माहिती आणि प्रसारण मंत्रालय
अनुराग ठाकूर यांनी दूरदर्शन न्यूज कॉन्क्लेव्हचे उद्घाटन केले
गेल्या 60 वर्षांपेक्षा 8 वर्षे चांगली आहेत : अनुराग ठाकूर
"जेएएम त्रिसूत्रीने भ्रष्ट दलालांची व्यवस्था उद्ध्वस्त केली, 2 लाख कोटी रुपयांची बचत केली "
कोविड मृत्यू नोंदणी एक मजबूत प्रणाली आहे, कमी मृत्यू नोंदवण्यास वाव नाही
कोविड महामारीच्या काळात 50 युनिकॉर्न तयार झाले, भारताचा आता अव्वल 3 स्टार्टअप राष्ट्रांमध्ये समावेश
Posted On:
03 JUN 2022 8:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जून 2022
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज सरकारच्या 8 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त डीडी न्यूज कॉन्क्लेव्हचे उद्घाटन केले. उदघाटन सत्रात गेल्या 8 वर्षात सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांच्या पैलूंवर मंत्र्यांबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली. या महत्वपूर्ण चर्चेत अर्थव्यवस्था आणि देशाची सद्यस्थिती यावरील प्रश्नांचा समावेश होता.
ठाकूर म्हणाले की, भारताच्या दुर्गम भागात विकासाची बीजे पेरण्यासाठी सरकार सक्षम आहे. दारिद्र्यरेषेच्या वर आणलेल्या लोकांच्या ऐतिहासिकदृष्ट्या सर्वोच्च संख्येवरून हे स्पष्ट होते, ही गेल्या 8 वर्षातील उत्कृष्ट कामगिरी आहे. "गेल्या अनेक दशकांत जे केले गेले नाही ते सरकारने गेल्या 8 वर्षांत साध्य करून दाखवले आहे," असे ठाकूर यांनी नमूद केले.
ठाकूर यांनी अधोरेखित केले की 12 कोटींहून अधिक शौचालये आणि 3 कोटींहून अधिक घरांचे बांधकाम, गेल्या केवळ 3 वर्षात 45% घरांना पाईपद्वारे पाण्याची जोडणी, 9 कोटींहून अधिक स्वयंपाकघरांना गॅस जोडणी , सर्व गावांना आणि घरांना वीज पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे भारतातील गरीब लोकांसाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत आणि सरकारने सुशासनात नवीन मानके प्रस्थापित केली आहेत, असेही ठाकूर म्हणाले. सरकारच्या एकूण कामगिरीचे वर्णन त्यांनी “साठ से बेहतर आठ” (60 वर्षांपेक्षा 8 वर्षे चांगली) असे केले.
ठाकूर पुढे म्हणाले की, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी झाली आहे. 2 वर्षात 45 कोटी बँक खाती उघडण्यात आली, परिणाम स्वरूप आज भारत भीम युपीआयवर महिन्याला 4 अब्ज पेक्षा जास्त व्यवहार करत आहे, या कामगिरीने जगभरातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना अचंबित केले आहे. यामुळे कोणताही देश जे करू शकला नाही ते भारताने साध्य करून दाखवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बटण दाबून 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 21 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले. “जेएएम (जनधन-आधार-मोबाइल) या त्रिसूत्रीने लाभ हस्तांतरण योजनांमध्ये मध्यस्थांकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराची व्यवस्था हद्दपार केली आहे. यामुळे करदात्यांची 2 लाख कोटी रुपयांहून अधिक बचत झाली आहे,” असे ठाकूर म्हणाले.
महागाईबाबत बोलताना ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत जगाने अनेक शोकांतिका पाहिल्या आहेत. रशिया-युक्रेन संघर्षामुळे पुरवठा साखळीत व्यत्यय आल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी वाढ झाली आहे. "या कठीण काळात बाह्य घटकांवरील अवलंबत्व दूर करण्यासाठी मोदी सरकारने भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प केला ", असे ते म्हणाले. हा संकल्प त्वरीत कृतीत आणला आणि भारताने 10 लाख पीपीई किट तयार करण्यास सुरुवात केली . कोविड महामारीच्या सुरुवातीला एकही पीपीई किट तयार केले जात नव्हते. त्यानंतर देशांतर्गत उत्पादित औषधे आणि लसींचे वितरण करण्यात भारताने जगाचे नेतृत्व केले. आज महामारीचे परिणाम सोसूनही भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असे ठाकूर म्हणाले.
कोविड मृत्यूसंख्या कमी नोंदवण्यात आल्याच्या आरोपांचे खंडन करताना ते म्हणाले की राज्यांकडून मृत्यूचे आकडे नोंदवले जातात आणि सर्व मृत्यूंची नोंदणी करून मृत्यूची प्रमाणपत्र जारी केली जातात. मृत्यूच्या नोंदणीच्या मजबूत प्रणालीमुळे मृत्यूसंख्या कमी नोंदवणे शक्य नाही. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत परदेशी संस्थेद्वारे मृत्यूची वाढीव संख्या निराधार असून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा उद्देश असल्याचे सांगून फेटाळली होती याचीही त्यांनी आठवण करून दिली.
स्टार्टअप्स क्षेत्रातील कमगिरीबाबत ते म्हणाले की, आधीच्या सरकारच्या काळात स्टार्टअप कल्पनेकडे दुर्लक्ष करण्यात आले . मात्र सध्याच्या सरकारने स्टार्टअप्सवर लक्ष केंद्रित केले . सरकारच्या धोरणांमुळेच भारत आज अव्वल 3 देशांमध्ये आहे. कोविड महामारीच्या काळात केवळ भारतातच 50 स्टार्टअप्स युनिकॉर्न उदयाला आले आणि हे नवभारताचे प्रतीक आहे असे ते म्हणाले. जगामध्ये भारताच्या सध्याच्या प्रतिमेबद्दल बोलताना ते म्हणाले की, आज भारतीय अभिमानाने सांगू शकतात की गेल्या 8 वर्षातले सरकार निष्कलंक आहे, भारतीय पासपोर्टचा पूर्वीपेक्षा अधिक मान राखला जात आहे, अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. कोविड- 19 सारख्या संकटांना वेगाने प्रतिसाद दिला जात आहे.
राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्यांवर सरकारने ठोस भूमिका घेतली आहे. यामध्ये सीमेपलीकडून चालणाऱ्या सोशल मीडिया प्रचार वाहिन्यांविरोधात कठोर कारवाईचा समावेश आहे.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1830956)
Visitor Counter : 144