आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणातर्फे (NHA) मुंबईत आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) वर राज्याच्या सहसंचालक/संचालकांसाठी जागृती आणि माहितीपर कार्यशाळा आयोजित

Posted On: 08 JUN 2022 4:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जून 2022

 

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील सहसंचालक/संचालकांसाठी तीन दिवसीय जागृती आणि माहितीपर कार्यशाळा आयोजित केली आहे. कोईटा सेंटर फॉर डिजिटल हेल्थ (KCDH) आणि आयआयटी मुंबई यांनी संयुक्तपणे ही कार्यशाळा भरविली असून ती आजपासून 10 जून पर्यंत सुरू राहील. आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) योजना, त्यातील घटक आणि भविष्यातील दिशा या विषयी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे पथक या कार्यशाळेत सखोल प्रशिक्षण देणार आहे. कार्यशाळेत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि कोईटा सेंटर फॉर डिजिटल हेल्थच्या पथकांसह विविध राज्यांतील सुमारे 50 अधिकारी सहभागी झाले आहेत.

कार्यशाळेची सुरुवात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर.एस. शर्मा यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. यानंतर आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प संचालक डॉ. प्रवीण गेडाम यांनी कार्यशाळेविषयी सविस्तर माहिती दिली. विभाग प्रमुख आणि विषय तज्ज्ञ (SMEs) यांनी ABDM च्या विविध बिल्डिंग ब्लॉक्सवर तपशीलवार सत्रांचे नियोजन केले आहे. कार्यशाळेत या अभियानामागचे धोरण, कायदेशीर पैलू, मानके, राज्य अंमलबजावणीसाठी कृती योजना आणि तक्रार निवारण यंत्रणा यावरही सत्रे असतील.

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या पथकाव्यतिरिक्त, आरोग्य उद्योगातील विविध तज्ञ आणि शिक्षणतज्ञ देखील माहिती प्रकल्प व्यवस्थापन, डिझाइन, आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली, डेटा गोपनीयता आणि आरोग्य सेवा प्रणाली, अभियांत्रिकी आणि विचार यावर मार्गदर्शन करतील. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन (NDHM) या नावाने प्रकल्पाच्या प्रायोगिक टप्प्यापासूनचे अनुभव आणि घेतलेले प्रशिक्षण याविषयी राज्याचे प्रतिनिधी माहिती देणार आहेत. श्रोत्यांकडून अभिप्राय गोळा करण्यासाठी सत्रांचा समारोप ओपन-हाऊस सत्राने केला जाईल. प्रकल्पाच्या एकात्मिक आरोग्य सुविधांना भेट देऊन कार्यशाळेचा समारोप होईल.

 

* * *

R.Aghor/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1832157) Visitor Counter : 192


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi