माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मिफ्फ-2022 मध्ये सादर होणाऱ्या ज्या चित्रपटाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली त्याबद्दल जाणून घेऊया
Posted On:
30 MAY 2022 5:45PM by PIB Mumbai
मुंबई, 30 मे 2022
‘मन की बात’ कार्यक्रमाच्या नुकत्याच सादर झालेल्या भागात पंतप्रधान मोदी यांनी मिफ्फ-2022 मध्ये सादर होणाऱ्या ज्या चित्रपटाबद्दल चर्चा केली त्याबद्दल तुम्हांला काही माहिती आहे का? होय, तो चित्रपट मुंबईत सध्या सुरु असलेल्या 17व्या मिफ्फ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये उद्या दाखविला जाणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या जपान भेटीबद्दल माहिती दिली. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी भारत आणि जपान या देशांनी संयुक्तपणे निर्माण केलेल्या आणि वर्ष 1993मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रामायण: द लिजंड ऑफ प्रिन्स राम’ या पहिल्या अॅनिमेशन चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी झालेल्या अत्सुशी मत्सुओ आणि केन्जी योशी यांची भेट घेतली. या चित्रपटाच्या प्रथम प्रदर्शनाची 30 वी वर्षपूर्ती सध्या साजरी होत आहे.
मुंबईत, चित्रपट विभाग संकुलात होणाऱ्या या अॅनिमेशनपटाच्या सादरीकरणासाठी सर्वांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे (तुम्ही अथवा तुमच्या मुलांनी मिफ्फ प्रतिनिधी म्हणून https://miff.in/ या संकेतस्थळावर नोंदणी केलेली नसेल तरीही तुम्ही या चित्रपटाच्या खेळाला उपस्थित राहू शकता). 18 वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांना मिफ्फ महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी परवानगी दिली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
चित्रपट विभाग संकुलातील जेबी सभागृहात उद्या 31 मे 2022 रोजी दुपारी पावणेचार वाजता ‘रामायण: द लिजंड ऑफ प्रिन्स राम’ हा चित्रपट सादर होईल. या प्रसंगी मुलांना भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाला भेट देण्याची आणि चित्रपट विभागात त्या दिवशी उपस्थित असलेल्या चित्रपट विषयातील तज्ञ व्यक्तींशी चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाबद्दल व्यक्त केलेले विचार जाणून घेऊया
“हा चित्रपटनिर्मिती प्रकल्प, जपानचे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक युगो साको जी यांच्याशी संबंधित आहे. सुमारे 40 वर्षांपूर्वी, वर्ष 1983 मध्ये त्यांना रामायणाबद्दल प्रथमच माहिती मिळाली,” पंतप्रधान म्हणाले. रामायणाच्या कथेबद्दल समजल्यावर त्यांना ती अत्यंत हृदयस्पर्शी वाटली आणि त्यांनी या महाकाव्याचा सखोल अभ्यास सुरु केला याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. ते पुढे म्हणाले, “युगो साको यांनी रामायण कथेच्या जपानी भाषेत उपलब्ध असणाऱ्या 10 विविध प्रकारांचे वाचन केले. आणि एवढे करून ते थांबले नाहीत तर त्यांनी अॅनिमेशनच्या माध्यमातून या कथेचे सादरीकरण करण्याचा देखील ध्यास घेतला.”
या अॅनिमेशनपटामध्ये दाखविण्यात आलेल्या भारतीय चालीरीती आणि परंपरा योग्य पद्धतीने दर्शविल्या जाव्या यासाठी भारतीय अॅनिमेशन तज्ञांनी युगो साको यांना कशा प्रकारे मदत तसेच मार्गदर्शन पुरविले याची देखील माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. “भारतातील लोक धोतर, साडी कशी नेसतात, केशरचना कशा प्रकारे करतात, एका कुटुंबातील मुले परस्परांचा कसा आदर करतात, घरातील मोठ्या माणसांना कशा प्रकारे नमस्कार करून आशीर्वाद घेतात अने अनेक गोष्टींबद्दल त्यांना सखोल माहिती पुरविण्यात आली,” पंतप्रधान म्हणाले.
संस्कृती आणि भाषा यांमध्ये मोठा फरक असूनही जपानची जनता आपल्या भारतीय संस्कृतीशी जोडून घेऊ शकली आणि आपल्या संस्कृतीचे त्यांनी ज्या आदराने कौतुक केले त्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी अत्यंत स्नेह तसेच कौतुकाची भावना व्यक्त केली. “भारतापासून हजारो किलोमीटर दूर अंतरावर राहणारी, आपली भाषा माहित नसलेली तसेच आपल्या परंपरांविषयी फारशी माहिती नसलेली जपानी जनता आपल्या संस्कृतीप्रती जो समर्पित भाव, परमोच्च आदर आणि सन्मान व्यक्त करते ते खरोखरीच प्रशंसनीय आहे –प्रत्येक भारतीयाला याचा अत्यंत अभिमान वाटणार आहे!”ते म्हणाले.
चित्रपटाविषयी थोडेसे
‘रामायण: द लिजंड ऑफ प्रिन्स राम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात भारतीय अॅनिमेशन तज्ञ राम मोहन आणि जपानी दिग्दर्शक युगो साको तसेच कोईची सास्की यांनी केले आहे.
वाल्मिकी रामायणावर आधारित असलेल्या ‘रामायण: द लिजंड ऑफ प्रिन्स राम’ या चित्रपटामध्ये अॅनिमेशन तंत्रांच्या ‘फ्युजन’ची म्हणजे मिश्र पद्धतीचा वापर करण्यात आला असून या चित्रपटाच्या निर्मितीसाठी जपानची मांगा, अमेरिकेची डिस्ने आणि भारतातील रवी वर्मा अशा तीन वेगवेगळ्या अॅनिमेशन तंत्र पद्धतींचा वापर करण्यात आला आहे.
* * *
PIB MIFF Team | R.Aghor/S.Chitnis/Darshana/MIFF-19
चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms / #FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !
|
#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?
|
जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.
|
कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट उपलब्ध झाल्यावर बघता येतील.
|
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829507)
Visitor Counter : 213