पंतप्रधान कार्यालय
10 जून रोजी पंतप्रधान देणार गुजरातला भेट
3050 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन आणि उद्घाटन
आदिवासी भागात पाणीपुरवठ्याची सोय आणि जीवनमान उंचावणारे प्रकल्प
नवसारी येथे पंतप्रधानांच्या हस्ते होणार ए.एम.नाईक आरोग्यसेवा संकुलाचे आणि निराली मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन
अहमदाबादमध्ये बोपाल येथे आयएन-एसपीएसीइ च्या मुख्यालायचेही उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार
Posted On:
08 JUN 2022 10:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जून 2022
येत्या 10 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला भेट देणार आहेत. सकाळी 10:15 च्या सुमारास नवसारी येथे 'गुजरात गौरव अभियानात' विविध विकासकामांचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन होणार आहे. त्यानंतर अंदाजे 12:15 वाजता ते नवसारीमध्येच ए.एम.नाईक आरोग्यसेवा संकुलाचे आणि निराली मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन करणार आहेत. नंतर अंदाजे दुपारी 3:45 वाजता अहमदाबादमध्ये बोपाल येथे आयएन-एसपीएसीइ म्हणजे इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरच्या मुख्यालायचेही उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
नवसारीमध्ये पंतप्रधान
'गुजरात गौरव अभियान' नावाच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. यावेळी नवसारीतील खुडवेल या आदिवासी भागात 3050 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन होणार आहे. यात 7 प्रकल्पांचे उद्घाटन, 12 प्रकल्पांचा कोनशिला समारंभ आणि 14 प्रकल्पांचे भूमिपूजन केले जाणार आहे. या भागातील पाणीपुरवठा वाढण्यासाठी तसेच संपर्कयंत्रणा आणि जीवन-सुलभता यात वाढ होण्यासाठी या प्रकल्पांची मदत होणार आहे.
तापी,नवसारी आणि सुरत जिल्ह्यातील रहिवाशांसाठी पाणीपुरवठ्याच्या 13 प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान करणार आहेत. या कामांसाठी अंदाजे 961 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नवसारी जिल्ह्यात एका वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे. या महाविद्यालयासाठी 542 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्या भागातील लोकांना परवडण्याजोग्या दरात गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी हे महाविद्यालय उपयुक्त ठरेल.
586 कोटी रुपये खर्चून मधुबन धरणाच्या आधारे उभारलेल्या अस्तोल प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पाणीपुरवठा अभियांत्रिकीच्या कौशल्याचा हा प्रकल्प म्हणजे एक उत्तम नमुना आहे. तसेच नळावाटे पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांचे उदघाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी 163 कोटी रुपये खर्च आला आहे. या प्रकल्पांमुळे सुरत, नवसारी, वलसाड आणि तापी जिल्ह्यांतील रहिवाशांना पिण्याचे सुरक्षित आणि पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे.
तापी जिल्ह्यातील रहिवाशांना वीजपुरवठा करण्यासाठी 85 कोटीपेक्षा अधिक खर्च करून उभारलेल्या वीरपूर व्यारा उपकेंद्राचे उद्घाटनही यावेळी केले जाणार आहे. 20 कोटी रुपये खर्चाच्या आणि 14 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. वलसाड जिल्ह्यात वापी येथे हा प्रकल्प वाया जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करेल. नवसारी येथे 21 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या सरकारी निवासस्थानांचे उद्घाटन आणि 12 कोटी रुपये खर्चून पिपलादेवी-जुनेर-चिंचविहीर-पिपलदहाद रस्त्यांचे आणि डांगमधील शाळेच्या वास्तूचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत
पंतप्रधान 549 कोटी रुपयांच्या आठ पाणीपुरवठा प्रकल्पांची कोनशिला ठेवणार असून त्याद्वारे सुरत, नवसारी, वलसाड आणि तापी जिल्ह्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळण्याची सोय होऊ शकणार आहे. खेरगाम आणि पिपलखेडला जोडणाऱ्या रुंद रस्त्यासाठी 33 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्याचाही कोनशिला समारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. नवसारी आणि बार्डोली दरम्यान सुपामार्गे चौपदरी रस्ता तयार केला जाणार असून त्यासाठी 27 कोटींचा खर्च अपेक्षित आहे, त्याचीही कोनशिला पंतप्रधान स्थापित करणार आहेत. डांग येथे 28 कोटी खर्चाच्या जिल्हा पंचायत भवनाची आणि 10 कोटी खर्चाच्या फ़िक्सिन्ग रोलर क्रॅश बॅरियरची कोनशिलाही ते बसवणार आहेत.
ए.एम.नाईक आरोग्यसेवा संकुलात पंतप्रधान
नवसारीमध्ये पंतप्रधान ए.एम.नाईक आरोग्यसेवा संकुल आणि निराली मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन करणार आहेत. या आरोग्यसेवा संकुलात आयोजित केलेल्या एका समारंभात ते सहभागी होणार आहेत. त्यावेळी ते खरेल शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन दूरदृश्य माध्यमातून करणार आहेत. यानंतर ते या समारंभाला संबोधित करणार आहेत.
आयएन-एसपीएसीइच्या मुख्यालयात पंतप्रधान
अहमदाबादमध्ये बोपल येथे इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरच्या मुख्यालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. यावेळी आयएन-एसपीएसीइ आणि अंतराळक्षेत्रात व संबंधित सेवांमध्ये कार्यरत खासगी कंपन्या यांच्यात सामंजस्य करारही केले जाणार आहेत. अंतराळ क्षेत्रात खासगी उद्योजकांना मुभा आणि प्रोत्साहन मिळाल्याने अंतराळ क्षेत्राला मोठी चालना मिळेल आणि भारतातील प्रज्ञावंत तरुण-तरुणींना नवीन संधींचे एक दालन उघडले जाईल.
आयएन-एसपीएसीइ च्या स्थापनेची घोषणा जून 2020 मध्ये करण्यात आली होती. ही एक स्वायत्त आणि एक-खिडकी प्रणालीने युक्त अशी शीर्ष संस्था असून ती अवकाश विभागात कार्यरत आहे. अंतराळविषयक सरकारी तसेच खासगी उपक्रमांना चालना, प्रोत्साहन देणे आणि त्यांचे नियमन करणे हे या संस्थेचे काम होय. इस्रोच्या सुविधा खासगी व्यक्ती/ संस्थांनी वापरण्याची व्यवस्थाही ही संस्था सांभाळते.
* * *
R.Aghor/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1832404)
Visitor Counter : 157
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam