राष्ट्रपती कार्यालय
'अभ्यागत परिषद 2022'चे भारताच्या राष्ट्रपतींकडून उद्घाटन
Posted On:
07 JUN 2022 9:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जून 2022
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवन येथे, केंद्रीय विद्यापीठांचे कुलगुरू आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांचे संचालक यांच्या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन केले. राष्ट्रपती हे 161 केंद्रीय उच्चशिक्षण संस्थांचे अभ्यागत आहेत. या 161 संस्थांपैकी 53 संस्था सदर परिषदेला प्रत्यक्ष उपस्थित आहेत, तर उर्वरित संस्था दूरदृश्य माध्यमातून सहभागी झाल्या आहेत.
या परिषदेच्या विभिन्न सत्रांमध्ये विविध विषयांवर चर्चा आणि विचारविनिमय केला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात उच्चशिक्षण संस्थांची भूमिका व जबाबदाऱ्या; उच्चशिक्षण संस्थांची आंतरराष्ट्रीय क्रमवारी; शिक्षणक्षेत्र-उद्योगक्षेत्र आणि धोरणकर्ते यांमधील सहयोग; शालेय, उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाचे एकात्मीकरण; उदयोन्मुख आणि अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत शिक्षण आणि संशोधन- आदी विषयांचा त्यामध्ये अंतर्भाव आहे.
"आपली मोठी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उच्चशिक्षण संस्थांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे अतिशय अगत्याचे आणि परम महत्त्वाचे आहे. जगातील सर्वोत्कृष्टतेचे मापदंड आपल्याला घालून देता आले पाहिजेत." अशी अपेक्षा या परिषदेच्या उद्घाटन सत्रात राष्ट्रपतींनी काढले. यावर्षी QS या शैक्षणिक संस्थांच्या आंतरराष्ट्रीय मानांकनामध्ये भारतातील 35 संस्थांना मानांकन मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. गेल्यावर्षी ही संख्या 29 होती, असेही ते म्हणाले. सर्वोत्कृष्ट 300 संस्थांमध्ये यावर्षी सहा संस्था आहेत, तर गेल्यावर्षी चार होत्या. संशोधनाच्या मापदंडाच्या बाबतीत IISc अर्थात भारतीय विज्ञान संस्थेने पूर्ण 100 गुण मिळविले असून, जगातील अशा आठ प्रतिष्ठित संस्थांच्या बरोबरीने IISc ने हे स्थान मिळविले आहे, असेही ते म्हणाले. या यशाबद्दल त्यांनी IISc चे संचालक डॉ.गोविंदन रंगराजन आणि त्यांच्या पूर्ण संघाचे कौतुक केले.
देशात स्टार्टअप उद्योग आणि अभिनव संकल्पना/ नवोन्मेष यांसाठी पोषक परिसंस्था निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी 28 राज्ये व सहा केंद्रशासित प्रदेशांतील उच्चशिक्षण संस्थांमध्ये सुमारे 2,775 'संस्थात्मक नवोन्मेष परिषदा' स्थापन करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. उच्चशिक्षण संस्था आणि उद्योगजगत यांच्यात सामाजिक दृष्ट्या औचित्यपूर्ण भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी आणि तिच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी यातून चालना मिळेल असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
* * *
S.Kane/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1831925)
Visitor Counter : 182