विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जैवतंत्रज्ञान विषयातील संशोधक आणि स्टार्टअप्ससाठी केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी केला एकल राष्ट्रीय पोर्टलचा प्रारंभ


जागतिक जैवतंत्रज्ञान बाजारपेठेत भारतीय जैवतंत्रज्ञान उद्योगाचे योगदान 2017 मध्ये जेमतेम 3% होते, ते 2025 पर्यंत वाढून 19% पर्यंत पोहोचेल- डॉ.जितेंद्र सिंग

Posted On: 21 MAY 2022 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 मे 2022

 

'एक देश एक पोर्टल’ तत्त्वाचे पालन करत, केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज जैवतंत्रज्ञान विषयातील संशोधक आणि स्टार्टअप्ससाठी एकल राष्ट्रीय पोर्टलचा प्रारंभ केला.

देशात जीवशास्त्राच्या संशोधन आणि विकासासाठी ज्यांना नियामकांच्या परवानग्यांची गरज असते अशा सर्वांना या म्हणजे 'बायो आर आर ए पी' पोर्टलचा फायदा होणार असून, 'विज्ञान सुलभता' आणि 'व्यवसाय सुलभता' या दोन्ही दृष्टींनी हे संकेतस्थळ साहाय्यभूत ठरणार आहे.

'बायो आर आर ए पी'  म्हणजे 'जैवशास्त्रीय संशोधन नियामक संमती पोर्टल सुरु केल्यावर त्यांनी आपले मनोगत मांडले. जागतिक स्तरावर एक जैव-उत्पादक केंद्र म्हणून होण्यासाठी भारत वाटचाल करत आहे आणि या क्षेत्रात 2025 पर्यंत तो जगातील पहिल्या पाच देशांत स्थान मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित भागधारकांना ठराविक अर्जासाठी मिळालेल्या विविध परवानग्या एका खास बायो आर.आर.ए.पी. आयडीच्या मदतीने पोर्टलवर पाहता येतील, अशी माहिती सिंह यांनी दिली. जैवतंत्रज्ञान विभागाचे हे अद्वितीय संकेतस्थळ म्हणजे 'विज्ञानाचा अभ्यास आणि वैज्ञानिक संशोधन' करण्यातील सुलभतेच्या दिशेने तसेच, स्टार्टअप उद्योगांच्या सुलभतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे, असेही ते म्हणाले. भारतातील तरुणांसाठी विद्याभ्यासाची शाखा म्हणून तसेच उपजीविकेचे साधन देणारे क्षेत्र म्हणून जैवतंत्रज्ञान वेगाने पुढे आले आहे. तसेच देशात सध्या जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील 2,700 पेक्षा अधिक स्टार्टअप उद्योग आणि 2,500 पेक्षा अधिक जैवतंत्रज्ञान कंपन्या कार्यरत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

हे संकेतस्थळ म्हणजे अनेक संधींचे प्रवेशद्वार म्हणून काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संशोधकांना त्यांच्या अर्जाची नियामकांच्या परवानगीविषयक स्थिती पाहता येण्यासाठी याचा उपयोग होईल. तसेच, एखाद्या संशोधक व्यक्तीने आणि/ संस्थेने हाती घेतलेल्या सर्व संशोधनकार्याची प्राथमिक माहितीही येथे पाहता येणार आहे.

जागतिक स्तरावर एक जैव-उत्पादक केंद्र होण्यासाठी भारताच्या वाटचालीच्या  मुद्द्यावर पुन्हा बोलताना डॉ.जितेंद्र सिंग यांनी सांगितले की, जगात सध्या जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च बारा देशांमध्ये भारताची गणना होते. तर हिंद-प्रशांत क्षेत्रात भारताचा याबाबतीत तिसरा क्रमांक लागतो. जागतिक जैवतंत्रज्ञान बाजारपेठेत भारतीय जैवतंत्रज्ञान उद्योगाचे योगदान 2017 मध्ये जेमतेम 3% होते, ते 2025 पर्यंत वाढून 19% पर्यंत पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच जीडीपी म्हणजे सकल देशांतर्गत उत्पन्नात जैव-अर्थव्यवस्थेचे योगदान गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढत आहे,  2017 मध्ये ते 1.7% होते तेच आता 2020 मध्ये 2.7%  इतके झाले आहे, असे त्यांनी सांगितले. देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीकाळात म्हणजे 2047 मध्ये, जैव-अर्थव्यवस्थेच्या प्रवासाला पंचवीस वर्षे पूर्ण होत असताना, हेच योगदान सर्वस्वी नव्या उंचीवर पोहोचलेले दिसेल, असेही डॉ.जितेंद्र सिंह  म्हणाले.

 

* * *

N.Chitale/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1827206) Visitor Counter : 278


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu