माहिती आणि प्रसारण मंत्रालय
ईशान्य भारतातील सात राज्यांतील चैतन्यमय जीवनाचा पट रंगविणारे विशेष 'नॉर्थ ईस्ट पॅकेज' @#MIFF2022 मध्ये होणार सादर
Posted On:
29 MAY 2022 5:05PM by PIB Mumbai
मुंबई, 29 मे 2022
सर्वांच्या जगांतील सर्वोत्कृष्ट गोष्टी टिपणाऱ्या 'मिफ' महोत्सवात ईशान्य भारतातील सात राज्यांना प्रतिनिधित्व मिळाल्याविना तो महोत्सव परिपूर्ण कसा होईल?
मानववांशिक इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या आदिवासींपासून ते मंत्रमुग्ध करणाऱ्या हिरवाईपासून ते आणि उत्कृष्ट खाद्यपदार्थांपर्यंत, अनेक बाबतींत ईशान्य भारत हा विविधतेने नटलेला आणि चैतन्याने भारलेला असा प्रदेश आहे. उत्कृष्टता आणि अचूकतेचा ध्यास घेऊन 2006 पासून 'नॉर्थ ईस्ट पॅकेज'ला मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा अविभाज्य भाग म्हणून स्थान मिळाले आहे. यावर्षी म्हणजे 17 व्या मिफ मध्येही ईशान्य भारतावरील 13 चित्रपटांचा अंतर्भाव असून त्यांमध्ये या राज्यांच्या लोकजीवन आणि परंपरांचे चित्रण पाहता येणार आहे.
या पॅकेजमध्ये 10 माहितीपटांचा आणि तीन लहान काल्पनिक कथनांचा समावेश आहे. या 10 माहितीपटांपैकी, दोन माहितीपट, अरुणाचल प्रदेशच्या - 'गालो' आणि कासिक या दोन आदिवासी जमातींच्या जीवनाची माहिती देतात.
(अरुणाचल प्रदेशातील 'द सॉन्ग वी सिंग' या चित्रपटातील दृश्य)
आसाममधील चित्रपट-
आसाममधील एका माहितीपटात आसामी शिखांचे रंजक जीवन रेखाटले आहे. पंजाबी भाषेऐवजी आसामी भाषा आत्मसात करत तेथील शीख समुदायाने आसामच्या सामाजिक-सांस्कृतिक-साहित्यिक वर्तुळांमध्ये प्रवेश कसा केला आहे, त्याची गोष्ट हा माहितीपट उलगडतो. आसामच्या ग्रामीण भागातील लोहाराच्या जीवनमानाचा संदर्भाने निर्माण केलेला 'फोर्जिंग फ्यूचर' हा माहितीपट, बदलत्या पिढ्यांबरोबर आणि काळाबरोबर गावातील जीवनात होत जाणारे परिवर्तन मांडतो.
(आसामच्या 'फोर्जिंग फ्यूचर' या माहितीपटातील एक दृश्य)
मणिपूर आणि मेघालयातील चित्रपट
मणिपूरच्या दोन माहितीपटांपैकी एकामध्ये, मणिपूरमधील चित्रपटांचा पन्नास वर्षांचा प्रवास चितारला आहे. तर 'मणिपूर माइंडस्केप्स' नावाच्या दुसऱ्या माहितीपटात मणिपुरी लोकांच्या आनंदी वृत्तीचा परीघ सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
मेघालयातून एकच चित्रपट आला आहे- तो म्हणजे- 'बिकॉज वी डिड नॉट चूज'. पहिल्या महायुद्धात ईशान्य भारतातील स्थानिक मजुरांनी घेतलेल्या सहभागाचे परीक्षण यामध्ये केलेले आहे. शिलॉंग, गुवाहाटी, कोलकाता, चेन्नई आणि युरोपातील काही ठिकाणी पाच वर्षांत चित्रित केलेल्या या माहितीपटात अतिशय सूक्ष्म विचारपूर्वक चित्रण केलेले दिसते. त्या युद्धातील स्थानिक मजुरांचे स्थान विस्मृतीत गेले आहे आणि त्याची पुरेशी नोंद घेतली गेलेली नाही, यावर हा माहितीपट प्रकाश टाकतो.
मिझोरम,नागालँड आणि सिक्कीममधील चित्रपट
मिझोरम राज्यातून दोन चित्रपट आलेले आहेत. कोविड-19 महामारीच्या काळात लोकांच्या आयुष्याची खरी बाजू आणि समाजाने महामारीला दिलेला प्रतिसाद, वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, सर्वसामान्य माणसे या साऱ्याचे चित्रण 'द अनसर्टन इयर्स' मध्ये केलेले दिसते. तर 'धिस इज मिझोराम' मध्ये तेथील अप्रतिम निसर्गसौंदर्य चित्रित केले असून, त्याच्या जोडीने त्या सृष्टिसौंदर्याचे कलात्मक वर्णन आणि कथनही केले आहे. नागालँडमधून आलेल्या चित्रपटामध्ये, तेथील लोंगफुरू जमातीच्या अलोकांचे जीवन चितारले आहे. ही जमात पिढ्यानुपिढ्या स्थलांतराचे अनेक अनुभव घेत, अरण्याचे सार शोधत पूर्वजांच्या ज्ञानाच्या आधारे कशी जगत राहते याचा, त्यांच्या स्वयंपूर्ण जीवनशैलीचा आणि त्या पार्श्वभूमीवर जगाच्या दृष्टिकोनाचा धांडोळा यामध्ये घेतलेला दिसतो.
('द एंडलेस नोट' मधील एक दृश्य)
सिक्किममधून आलेला माहितीपट 'द एंडलेस नोट' या महोत्सवात पाहता येणार आहे. सिक्कीमच्या लोकसंगीतातील वाद्ये, हा या माहितीपटाचा विषय आहे. आसाममधील तीन लघुकथनात्मक पटांचे विषयही मनोरंजक आहेत. 'सँक्च्युअरी'मध्ये, एक नाटककार आणि एक दहशतवादी नेता यांच्या विचारप्रक्रियेतील फरक दाखवून दिला आहे. तर फ्रान्झ काफ्का, बेटोव्हन आणि साल्वादोर दाली यांच्या कलाकृतींमुळे निर्माण झालेला भ्रम हा 'नाओका'चा विषय आहे. 'या लिट्ल सनशाईन' या लघुपटात एका वृद्ध दाम्पत्याचे आणि त्यांच्या आजारी पाळीव कुत्र्याचे नाते रेखाटले आहे.
लेखक आणि पत्रकार चंदन शर्मा यांनी या विशेष पॅकेज विभागातील चित्रपटांची निवड केली आहे.
Register online for MIFF 2022 at https://miff.in/delegate2022/?cat=ZGVsZWdhdGU=
Students can register for free at https://miff.in/delegate2022/?cat=c3R1ZGVudF9kZWxlZ2F0ZQ==
For Media registration visit : https://miff.in/delegate2022/?cat=bWVkaWE=
* * *
PIB MIFF Team | R.Aghor/J.Waishampayan/Darshana/MIFF-12
चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms / #FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !
|
#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?
|
जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.
|
कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट उपलब्ध झाल्यावर बघता येतील.
|
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829214)
Visitor Counter : 364