राष्ट्रपती कार्यालय
हिमाचल प्रदेश केंद्रीय विद्यापीठाच्या 6 व्या वार्षिक दीक्षांत समारंभात राष्ट्रपती सहभागी
Posted On:
10 JUN 2022 9:25PM by PIB Mumbai
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज (10 जून, 2022) हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे केंद्रीय विद्यापीठाच्या 6 व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून संबोधित केले.
शिक्षण हा राष्ट्र उभारणीचा पाया असतो.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक क्षमता आणि कौशल्य विकसित करण्यासह त्यांची नैतिक मूल्ये आणि चरित्र्यही बळकट करणारे शिक्षण असले पाहिजे, असे यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी सांगितले . जगातील सर्व आघाडीच्या देशांच्या प्रगतीत तरुणांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे ते म्हणाले. शैक्षणिक क्षेत्रातील महिलांचा सहभाग हा कोणत्याही समाजाच्या विकासासाठी महत्त्वाचा मापदंड आहे, यावरही त्यांनी भर दिला.
तरुणांसमोर अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत आणि भारतातील तरुणांमध्ये या संधींचा वापर करण्याची क्षमता आहे. त्यांच्या या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जाणे आवश्यक आहे असे राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले. दीक्षांत समारंभ हा औपचारिक शिक्षण पूर्ण केल्यानिमित्तचा समारंभ आहे, मात्र शिक्षण आयुष्यभर सुरु राहणार आहे, विद्यार्थ्यांनी प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येकाकडून शिकण्याची तयारी ठेवावी असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यानी आतापर्यंत जे काही साध्य केले आहे त्यात समाजाचे योगदान आहे, हे त्यांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. त्यांच्यावर समाजाचे ऋण आहे. त्याची परतफेड करण्याची त्यांची तयारी असली पाहिजे. त्याची परतफेड कशी आणि कधी करायची हे त्यांच्यावर अवलंबून आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. भारतातील सुशिक्षित, शिस्तबद्ध आणि दृढनिश्चयी युवाशक्तीच्या ज्ञानावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1833047)
Visitor Counter : 156