माहिती आणि प्रसारण मंत्रालय
दुसऱ्या महायुद्धकाळातील ‘टर्न युअर बॉडी टु द सन’ या अॅलीओना व्हॅन देर होर्स्त यांच्या डच माहितीपटाने जिंकला मिफ्फ-2022 चा सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा प्रतिष्ठित सुवर्णशंख पुरस्कार
मल्याळम लघुपट ‘साक्षात्कारम’ आणि फारो लघुपट ‘ब्रदर ट्रोल’यांना सर्वोत्कृष्ट लघुपटाचा रौप्य शंख पुरस्कार
पोलंडचा चित्रपट ‘प्रिन्स इन ए पेस्ट्री शॉप’ ठरला यंदाच्या मिफ्फ चा सर्वोत्तम अॅनिमेशनपट
केंद्रिय मंत्री डॉ.एल.मुरुगन तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते यंदाच्या मिफ पुरस्कारांचे वितरण
17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहोळ्याचा आज दिमाखदार सोहोळ्यात झाला समारोप
Posted On:
04 JUN 2022 5:55PM by PIB Mumbai
मुंबई, 4 जून 2022
मुंबई येथे 29 मे ते 4 जून 2022 या कालावधीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मिफ्फ 2022 अर्थात 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दिमाखदार सोहोळ्यामध्ये समारोप करण्यात आला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन तसेच सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते श्याम बेनेगल, पत्र सूचना कार्यालय, पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई आणि मिफ चे महोत्सव संचालक आणि फिल्म्स डिव्हीजनचे महासंचालक रवींद्र भाकर हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
दुसऱ्या महायुद्धाचे युद्धकैदी असलेल्या पित्याच्या शोधार्थ जाणाऱ्या निश्चयी मुलीची कथा अत्यंत परिणामकारकपणे मांडणाऱ्या ‘टर्न युअर बॉडी टु द सन’ या नेदरलँड्सच्या माहितीपटाला, सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा प्रतिष्ठित सुवर्णशंख पुरस्कार मिळाला आहे. डच दिग्दर्शिका, अॅलीओना व्हॅन देर होर्स्त यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केलं असून, इल्जा रोमन्स यांनी निर्मिती केली आहे.
हा माहितीपट, एका रशियन सैनिकाची कथा सांगतो, ज्याला नाझी सैनिकांनी युद्धकाळात पकडले होते. आंतरराष्ट्रीय ज्यूरीने या चित्रपटालं प्रशस्तीपत्र देतांना हे आवर्जून नमूद केले आहे की, या चित्रपटात दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित अनेकांच्या वैयक्तिक कथा अशाप्रकारे सादर केलेल्या आहेत, ज्यातून प्रेक्षक विचारप्रवृत्त होतात. यासाठी त्यांनी पुरातन साहित्याचा अभिनव पद्धतीने विचार केला आहे. अत्यंत संवेदनशील हाताळणी आणि उत्तम पद्धतीमुळे, हा सिनेमा सर्वोत्तम ठरला आहे. सुवर्णशंख, 10 लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार,(45 मिनिटांपर्यंत) रौप्य शंख, भरतातील ‘साक्षात्कारम’ या मल्याळी आणि आणि फारो बेटांवरील ‘ब्रदर ट्रोल’ या लघुपटांना विभागून मिळाला आहे. सुदेश बालन यांनी ‘साक्षात्कारम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून मुंबई आयआयटीने त्याची निर्मिती केली आहे. ‘ब्रदर ट्रोल’ या लघुपटाचं दिग्दर्शन गुडमुंड हेल्सम्सडल यांनी केलं असून निर्मिती गुडमुंड हेल्सम्सडल, सोलवा स्वार्ताफोस यांची आहे. रौप्य शंख, अडीच लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरुप आहे.
साक्षात्कारम ही कथा, उतारवयात आपली पत्नी गमावलेल्या व्यक्तीच्या आत्मशोधाची हृदय हेलावून टाकणारी कथा आहे. धर्म, देशांच्या सीमा भेदून केवळ मानवतेला साद घालणाऱ्या या कथेत केवळ नितळ मानवी भावना अधोरेखित करण्यात आल्या आहेत. ‘लघुपटातील दोन्ही कुटुंबांच्या भावना अत्यंत शांतपणे आणि अप्रतिम हळुवारपणे दाखवल्या आहेत, असे ज्यूरी सदस्यांनी नमूद केले.
तर ‘ब्रदर ट्रोल’ या लघुपटात, चित्रपटनिर्मितीच्या सर्व तंत्राचा अत्यंत ताकदीने वापर करण्यात आला आहे. तसेच, फारो बेटांवरील सुरेख निसर्गसौंदर्य आणि संस्कृती देखील या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. दोन भावांमधील नातेसंबंध यात हळुवारपणे दाखवण्यात आला आहे, असं ज्यूरीने म्हटले आहे.
सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पटाचा रौप्य शंख पुरस्कार पोलंडच्या ‘प्रिन्स इन ए पेस्ट्री शॉप’ या अॅनिमेशनपटाला मिळाला आहे. कातारझायन अगोपोवीस्ज यांनी दिग्दर्शन केलं असून एवेलिना गोऱ्दजहेजुक यांनी निर्मिती केली आहे. रौप्य शंख, पाच लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
अॅनिमेशनपटाचे मूळ स्वरुप, सृजनात्मकता, कल्पनाशक्ति आणि अत्यंत कलात्मक सादरीकरण हे ‘आनंद नेमका कशात असतो’, या एका तत्वज्ञानाशी संबंधित विषयाला स्पर्श करणारे आहे.
इटालियन चित्रपटकर्मी निकोला पिव्होसन दिग्दर्शित आणि निर्मित ‘क्लोज्ड टू द लाइट’ला आंतरराष्ट्रीय श्रेणीतील ‘प्रमोद पती- सर्वोत्तम अभिनव /प्रायोगिक चित्रपट’ साठी विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला. 1944 च्या उन्हाळ्यात इटलीमध्ये निष्पाप शेतमजुरांच्या बळीची शोकांतिका या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे एक लाख रुपये रोख , चषक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
त्याशिवाय ज्यूरी विशेष उल्लेखनीय चित्रपटाचे प्रशस्तीपत्र पुरस्कार, भारतातील ‘घर का पता’, आणि ‘लॅपचेस आर व्हानिशिंग’ या लघुपटांना मिळाला आहे. ‘घर का पता’ चे दिग्दर्शन मधूलिका जलाली यांनी केले असून, निर्मिती नवनीत कक्कर यांची आहे. तर ‘लॅपचेस आर व्हानिशिंग’ चे दिग्दर्शन अभ्युदय खेतान यांनी केले असून निर्मिती फिल्म्स डिव्हिजनची आहे.
मीना रॅड (फ्रान्स), एस. नल्लमुथू (भारत), अनंत विजय (भारत), जॉन पिएर सेरा (फ्रान्स) आणि डॅन वॉलमन (इस्राएल) या मान्यवरांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागासाठी परीक्षक म्हणून काम पहिले.
राष्ट्रीय स्पर्धा गट चित्रपट पुरस्कार
राष्ट्रीय स्पर्धा गटातील चित्रपटाच्या 60 मिनिटांवरील माहितीपट पुरस्कार
राष्ट्रीय स्पर्धा गटातील चित्रपटाच्या 60 मिनिटांवरील माहितीपट पुरस्कार
‘अॅडमिटेड’ या ओजस्वी शर्मा यांच्या माहितीपटाला मिळाला आहे. पिनाका मिडिया वेव्ह्ज एल एलपी, सुनील शर्मा, संगीता शर्मा यांनी या माहितीपटाची निर्मिती केली आहे. रौप्य शंख, पाच लाख रुपये रोख, आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
कथासार
समाजात, ज्या विषयावर फारसे बोलले जात नाही, अनेक कुटुंबांसाठी जो लज्जेचा, संकोचाचा विषय ठरतो, अशा विषयावर माहितीपट तयार करणे. आणि विशेषतः अशा नाजुक विषयाची हाताळणी अत्यंत संयतपणे,हळुवारपणे केल्याबद्दल, ह्या पुरस्कारासाठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. माहितीपटातील प्रमुख व्यक्तिरेखेच्या प्रभावी चित्रणाची ज्यूरी सदस्यांनी विशेष दखल घेतली आहे.
