्रात वेगाने काम सुरू केले आहे.पीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या  निर्मितीसाठी भारतातील खाजगी कंपन्याही  पुढे आल्या आहेत. इतकेच नाही तर अनेक खाजगी कंपन्यांनी स्वतःच्या  प्रक्षेपकाची रचनाही केली आहे.भारताच्या अवकाश क्षेत्रातील अमर्याद शक्यतांची ही झलक आहे.यासाठी मी आपल्या शास्त्रज्ञांचे, उद्योगपतींचे, तरुण उद्योजकांचे आणि सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो आणि या संपूर्ण प्रवासात हे जे नवे वळण आले आहे,एका नव्या उंचीवरचा मार्ग निवडला आहे यासाठी जर मला कोणाचे सर्वात जास्त अभिनंदन करायचे असेल, जर मला कोणाचे सर्वात जास्त आभार मानायचे असतील तर मला माझ्या इस्रोच्या लोकांचे आभार मानायचे आहेत . आपले  इस्रोचे जुने सचिव इथे बसले आहेत ज्यांनी या गोष्टीचे नेतृत्व केले आणि आता आपले सोमनाथजी ते पुढे नेत आहेत आणि म्हणूनच याचे संपूर्ण श्रेय  मी या इस्रोच्या सहकाऱ्यांना देत आहे. मी या शास्त्रज्ञांना देत आहे. हा काही छोटा निर्णय नाही मित्रांनो आणि या स्टार्टअप्सना माहित आहे की अशा महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ते  भारत आणि जगाला काहीतरी देण्याचे मोठी  उमेद बाळगून आहेत आणि म्हणूनच संपूर्ण श्रेय इस्रोला जाते.या कामात त्यांनी मोठी पावले उचलली आहेत, त्यांनी गोष्टी वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे आणि जिथे त्यांचे स्वतःचे प्रभुत्व होते, ते म्हणत आहेत , देशाच्या तरुणांनो या, हे तुमचे आहे, तुम्ही हे पुढे घेऊन जा हा एक अतिशय क्रांतिकारी निर्णय आहे.

 

मित्रांनो,

यावेळी आपण आपल्या स्वातंत्र्याच्या 75वर्षांचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत.स्वतंत्र भारतातील आपल्या ज्या यशाने कोट्यवधी देशवासीयांना प्रेरणा दिली, त्यांना आत्मविश्वास दिला, त्यात आपल्या अंतराळ कामगिरीचेही  विशेष योगदान आहे.इस्रो जेव्हा प्रक्षेपकाचे उड्डाण करते , अवकाशात उपग्रह पाठवते, तेव्हा संपूर्ण देश त्यात सहभागी  होतो, अभिमान वाटतो.देश त्याच्यासाठी प्रार्थना करतो आणि जेव्हा ते  यशस्वी होते  तेव्हा प्रत्येक देशवासी आपला आनंद, उत्साह  आणि अभिमान व्यक्त करतो.आणि भारतातील प्रत्येक नागरिक त्या यशाला आपले यश मानतो आणि काही अकल्पित घडले, तरीही देश आपल्या शास्त्रज्ञांच्या पाठीशी उभा राहतो आणि त्यांना प्रोत्साहन देतो.शास्त्रज्ञ असो वा शेतकरी-मजूर,ज्याला विज्ञानाचे तंत्र समजते  किंवा समजत नाही,, या पलीकडे जाऊन  आपली अंतराळ मोहीम देशातील जनतेच्या मनाची मोहीम बनते.भारताची ही भावनिक एकता आपण  चांद्रयान मोहिमेदरम्यान पाहिली. भारताची अंतराळ मोहीम ही एक प्रकारे 'आत्मनिर्भर भारत'ची सर्वात मोठी ओळख आहे.आता या मोहिमेला भारताच्या खाजगी क्षेत्राची ताकद मिळेल तेव्हा त्याची ताकद किती वाढेल याचा अंदाज तुम्ही करू  शकता.

 

मित्रांनो,

21 व्या शतकाच्या या काळात, तुमच्या आमच्या  जीवनात अंतराळ तंत्रज्ञानाची भूमिका दिवसेंदिवस वाढत आहे.जितकी  अधिक भूमिका, अधिक अनुप्रयोग, तितक्या अधिक शक्यता. 21व्या शतकातील एका मोठ्या क्रांतीचा आधार अंतराळ -तंत्रज्ञान बनणार आहे.अंतराळ  तंत्रज्ञान आता केवळ दूरच्या अवकाशाचेच   नव्हे तर आपल्या वैयक्तिक अवकाशाचेही  तंत्रज्ञान बनणार आहे.

