माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वन्यजीवनावर आधारित चित्रपट निर्मिती केवळ एक व्यवसाय नसून ती एक जबाबदारी आहे: राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते सुबय्या नल्लमुथु


“वन्यजीवनविषयक चित्रपट निर्मिती क्षेत्रात येणाऱ्या बहुतेक तरुणांमध्ये या जबाबदारीच्या भावनेचा अभाव दिसून येतो”

Posted On: 02 JUN 2022 9:10PM by PIB Mumbai

मुंबई, 2 जून 2022  

 

वन्यजीवनावर आधारित चित्रपट निर्मिती म्हणजे केवळ एक करियर किंवा व्यवसाय नसून ती एक जबाबदारी आहे आणि अनेकदा अशी जबाबदारी प्रत्येकाला पेलवत नाही असे परखड मत, वन्यजीवनविषयक चित्रपट निर्माते सुबय्या नल्लमुथु यांनी व्यक्त केलं.म्हणूनच, आपण प्रत्येकाला वन्यजीवनविषयक चित्रपट निर्मिती क्षेत्रात येण्याचा आग्रह करणार नाही असे ते पुढे म्हणाले. मिफ्फ 2022 अर्थात 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित मार्गदर्शनपर वर्गात ते बोलत होते.

वन्यजीवनविषयक चित्रपटांच्या निर्मितीच्या आव्हानाचा तपशील विशद करताना ते म्हणाले, या क्षेत्रात रंजक कथा मिळणे आणि ती उत्तमरीत्या आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविता येणे हा यातील सगळ्यात कठीण भाग असतो. “आंतरराष्ट्रीय स्त्रोतांकडून असे जबाबदारीचे प्रकल्प मिळवणे खूप कठीण काम असते. माझेही बरेचसे प्रकल्प स्वतःच्या पैशांतून मी का निर्माण केले आहेत, याचे हे ही  एक कारण आहे.

आज चित्रीकरणासाठी परवानगी मिळविणे, वन्यजीव कल्याण मंडळाकडून मंजुरी घेणे आणि चित्रीकरणासाठी अत्यंत उत्तम दर्जाची अत्याधुनिक साधने भाडेतत्वावर मिळविणे अशी अनेक आव्हाने या क्षेत्रातील निर्मात्यांसमोर आहेत, असे त्यांनी सांगितले..

वन्यजीवनविषयक चित्रपटांच्या निर्मितीच्या आर्थिक पैलूंना स्पर्श करताना सुबय्या नल्लमुथु म्हणाले की, त्यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये झालेली गुंतवणूक परत मिळविण्यात त्यांना यश मिळाले असले तरीही  त्याची नेहमीच खात्री देता येत नाही. ते पुढे म्हणाले की, वन्यजीवनावर आधारित माहितीपट निर्माण करणे हा मोठा जुगार आहे.

सुबय्या यांचा पुरस्कारप्राप्त माहितीपट ‘द वर्ल्ड्स मोस्ट फेमस टायगर’ तयार करताना आलेल्या अनुभवांविषयी बोलताना ते म्हणाले की या कामासाठी एकाच कॅमेऱ्याचा वापर करून अडीचशे तासांचे चित्रीकरण करण्यात आले. “या माहितीपटातील घटनाक्रमासाठी योग्य दृश्ये चित्रित करणे, त्यांची जोडणी करणे आणि त्यातून चित्रपटाची कथा साकार करणे हे मोठे आव्हान होते. या चित्रपटातील 90% ध्वनीफिती निर्मितीपश्चात काळात जोडण्यात आल्या आणि वन्यजीवनातील केवळ 10%  आवाज प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या दरम्यान रेकॉर्ड करण्यात आले,” असे त्यांनी सांगितले.

तरुण वर्गावर काहीशी टीकात्मक टिप्पणी करत सुबय्या नल्लमुथु म्हणाले की या तरुणांच्या हातात त्यांचे डीएसएलआर कॅमेरे असतात, त्यांना असे वाटत असते की हे कॅमेरे घेऊन ते तरुण जंगलात जातील, ऑटो मोडवर काहीतरी छायाचित्रीत करतील आणि सहा महिन्यांत उत्तम पैसे मिळवतील. पण हे शक्य नाही. जगात अशी कोणतीही परिपूर्ण कथा नसते, आणि अशी कथा विकत घेण्यात कोणालाही रस नसतो. या प्रक्रियेत अनेक जबाबदाऱ्या आणि अनेक टक्केटोणपे यांचा समावेश असतो. दुर्दैवाने, आपल्या तरुणांमध्ये अशा प्रकारच्या जबाबदारीच्या भावनेचा अभाव दिसून येतो असे ते म्हणाले.    

माहितीपटासाठी रॉयल बेंगॉल जातीचा वाघ हा विषय निवडण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना सुबय्या म्हणाले की, वाघ हा अत्यंत अद्भुत प्राणी आहे, म्हणून त्याच्यावर आधारित कथेला मागणी येईल आणि त्यामुळे, या माहितीपटाच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतविलेला पैसा परत मिळण्यास मदत होईल अस विचार त्यांनी केला. “मात्र, मी इतर प्राण्यांवर आधारलेल्या पुरस्कारविजेत्या माहितीपटांची निर्मितीदेखील केली आहे.  बहुतांश लोकांना त्याबद्दल काही माहिती नाही”. वाघांवर आधारलेला एक संपूर्ण लांबीची फिचर फिल्म तयार करण्याची त्यांची योजना देखील त्यांनी सर्वांसमोर सांगितली.

आजच्या मार्गदर्शनपर वर्गात सुबय्या यांच्या ‘द वर्ल्ड्स मोस्ट फेमस टायगर’ या माहितीपटाचे सादरीकरण देखील करण्यात आले.

 

* * *

PIB MIFF Team | R.Aghor/S.Chitnis/Darshana/MIFF-51

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1830640) Visitor Counter : 173


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil