अर्थ मंत्रालय
अर्थ मंत्रालयाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित केलेल्या आयकॉनिक सप्ताहाचा समारोप समारंभ शनिवारी गोव्यात होणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते ‘धरोहर’ - राष्ट्रीय सीमाशुल्क आणि वस्तू आणि सेवा कर संग्रहालयाचे होणार राष्ट्रार्पण
Posted On:
10 JUN 2022 5:04PM by PIB Mumbai
अर्थ मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयकॉनिक सप्ताहाचा समारोप समारंभ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत शनिवारी गोव्यात होणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी), केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी), महसूल विभाग, आर्थिक व्यवहार आणि आर्थिक सेवा विभागाद्वारे प्रदर्शित केल्या जाणार्या अनेक कार्यक्रमांचा समावेश असेल
या दिवशी पणजीतील राष्ट्रीय सीमाशुल्क आणि वस्तू आणि सेवा कर संग्रहालयाचे राष्ट्रार्पण हा पहिला कार्यक्रम होईल आणि त्यानंतर वस्तू आणि सेवा कर दालनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ‘धरोहर’ हा लघुपटही यावेळी दाखवण्यात येणार आहे.
लोकांमध्ये तसेच मुलांमध्ये जागरूकता आणि कर साक्षरता निर्माण करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने काही मनोरंजक ‘खेळाद्वारे शिका (लर्न बाय प्ले)’ उत्पादने विकसित केली आहेत. उत्पादनांच्या या मालिकेअंतर्गत अर्थमंत्र्यांच्या हस्ते बोर्ड गेम्स, त्रिमितीय कोडी (थ्रीडी पझल्स) आणि मनोरंजक पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन केले जाणार आहे.
लहान मुलांना करांबद्दल शिक्षित करण्याचा उद्देशाने 'साप आणि शिडी' चा एक खेळ तयार करण्यात आला आहे. याचप्रमाणे मुलांना आणि तरुण प्रौढांना कर भरण्याच्या संकल्पनेची मनोरंजक पद्धतीने ओळख करून देण्याच्या उद्देशाने 'इंडिया गेट' हे त्रिमितीय कोडेही तयार करण्यात आले आहे. उत्पन्न आणि करांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी डिजिटल मनोरंजक पुस्तकांची मालिका देखील प्रकाशित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात, देशाच्या विकासात करांचे योगदान आणि प्रत्यक्ष करांच्या क्षेत्रात केलेल्या सुधारणा दाखवणारी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासंदर्भातील एक छोटी चित्रफीतदेखील प्रकाशित केली जाईल.
"संकल्प @75" या महत्वाच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्यानुसार, “ संकल्प (प्लेज)” या शीर्षकाखाली आर्थिक सेवा विभागाद्वारे तयार करण्यात आलेली संगीतमय चित्रफीत प्रकाशित केली जाणार आहे. भारतीय आर्थिक सेवा क्षेत्रातील लोकांनी लोकांची आणि देशाची सेवा करण्यासाठी घेतलेले व्रत या चित्रफितीच्या माध्यमातून दाखवले जाणार आहे.
टपाल विभागाच्या सहकार्याने, आर्थिक व्यवहार विभागाचा व्यय विभागाच्या वतीने माय स्टॅम्प या या छायाचित्र पुस्तिकेचे, विशेष लिफाफ्याचे आणि गेल्या 75 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत केंद्रीय अर्थसंकल्पाचे योगदान अधोरेखित करणाऱ्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या समारंभात केंद्रीय अर्थसंकल्पाचा स्वातंत्र्यापासूनचा प्रवास दाखवणारा लघुपटही प्रदर्शित करण्यात येणार आहे.
पुरी समुद्रकिनाऱ्यावर प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी तयार केलेल्या वाळू शिल्पाचे आभासी उद्घाटन हे या समारोप समारंभाचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य आहे. हे वाळू शिल्प ‘देशाच्या विकासासाठी कर’ या संकल्पनेवर आधारित आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि आयकॉनिक सप्ताहाबद्दल
स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि येथील लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्यासाठी आणि त्याचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा अधिकृत प्रवास 12 मार्च 2021 रोजी सुरू झाला ज्यामुळे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनासाठी 75 आठवड्यांची उलटगणना सुरू केली.
अर्थ मंत्रालयाने 6 ते 11 जून दरम्यान अनेक कार्यक्रमांसह आपला आयकॉनिक सप्ताह आयोजित केला. यामध्ये विविध नागरिक केंद्रित उपक्रम, आर्थिक साक्षरता कार्यक्रम, व्याख्यानमाला, परिसंवाद आणि चर्चासत्र, अंमली पदार्थ विध्वंस दिन साजरा करणे, सायकल रॅली इत्यादींचा समावेश आहे.आयकॉनिक सप्ताहा दरम्यान आयोजित कार्यक्रमांचे इतिवृत्त ई-कॉफी टेबल बुकमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1832915)
Visitor Counter : 255