पंचायती राज मंत्रालय
पंतप्रधानांनी शिमला येथे येथे आयोजित ‘गरीब कल्याण संमेलना’ला संबोधित केले
महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसह केंद्रीय मंत्री आणि लोकप्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी
Posted On:
31 MAY 2022 4:59PM by PIB Mumbai
मुंबई 31 मे 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशातील शिमला येथे आयोजित ‘गरीब कल्याण संमेलना’ला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा आठ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त, देशभरात राज्यांच्या राजधानीची शहरे, जिल्हा मुख्यालये आणि कृषी विज्ञान केंद्रांमध्ये या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत जनतेकडून अभिप्राय मिळविण्याच्या उद्देशाने लोकनियुक्त जन प्रतिनिधींनी जनतेशी संवाद साधावा या संकल्पनेनुसार केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील आज मुंबई येथून शिमला येथे होत असलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचे सुमारे 2000 लाभार्थी देखील मुंबई येथून या कार्यक्रमात सहभागी झाले. या प्रसंगी बोलताना, केंद्रीय राज्यमंत्री पाटील म्हणाले, “जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अथकपणे काम करीत आहेत आणि त्यांच्या कार्यातून त्यांनी नव्या भारताचा एक नवा चेहेरा आणि लोकांच्या मनात एक नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे.” 75 वर्षांच्या काळात जे साध्य झाले नाही ते या सरकारने करून दाखविले आहे असे ते पुढे म्हणाले. या प्रसंगी, महाराष्ट्रातील लोक प्रतिनिधींसह, सरकारी योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महत्त्वाच्या असलेल्या भारत पेट्रोलियम, मुंबई येथील आयसीएआर- केंद्रीय मत्स्यपालन शैक्षणिक संस्था, आयसीएआर-केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था यांसारख्या केंद्रीय संस्थांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

केंद्रीय रेल्वे, खाण आणि कोळसा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे देखील जालना जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांसह दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या कार्यक्रमात सहभागी झाले.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांसह या कार्यक्रमात भाग घेतला. या प्रसंगी, पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी नागपूरच्या बचत भवन सभागृहात अनेक लाभार्थी एकत्र जमले होते.
पंतप्रधानांनी या वेळी, पीएम-किसान अर्थात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक लाभाचा 11वा हप्ता देखील वितरीत केला. यामुळे 10 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांना सुमारे 21,000 कोटी रुपयांच्या रकमेचे हस्तांतरण शक्य होणार आहे. या प्रसंगी पंतप्रधानांनी देशभरातील पीएम-किसान योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद देखील साधला.
***
Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829797)
Visitor Counter : 201