उपराष्ट्रपती कार्यालय
जगभरातील भारतीय समुदायाच्या यशामुळे भारतीय आणि भारताबद्दलची जगाची धारणा बदलली आहे: उपराष्ट्रपती
उपराष्ट्रपतींनी गॅबॉन, सेनेगल आणि कतारच्या यशस्वी दौर्याची केली सांगता
Posted On:
07 JUN 2022 5:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जून 2022
उपराष्ट्रपतींच्या 9 दिवसांच्या गॅबॉन, सेनेगल आणि कतार या दौऱ्याची आज यशस्वी सांगता झाली. उपराष्ट्रपती नायडू संध्याकाळी उशिरा भारतात परतले. उपराष्ट्रपतींचा गॅबॉन आणि सेनेगल दौरा हा भारतातील पहिला उच्चस्तरीय दौरा होता, तर त्यांचा कतार दौरा भारतीय उपराष्ट्रपतींद्वारे केलेला पहिला दौरा होता. या भेटींमध्ये त्यांनी या देशातील सर्वोच्च नेत्यांशी व्यापक चर्चा केली.

लिब्रेव्हिल, डकार आणि दोहा या राजधानींच्या ठिकाणी त्यांच्या सन्मानार्थ स्वागत समारंभ आयोजित केला होता. नायडू यांनी तिन्ही देशांतील उद्योगपती आणि भारतीय समुदायाशी यावेळी संवाद साधला.
उपराष्ट्रपतींनी काल दोहा इथे कतारमधील भारतीय समुदायाला संबोधित केले. त्यांच्या कामगिरीचे नायडू यांनी कौतुक केले. या दौऱ्यात भेटलेल्या कतारच्या नेतृत्वाचा भारतीय समुदायाबद्दलचा दृष्टिकोण अत्यंत सकारात्मक होता. कतारच्या विकासात भारतीय समुदायाने महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे नेतृत्वाने सांगितले असे नायडू म्हणाले. “कतारमधील 7.80 लाख सशक्त भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधील जिवंत सेतू आहे.” असेही ते म्हणाले.
भारत आणि कतार पुढील वर्षी राजनैतिक संबंधाचा 50 वा वर्धापन दिन साजरा करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर “देश सर्वसमावेशक ऊर्जा भागीदारी” तयार करत आहेत. संरक्षण, सुरक्षा, आरोग्यसेवा आणि शिक्षण क्षेत्रातही भारत आणि कतार यांच्यातील सहकार्य विस्तारत आहे” असे नायडू यांनी सांगितले.

कतार विद्यापीठात भारतीय अध्यासन स्थापन करण्यासाठी आणि क्रीडा तसेच सांस्कृतिक क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी दोन्ही बाजूंनी तत्त्वतः सहमती दर्शवली आहे याची त्यांनी आठवण करुन दिली. उभय देशांमधील वाढत्या संबंधांचे उदाहरण म्हणून,
भारत आणि कतार दरम्यान आदल्या दिवशी स्टार्ट-अप सेतूचे उद्घाटन झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि सर्व नागरिकांना त्यांची जात, पंथ, धर्म किंवा क्षेत्रानुसार नाही तर घटनेनुसार समान अधिकार आहेत याचा भारतीयांना अभिमान वाटला पाहिजे असे भारतातील विविधतेचा संदर्भ देत उपराष्ट्रपती म्हणाले. भारताच्या विकासात सहभागी होण्याचे आणि "जन्मभूमीशी नाळ राखण्याचे" आवाहन त्यांनी भारतीय समुदायाला केले. ‘शिका, कमवा आणि परत या’
आपल्या मातृभूमीला समृद्ध करा असा संदेश परदेशात जाणाऱ्या भारतीय तरुणांना उपराष्ट्रपतींनी दिला.

* * *
S.Kane/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1831853)
Visitor Counter : 225