मान्य जनतेच्या जीवनात अंतराळ तंत्रज्ञानाची जी भूमिका आहे, दैनंदिन जीवनात ज्या प्रकारे अंतराळ तंत्रज्ञान सामावले आहे त्याकडे अनेकदा लक्ष जात नाही. आपण टीव्ही सुरु केल्यावर कितीतरी वाहिन्या आपल्याला उपलब्ध असतात,मात्र खूपच कमी लोकांना माहित आहे की हे उपग्रहाच्या मदतीने होत आहे.कुठे यायचे-जायचे असेल, वाहतुकीची परिस्थिती पहायची असेल, जवळचा रस्ता कोणता आहे हे पहायचे असेल तर हे सर्व कशाच्या सहाय्याने होत आहे ? उपग्रहाच्या मदतीने होत आहे. नागरी नियोजनाची इतकी कामे आहेतकुठे रस्ता तयार होत आहे, कुठे पूल बांधण्यात येत आहे, कुठे रुग्णालय उभारण्यात येत आहे, कुठे भू-गर्भातली पाण्याची पातळी बघायची आहे, पायाभूत प्रकल्पांवर देखरेख ठेवायची आहे,ही सर्व कामे उपग्रहाच्या मदतीने होत आहेत. आपले जे किनारी भाग आहेत,त्यांच्या नियोजनात, त्यांच्या विकासातही अंतराळ तंत्रज्ञानाची मोठी भूमिका आहे.समुद्रात जाणाऱ्या मच्छिमारांनाही उपग्रहांच्या माध्यमातून मच्छिमारी आणि समुद्री वादळे यांची पूर्व सूचना मिळते.आज  पावसाचे जे अंदाज येतात ते जवळ जवळ अचूक ठरतात. त्याच प्रकारे जेव्हा वादळे येतात, तेव्हा ते  नेमके कुठे धडकेल,कोणत्या दिशेने जाईल,किती तासात, किती मिनिटात ते जमिनीवर धडकेल हा सर्व तपशील उपग्रहाच्या मदतीने प्राप्त होतो. इतकेच नव्हे तर कृषी विभागात पिक विमा योजना असो, मृदा आरोग्य पत्रिका असो, या सर्वांमध्येही अंतराळ तंत्रज्ञानाचाच वापर होत आहे. अंतराळ तंत्रज्ञानावाचून आपण आज आधुनिक हवाई क्षेत्राची कल्पनाही करू शकत नाही. हे सर्व विषय सामान्य जनतेच्या जीवनाशी निगडीत आहेत. भविष्यात, आपल्याला माहित असेलच या वेळी  अर्थसंकल्पात आम्ही दूरचित्रवाणीच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देणारी एक मोठी योजना जाहीर केली आहे. इतकेच नव्हे तर ज्या स्पर्धात्मक परीक्षा असतात आणि ज्या मुलांना गाव सोडून शहरांमध्ये मोठे शुल्क भरून शिकवणी घ्यावी लागते त्यांनाही आम्ही या उपग्रहाच्या माध्यमातून त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार करत आहोत ज्यामुळे या  मुलांना जास्तीचा खर्च करावा लागणार नाही आणि गरीबातल्या गरीबांची मुलेही उत्तम शिक्षण उपग्रहाच्या माध्यमातून आपल्या दूरचित्रवाणीच्या पडद्यावर, लॅपटॉपच्या पडद्यावर,मोबाईलवर तो  सहज प्राप्त करू शकतील या दिशेने आम्ही काम करत आहोत. 

 

