माहिती आणि प्रसारण मंत्रालय

सतरावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मिफ्फ-2022 ची आज शानदार कार्यक्रमाने सांगता


सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा सुवर्णशंख पुरस्कार नेदरलँड्सच्या अॅलीओना व्हॅन देर होर्स्त दिग्दर्शित ‘टर्न युअर बॉडी टु द सन’ या माहितीपटाला

मल्याळम लघुपट ‘साक्षात्कारम’ आणि फारो लघुपट ‘ब्रदर ट्रोल’ या लघुपटांना यंदाचा रौप्यशंख पुरस्कार ;पोलंडचा चित्रपट ‘प्रिन्स इन ए पेस्ट्री शॉप’ ठरला यंदाच्या मिफ्फ चा सर्वोत्तम अॅनिमेशनपट

विजेत्या चित्रपटांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच केंद्रीय मंत्री डॉ.एल.मुरुगन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

माहितीपट आणि लघुपट प्रेक्षकांसाठी नाही, तर स्वतःच्या आनंदासाठी बनवले जातात, म्हणूनच ते अधिक सृजनशील आणि अस्सल असतात- श्याम बेनेगल

Posted On: 04 JUN 2022 7:45PM by PIB Mumbai

मुंबई, 4 जून 2022

 

मुंबईत गेले सात दिवस सुरु असलेल्या मिफ्फ-2022 या, माहितीपट,लघुपट आणि अॅनिमेशनपटांना समर्पित, सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दिमाखदार सोहळ्यात समारोप झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन तसेच सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते पद्मभूषण श्याम बेनेगल हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, माहिती प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई आणि फिल्म्स डिव्हिजनचे व मिफ्फचे संचालक रविंद्र भाकर देखील यावेळी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय श्रेणीतील पुरस्कारांचे वितरण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

या महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हणून अॅलीओना व्हॅन देर होर्स्त यांच्या ‘टर्न युअर बॉडी टु द सन’ या चित्रपटाचा सुवर्णशंख, प्रशस्तीपत्र आणि 10 लाख रुपये देऊन गौरव करण्यात आला.

या चित्रपट महोत्सवात सादर झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपटांमधून परीक्षकांनी विजेत्या चित्रपटांची निवड केली. पोलंडच्या कातारझायन अगोपोवीस्ज यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘प्रिन्स इन ए पेस्ट्री शॉप’ या अॅनिमेशनपटाला सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपटासाठीचा पुरस्कार देण्यात आला. रौप्यशंख, प्रशस्तीपत्र  आणि 5 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार,(45 मिनिटांपर्यंत)  रौप्य शंख, भारतातील ‘साक्षात्कारम’ या मल्याळी आणि आणि फारो बेटांवरील ‘ब्रदर ट्रोल’ या लघुपटांना विभागून मिळाला आहे. सुदेश बालन यांनी ‘साक्षात्कारम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून मुंबई आयआयटीने त्याची निर्मिती केली आहे.  

या महोत्सवामध्ये उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, या 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय श्रेणीत विजेते ठरलेल्या सर्व चित्रपटांचे आणि त्यांच्याशी संबंधित सर्वांचे मी अभिनंदन करतो. मी स्वतः चित्रपटांचा फारसा चाहता नसलो तरीही मला चित्रपट विश्वाविषयी अत्यंत आदर आहे. कॅमेराच्या माध्यमातून नेहमीचे जग आणि  व्यक्ती यांना वेगळेच स्वरूप दिले जाते. या महोत्सवात 800 हून अधिक चित्रपट दाखविण्यात आले. अत्यंत साध्या घटना आणि व्यक्तींच्या माध्यमातून आपले चित्रपट निर्माते अत्यंत अभिनव जग उभे करतात. खरेतर अनेकदा हे अॅनिमेशनपट, माहितीपट तसेच लघुपट कमी वेळात फार मोठा संदेश देणारे असतात. हे सर्व चित्रपट समाजाचा आरसाच असतात आणि केवळ मनोरंजनापेक्षा या प्रकारच्या चित्रपटांनी समाजाच्या हिताचे, सुधारणेचे कार्य करावे, समाजाला प्रेरणा देण्याचे तसेच अज्ञान दूर करण्याचे कार्य करावे. येत्या काळात आपले चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांकडे असलेली कल्पनाशक्ती, दूरदृष्टी तसेच प्रतिभा यांचा योग्य वापर केला जावा आणि समाजासाठी काही भरीव कार्य केले जावे अशी अपेक्षा मी व्यक्त करतो, असे राज्यपाल म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यावेळी म्हणाले की, “मोठे, पूर्ण लांबीचे चित्रपट बनवतांना, प्रेक्षकांचा विचार केला जातो. मात्र, जेव्हा माहितीपट, लघुपट तयार केले जातात, तेव्हा तुम्ही प्रेक्षकांचा विचार करुन सिनेमे बनवत नाही. तुम्हाला वाटते, तुम्हाला काहीतरी सांगायचे असते,  म्हणून तुम्ही हे माहितीपट बनवता. म्हणून ते स्वतःच्या आनंदासाठी असतात म्हणूनच अधिक, सृजनात्मक आणि अस्सल असतात. हेच माहितीपटांचे वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच ते महत्वाचे ठरतात”. इथे येणारे युवक उत्साहाने असे माहितीपट बनवत असतात, हे कौतुकास्पद आहे, या माहितीपट-लघुपटांचे महत्व पैशांत मोजता येणार नाही असे बेनेगल यांनी सांगितले. मिफ्फमुळे अशा माहितीपटांना उत्तम व्यासपीठ मिळाले आहे, तसेच आज माहितीपट, लघुपट निर्मात्यांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म सारखी नवी माध्यमे देखील उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय ज्यूरी सदस्यांच्या प्रतिनिधी म्हणून मीना राड यांनी आपला अनुभव विशद केला. फिल्म्स डिव्हिजन हे चित्रपटांसाठी एक सशक्त मंच आणि बाजारपेठ ठरले आहे.  या सात दिवसांत सिनेमाप्रेमींना उत्सुकतेने सिनेमा बघतांना, त्याविषयी चर्चा करतांना, अनुभवी सिनेनिर्मात्यांशी चर्चा करतांना पहिले, हा उत्साह आणि शिकण्याची जिद्द कौतुकास्पद होती .सर्वच सिनेमांची गुणवत्ता अत्यंत उत्तम होती, असे त्या म्हणाल्या. मिफ्फच्या संपूर्ण चमूने उत्तम आयोजन केले होते. ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचे अभिनंदन, ज्यांना नाही मिळाले, त्यांनाही शुभेच्छा, तुमचेही काम उत्तम होते, असे त्यांनी सांगितले. हा महोत्सव दरवर्षी व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

केंद्रीय राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांच्या हस्ते राष्ट्रीय श्रेणीतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. आदिती कृष्णदास यांच्या कंडीट्टून्दु (सीन इट).या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपटासाठीचा पुरस्कार देण्यात आला. रौप्यशंख, प्रशस्तीपत्र  आणि 3 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 45 मिनिटांपर्यंतच्या कालावधीच्या सर्वोत्कृष्ट रौप्यशंख लघुपटाचा पुरस्कार एमी बरुआ यांच्या ‘स्क्रीमिंग बटरफ्लाइज’ या माहितीपटाला मिळाला. पुरस्कारस्वरूप रौप्यशंख, प्रशस्तीपत्र  आणि 5 लाख रुपये प्रदान करण्यात आले.  तर 60 मिनिटांहून अधिक कालावधीच्या माहितीपटांच्या श्रेणीत ओजस्वी शर्मा दिग्दर्शित ‘अॅडमिटेड’ माहितीपटाची सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हणून निवड करण्यात आली आणि त्याबद्दल पुरस्कार म्हणून रौप्यशंख, प्रशस्तीपत्र  आणि 5 लाख रुपये प्रदान करण्यात आले. सृष्टीपाल सिंग दिग्दर्शित ‘गेरू पत्र' ने राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट  लघुपटासाठीचा (45मिनिटांपर्यंत) रौप्य शंख पुरस्कार पटकावला.

या पुरस्कार वितरण सोहोळ्यात विशेष पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात आले. यावेळी निकोला पिव्होसन दिग्दर्शित ‘क्लोज्ड टू द लाइट’ या चित्रपटाला प्रमोद पती विशेष परीक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाला सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र  आणि एक लाख रुपये देऊन गौरविण्यात आले

यावेळी बोलतांना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन म्हणाले,“नवतंत्रज्ञानाने नवी कवाडे खुली झाली असली तरी ही साधने असून चित्रपटाच्या मूळ तत्त्वाशी, अनुभूतीशी तडजोड करण्यात येऊ नये.

अत्यंत कमी कालावधीत उत्तम आशय मांडता येतो, हे गेल्या सात दिवसात दाखवण्यात आलेल्या लघुपट, अॅनिमेशनपट आणि माहितीपटांनी सिद्ध केले आहे, असे कौतुक मुरुगन यांनी केले. कलात्मक ,वास्तवदर्शी, प्रेरणा देणारे, आत्म्याला स्पर्शून जाणारे चित्रपट महोत्सवादरम्यान पाहायला मिळाले. भारतीय चित्रपटांची कीर्ती जागतिक स्तरावर अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी,यासाठी,त्याच्या व्याप्तीसाठी, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर अविरत प्रयत्नशील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 'रिफॉर्म, परफॉर्म अँड ट्रान्सफॉर्म 'मंत्रानुसार मंत्रालयाची वाटचाल सुरू असून आपले प्रतिभावंत चित्रपटकर्मीही या मंत्राचे अनुसरण करून आपले उद्दिष्ट गाठतील आणि नवी यशोशिखरे गाठतील,असा विश्वास डॉ. मुरुगन यांनी यावेळी व्यक्त केला. मिफ्फ २०२२ मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक चित्रपटकर्मीसाठी हा महोत्सव मैलाचा दगड ठरेल, असे ते म्हणाले.

यावर्षीच्या पुरस्कारांसाठी राष्ट्रीय परीक्षक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळ यांच्या सदस्यांनी तंत्रज्ञानविषयक श्रेणीतील पुरस्कार संयुक्तपणे देण्याचा निर्णय घेतला. त्या श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजन, सर्वोत्कृष्ट संकलन तसेच सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठीचे  पुरस्कार देखील मुरुगन यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना, सर्वोत्कृष्ट संकलनतसेच सर्वोत्कृष्ट छायाचित्रणासाठी हे पुरस्कार देण्यात आले.

सुप्रसिद्ध चित्रपट निर्माणे श्याम बेनेगल आणि आयडीपीए चे अध्यक्ष रजनी आचार्य यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाला आयपीडीए पुरस्कार प्रदान करण्यात आला.  दादासाहेब फाळके चित्रनगरीचा सर्वोत्कृष्ट पदार्पण -दिग्दर्शनाचा पुरस्कार, भारतातील “राधा’ या अॅनिमेशन पटाचे दिग्दर्शक, बिमल पोद्दार यांना देण्यात आला.

राष्ट्रीय स्पर्धा गटांसाठीच्या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष, संजित नार्वेकर यांनी यावेळी ज्यूरी मंडळाचे प्रतिनिधी म्हणून आपले मत मांडले. परीक्षक म्हणून आम्हाला, इथे देशातले सर्वोत्तम माहितीपट, लघुपट, माहितीपट बघण्याची संधी मिळाली. एकूण 67 सिनेमे पहिले. विशेष जाणवलेली गोष्ट म्हणजे, पहिल्यांदा लघुपट तयार करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. माहितीपटांची संख्या कमी होती अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सिनेमांची संख्या केवळ पांच होती, हे निराशाजनक होते, असे सांगत ती वाढवायला हवी असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या चित्रपटासाठी वेगळा विभाग पूर्वी होता, तो पुन्हा सुरु करायला हवा, अशी सूचना त्यांनी केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला, मिफ्फचे संचालक रविंद्र भाकर यांनी  या महोत्सवाची माहिती देणारा अहवाल उपस्थितांसमोर सादर केला.

कोरोना महामारीनंतरचा हा पहिला महोत्सव संपन्न झाला आणि तो खरोखरच यशस्वीपणे पार पडला, अशा शब्दांत भाकर यांनी समाधान व्यक्त केले. या महोत्सवाचे यश म्हणजे, भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीला दिलेली मानवंदना असल्याचे ते म्हणाले. माहितीपटांच्या बाजारपेठेसाठी एक अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षीच्या हायब्रिड महोत्सवात जवळपास 380 चित्रपट दाखवण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमात मिफ्फ-2022ची ठळक वैशिष्ट्ये सांगणारी एक लहान चित्रफीत देखील सादर करण्यात आली.

गान कोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी यावेळी नॉर्दन लाईट्स या कलापथकातर्फे रंगमंचावर नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

मिफ्फमधील सर्व पुरस्कारांची सविस्तर बातमी बघण्यासाठी या लिंक वर क्लिक करा

 

* * *

PIB MIFF Team | R.Aghor/S.Chitnis/S.Kakade/Darshana/MIFF-61

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1831183) Visitor Counter : 297


Read this release in: English