राष्ट्रीय स्पर्धा गटातील चित्रपटाच्या 60 मिनिटांपर्यंतचा माहितीपट पुरस्कार
राष्ट्रीय स्पर्धा गटातील चित्रपटाच्या 60 मिनिटांपर्यंतचा माहितीपट पुरस्कार या गटातील सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार, भारतातीलच, ‘स्क्रीमिंग बटरफ्लाईज या माहितीपटाला मिळाला आहे. आसामी अभिनेत्री अॅमी बरूआ यांनी ह्या माहितीपटाचे दिग्दर्शन केले असून, निर्मिती माला बरूआ यांची आहे. रौप्य शंख, पांच लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
कथासार
वेगवेगळ्या धर्मात विवाह करणाऱ्या लोकांना समाज आणि कुटुंबांकडून काय त्रास होतो, याचे बेधडक वर्णन या माहितीपटात आहे. अशा विवाहामुळे अत्याचारांना बळी पडलेल्या पीडितांनी अतिशय धाडस करुन, कॅमेरासमोर येत आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पटाचा राष्ट्रीय पुरस्कार
राष्ट्रीय पुरस्कारांच्या गटात, सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पटाचा पुरस्कार, भारताच्या कंडीट्टून्दु (सीन इट) या अॅनिमेशन पटाला मिळाला आहे. आदिती कृष्णदास यांनी याचे दिग्दर्शन केले असून, नीलिमा एरियात यांनी निर्मिती केली आहे. रौप्य शंख, तीन लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सर्वोत्तम अॅनिमेशन पटाच पुरस्कार कंडीट्टून्दु ला देण्याचे कारण, केरळ मधील एका फॅन्टसी कथेला ज्या विनोदी प्रकारे या अॅनिमेशन मध्ये गुंफले आहे, ते अत्यंत मनोरंजक आहे. त्याशिवाय यात वापरण्यात आलेले अॅनिमेशनचे तंत्र देखील त्यांचे स्वतःचे असून शैली पूर्णपणे स्वतंत्र आहे.
दादासाहेब फाळके चित्रनगरी सर्वोत्कृष्ट पदार्पण -दिग्दर्शन पुरस्कार
दादासाहेब फाळके चित्रनगरीचा सर्वोत्कृष्ट पदार्पण -दिग्दर्शनाचा पुरस्कार, भारतातील “राधा’ या अॅनिमेशन पटाचे दिग्दर्शक, बिमल पोद्दार यांना मिळाला आहे. एक लाख रुपये, चषक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा आयडीपीए पुरस्कार
आयडीपीए तर्फे दिला जाणारा, विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पुरस्कार, अॅनिमेशन पट, ‘मेघा’ ला देण्यात आला आहे. एक लाख रुपये, चषक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ऋषि भौमिक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
कौटुंबिक पातळीवर,सहसा हाताळल्या न जाणाऱ्या गंभीर विषयाची अॅनिमेशन पटासाठी निवड करणे, आणि त्यानुसार, ही संकल्पना अधिक स्पष्ट करण्यासाठी, विशेष रंगांची निवड करणे, अशा सगळ्या कारणांमुळे ह्या पुरस्कारासाठी ‘मेघा’ ची निवड करण्यात आली आहे.