मित्रहो,

भविष्यात अशाच अनेक क्षेत्रांमध्ये अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त वाढणार आहे. अंतराळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामान्य जनतेचे जीवन जास्तीत जास्त कसे सुलभ करता येईल, जीवनमान सुलभता वाढवण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञान कसे माध्यम ठरेल आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग देशाचा विकास आणि सामर्थ्यासाठी करू शकता येईल या दिशेने  इनस्पेस आणि खाजगी कंपन्यांनी सातत्याने काम करण्याची आवश्यकता आहे.  भौगोलिक मॅपिंगशी संबंधित कितीतरी संधी आपल्यासमोर आहेत.खाजगी क्षेत्राची यात मोठी भूमिका असू शकते.आपल्याकडे आज सरकारी उपग्रहांचा मोठा डाटा उपलब्ध आहे. येत्या काळात खाजगी क्षेत्राकडेही मोठा डाटा उपलब्ध होईल. डाटाची  ही पुंजी जगामध्ये आपल्याला मोठे सामर्थ्य देणार आहे. सध्या अंतराळ क्षेत्र सुमारे 400 अब्ज डॉलर्सचे आहे. 2040 पर्यंत हे क्षेत्र एक ट्रीलीयन डॉलर उद्योगक्षेत्र होण्याची शक्यता आहे. आज आपल्याकडे प्रतिभा आहे, अनुभवही आहे, मात्र या उद्योगात आपला सहभाग केवळ  जन भागीदारी म्हणजे खाजगी भागीदारी केवळ दोन टक्के आहे.      जागतिक अंतराळ क्षेत्र उद्योगात आपल्याला आपला वाटा वाढवायला हवा आणि यामध्ये खाजगी क्षेत्राची मोठी भूमिका आहे.  येत्या काळात अंतराळ पर्यटन आणि अंतराळ रणनीतीमध्येही  भारताची मजबूत भूमिका मी  पाहत आहे. भारताच्या अंतराळ कंपन्या जागतिक व्हाव्यात, आपल्याकडे जागतिक अंतराळ कंपन्या असाव्यात ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब असेल.

 

मित्रहो

आपल्या देशात अनंत संधी आहेत मात्र या अनंत संधी मर्यादित प्रयत्नातून कधीच साकारू शकत नाहीत. मी आपल्याला आश्वासन देतो, देशाच्या जवानांना आश्वासन देतो, वैज्ञानिक स्वभावधर्माच्या, जोखीम पेलण्याची क्षमता बाळगणाऱ्या युवकांना आश्वासन देतो की अंतराळ क्षेत्रातल्या सुधारणांचा हा ओघ यापुढेही असाच जारी राहील.खाजगी क्षेत्राच्या गरजा जाणून घेण्यासाठी,समजून घेण्यासाठी एक मजबूत यंत्रणा तयार करण्यात आली आहे. या दिशेने खाजगी क्षेत्राच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एक एकल खिडकी, स्वतंत्र नोडल एजन्सी म्हणून इनस्पेस काम करेल. सरकारी कंपन्या,अंतराळ उद्योग,स्टार्ट अप्स आणि संस्था यांच्यात समन्वयासह पुढे जाण्यासाठी नव्या अंतराळ धोरणावर भारत काम करत आहे. अंतराळ क्षेत्रात व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठीही लवकरच एक धोरण आणणार आहोत.

 

मित्रहो

मानव जगताचे भविष्य,विकास यावर भविष्यात सर्वात मोठा प्रभाव  असणारी दोन क्षेत्रे असतील, आपण जितक्या लवकर त्याचा अधिकाधिक शोध घेऊ, जगाच्या या स्पर्धेत आपण जितक्या लवकर पुढे येऊ, तितकेच आपण परिस्थितीचे नेतृत्वही  करू शकतो,नियंत्रणही करू शकतो आणि ही दोन क्षेत्रे आहेत त्यापैकी एक आहे ते अंतराळ आणि दुसरे आहे ते म्हणजे समुद्र. ही दोन क्षेत्रे मोठी ताकद ठरू शकणार आहेत आणि आज आम्ही धोरणाद्वारे या सर्वांची दखल घेण्याचा प्रयत्न  करत आहोत आणि देशाच्या युवा वर्गाला याच्याशी संलग्न होण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. अंतराळ क्षेत्राबाबत आपल्या युवकांमध्ये विशेष करून विद्यार्थ्यांमध्ये जी जिज्ञासा आहे ती भारताच्या अंतराळ उद्योगाच्या विकासाचे मोठे  सामर्थ्य आहे. म्हणूनच देशभरातल्या हजारो अटल टिंकरिंग प्रयोगशाळामध्ये, विद्यार्थ्यांना अंतराळाशी संबंधित  अनेक विषयांचा  परिचित करून देण्यात यावा,त्यांना यासंदर्भात अद्ययावत माहिती देण्यात यावी असा आमचा प्रयत्न आहे. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांनीही आपल्या विद्यार्थ्यांना अंतराळाशी संबंधित भारतीय संस्था आणि कंपन्याबाबत माहिती द्यावी, त्यांच्या प्रयोगशाळांसमवेत  विद्यार्थ्यांच्या भेटी घडवाव्यात असे आवाहन मी करतो. या  क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे सातत्याने भारतीय खाजगी संस्थांची संख्या वाढत आहे त्याचीही त्यांना मदत होणार आहे.  आपल्याला आठवत असेल भारतात यापूर्वी, मला माहित नाही असे का होत असे, पण असे घडत असे की, मी पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी अशी स्थिती होती की जेव्हा उपग्रहाचे प्रक्षेपण होत असे तेव्हा त्या संपूर्ण क्षेत्रात  कोणालाही प्रवेश नसे,आमच्यासारख्या  नेत्यांना अति महत्वाच्या व्यक्तीप्रमाणे 12-15 लोकांना निमंत्रित करून दाखवले जात असे की उपग्रह प्रक्षेपित होत आहे आणि आम्हीही मोठ्या उत्साहाने ते पाहत होतो. मात्र माझे विचार वेगळे आहेत, माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे.पंतप्रधान म्हणून मी पहिल्यांदा तिथे गेलो तेव्हा आम्ही निर्णय घेतला, आम्ही लक्षात घेतले की देशातल्या विद्यार्थ्यांना यात रुची आहे, जिज्ञासा आहे आणि ही बाब पाहून आम्ही, आपले उपग्रह प्रक्षेपित होतात त्या श्रीहरीकोटा इथे आम्ही प्रक्षेपण पाहण्याची, उपग्रह जेव्हा  अवकाशात सोडला जातो ते पाहण्यासाठी दर्शन गॅलरी उभारली आहे. कोणताही नागरिक, कोणत्याही शाळेचा विद्यार्थी हा  कार्यक्रम पाहू शकतो आणि आसन व्यवस्थाही लहान नाही.10 हजार लोक  उपग्रह प्रक्षेपण पाहू शकतील याची व्यवस्था करण्यात आली आहे. या  गोष्टी लहान वाटतात  पण यांचा मोठा प्रभाव पडत आहे.

