संरक्षण मंत्रालय
आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला मोठी उभारी देत, देशाच्या संरक्षणसंबंधी साहित्याच्या 76,390 कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावाला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण सामुग्री खरेदी परिषदेची मंजुरी
Posted On:
06 JUN 2022 7:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2022
देशाला आत्मनिर्भरता प्राप्त करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण क्षेत्रासाठीच्या खरेदी व्यवहारांशी संबंधित डीएसीच्या आज 06 जून 2022 रोजी झालेल्या बैठकीत 76,390 कोटी रुपयांच्या संरक्षणविषयक सामग्रीच्या खरेदी प्रस्तावांना आवश्यकतेच्या कसोटीवर मान्यता दिली. यामध्ये खरेदी (भारतीय बनावटीची सामग्री),खरेदी आणि निर्मिती (भारतीय बनावटीचे साहित्य) तसेच खरेदी (भारतीय – आयडीडीएम) या श्रेणीतील खरेदी प्रस्तावांचा समावेश आहे. या खरेदी प्रस्तावांना मान्यता मिळाल्यामुळे, संरक्षणविषयक सामग्रीची निर्मिती करणाऱ्या भारतीय उद्योगांना अधिक चालना मिळेल आणि इतर देशांकडून केल्या जाणाऱ्या या सामग्रीच्या खरेदीसाठी होणारा खर्च वाचेल.
भारतीय लष्करासाठी डीएसीने, रफ टेरेन फोर्क लिफ्ट ट्रक्स, पूल तयार करण्यासाठी वापरात येणारे रणगाडे, रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्रे शोधणारे रडार बसविलेली सशस्त्र लढाऊ वाहने यांच्या आवश्यकतेनुसार खरेदीसाठी देशांतर्गत स्त्रोतांकडून नवे प्रस्ताव मागविले आहेत तसेच त्यात स्वदेशी बनावटीने निर्मित आणि विकसित सामग्रीच्या खरेदीवर अधिक भर देण्यात आला आहे.
भारतीय नौदलासाठी डीएसीने, सुमारे 36,000 कोटी रुपये किंमतीच्या अत्याधुनिक कॉर्वेट प्रकारच्या जहाजांच्या आवश्यकतेनुसार खरेदीच्या प्रस्तावांना मान्यता दिली. या जहाजांवर गस्त मोहिमा, संरक्षण संदर्भात सोबत करण्याच्या मोहिमा, प्रतिबंध, जमिनीवरील कृती गटांच्या मोहिमा, शोध आणि हल्ला तसेच तटवर्ती संरक्षक कार्ये यांसारख्या अष्टपैलू कामगिऱ्या पार पाडण्यासाठी मंच उपलब्ध असेल.या जहाजांची उभारणी भारतीय नौदलाच्या नव्या संरचनेवर आधारित असेल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांची बांधणी केली जाईल. ही जहाजे केंद्र सरकारच्या ‘सागर’ अर्थात प्रदेशातील सर्वांसाठी संरक्षण आणि विकास या उपक्रमामध्ये योगदान देतील.
डीएसीने हिंदुस्तान एरोनॉटिक्स या कंपनीच्या नवरत्न सीपीएसई तर्फे डॉर्नियर विमाने तसेच विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सु-30एमकेआय प्रकारच्या इंजिनांच्या निर्मितीसाठीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या उत्पादन प्रक्रियेत स्वदेशीकरणाला अधिक प्रोत्साहन दिले जाणार असून विशेषतः विमानांच्या इंजिनांची निर्मिती करताना वापरले जाणारे साहित्य भारतात निर्मित असेल याकडे लक्ष पुरविले जाणार आहे.
संरक्षण क्षेत्रामध्ये डिजिटल परिवर्तन घडवून आणण्याच्या केंद्र सरकारच्या संकल्पनेच्या अनुषंगाने ‘भारतीय साहित्याच्या खरेदी श्रेणी’अंतर्गत ‘डिजिटल तटरक्षक दल’ प्रकल्पाला डीएसीने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाअंतर्गत, तटरक्षक दलासाठी संपूर्ण भारतात विविध लष्करी तसेच हवाई मोहिमा, मालवाहतूक, अर्थसहाय्य तसेच मनुष्यबळ प्रक्रिया यांच्याशी संबंधित सुरक्षित जाळे उभारले जाणार आहे.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1831644)
Visitor Counter : 243