तांत्रिक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण:
आंतरराष्ट्रीय पुरस्कार
सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, जर्मनीच्या ‘अमंग अस विमेन’ या चित्रपटाचे छायाचित्रकार बर्नार्दो कोर्न्जेओ पिंटो यांना मिळाला आहे. अमंग अस विमेन’ चित्रपटाची कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात छायाचित्रकाराची भूमिका महत्वाची आहे. यातली छायाचित्रणाची सहजशैली, आणि प्रेक्षकांची पकड घेणाऱ्या प्रतिमा नैसर्गिक उजेडात शूट केल्याने, त्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात.
राष्ट्रीय पुरस्कार
भारतातील ‘ईफ मेमरी सर्वज मी राईट’ या माहितीपटासाठी छायाचित्रकार रफीक ईलियास यांना हा पुरस्कार मिळाला आहे . दीड लाख रुपये रोख , चषक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ’ईफ मेमरी सर्वज मी राईट’ साठी रफीक ईलियास यांनी वापरलेली दृश्ये आणि प्रतिमा अत्यंत सहजपणे कॅमेरात टिपल्या आहेत. त्यामुळे, प्रेक्षकांना मुख्य व्यक्तिरेखेबाबत सहअनुभूती वाटू लागते.
सर्वोत्कृष्ट ध्वनिरचना:
आंतरराष्ट्रीय पुरस्कार
सर्वोत्कृष्ट ध्वनीरचनेचा पुरस्कार, पनामाच्या ‘फॉर युवर पीस ऑफ मेक युवर ओन म्युझियम’ या लघुपटांसाठी जोस रोमर यांना मिळाला आहे. फॉर युवर पीस ऑफ मेक युवर ओन म्युझियमसाठी वापरण्यात आलेली ध्वनिरचना अत्यंत प्रभावी ठरली आहे. ज्यामुळे, मुख्य व्यक्तिरेखा आणि तिचे जग यातील आत्मीयता प्रेक्षकांपर्यंत अधिक उत्कटतेने पोहोचते.
राष्ट्रीय पुरस्कार
भारतातील किकिंग बॉल्स साठी प्रीतम दास यांना हा पुरस्कार मिळाला आहे. दीड लाख रुपये, चषक आणि प्रशस्तीपत्र असे ह्या पुरस्काराराचे स्वरुप आहे.
सर्वोत्कृष्ट संकलन :
आंतरराष्ट्रीय पुरस्कार
सर्वोत्कृष्ट संकलनासाठीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार भारतातील ‘धोबी घाट’ या माहितीपटाचे चे संकलक, एस. षन्मुगानन्द यांना मिळाला आहे. दिड लाख रुपये, चषक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
“सर्जनशील आणि जिवंत संकलनाद्वारे, धोबीघाटातील जीवनाची लय संकलकाने पकडली आहे. इथले जीवन आणि रहिवाश्यांवरील मोठ्या प्रमाणात वाढणारी अनिश्चितता देखील संकलकाने दृश्यात कैद केली आहे" असे ज्युरींनी सांगितले.
राष्ट्रीय पुरस्कार
सर्वोत्कृष्ट संकलनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार ‘बांबू बॅलेड्स’ या माहितीपटाचे संकलक साजेद पी. सी. यांना मिळाला आहे. दिड लाख रुपये, चषक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
"सर्वोत्कृष्ट संपादकाचा पुरस्कार साजेद पी सी यांना 'बांबू बॅलाड्स' साठी त्यांच्या चपखल आणि प्रवाही संकलनासाठी देण्यात आला आहे. सहज संकलनाने चित्रपट योग्य रीतीने पुढे जाण्यास मदत होते आणि त्यामुळे एकूणच उत्कृष्टतेत भर पडते", असे ज्युरींचे निरीक्षण आहे.
मिफ्फची सविस्तर बातमी बघण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
* * *
PIB MIFF Team | JPS/R.Aghor/V.Ghode/S.Kakade/Darshana/MIFF-60
चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !
|
#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?
|
जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.
|
कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट उपलब्ध झाल्यावर बघता येतील.
|
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1831139)
Visitor Counter : 457