 

मित्रहो,

इनस्पेसच्या मुख्यालयाचे आज लोकार्पण होत आहे. एका प्रकारे घडामोडींचे केंद्र ठरत आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या क्षेत्रात गुजरात मोठ्या संस्थांचे केंद्र ठरत आहे याचा मला आनंद आहे. भूपेंद्र भाई आणि त्यांच्या चमूचे, गुजरात सरकारमधल्या सर्व सहकाऱ्यांचे, या उपक्रमासाठी, प्रत्येक धोरणासाठी  तत्पर राहून सहकार्य करण्यासाठी मी त्यांचे मनःपूर्वक  आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आपल्याला माहित असेलच काही दिवसांपूर्वीच जामनगर इथे जागतिक आरोग्य संघटनेच्या, पारंपरिक औषधांसाठीच्या जागतिक केंद्राचे काम सुरु झाले आहे. राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ असो,राष्ट्रीय विधी विद्यापीठ असो,पंडित दीनदयाल उर्जा विद्यापीठ असो,राष्ट्रीय न्याय वैद्यक विद्यापीठ असो, राष्ट्रीय नवोन्मेश फौंडेशन असो, बाल विद्यापीठ असो, कितीतरी राष्ट्रीय संस्था इथे आजूबाजूला आहेत.भास्कराचार्य इंस्टीट्युट फॉर स्पेस एप्लिकेशन अ‍ॅन्ड जिओइंफोर्मेटीक्स  म्हणजे बिसाग ची  स्थापना देशाच्या  इतर राज्यानाही प्रेरणा ठरली आहे. या मोठ्या संस्थांमध्ये आता इनस्पेसही या स्थानाची ओळख वाढवेल. देशाच्या युवकांना, विशेष करून गुजरातच्या युवकांना  माझी विनंती आहे की त्यांनी या उत्कृष्ट संस्थांचा  संपूर्ण लाभ घ्यावा. आपल्या सक्रीय भूमिकेमुळे अंतराळ क्षेत्रात भारत नवे शिखर गाठेल याचा मला विश्वास आहे. या  शुभ प्रसंगी, विशेषकरून खाजगी क्षेत्राने ज्या उत्साहाने भाग घेतला आहे, जे युवा नवा उत्साह, नवे संकल्प घेऊन पुढे आले आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो, त्यांचे अभिनंदन करतो.  इस्रोचे सर्व वैज्ञानिक आणि इस्रोच्या संपूर्ण चमूलाही खूप-खूप शुभेच्छा देतो,खूप-खूप धन्यवाद देतो. खाजगी क्षेत्रात गोयंका हे यशस्वी व्यक्तिमत्व राहिले आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली इनस्पेस खऱ्या अर्थाने आपले स्वप्न पूर्ण करण्याचे सामर्थ्य बाळगून वाटचाल करेल. या  अपेक्षांसह अनेकानेक शुभेच्छांसह खूप-खूप धन्यवाद ! 

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1833141) Visitor Counter : 232