संरक्षण मंत्रालय

‘आत्मनिर्भर भारत’ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या नव्या कल्पना मांडण्याचे संरक्षण मंत्र्यांचे युवकांना आवाहन


भारताने आपल्या संरक्षणविषयक गरजांसाठी इतर देशांवर अवलंबून राहता कामा नये; सरकार देशांतर्गत संरक्षण सामुग्रीच्या खरेदीवर भर देत आहे: राजनाथ सिंह

Posted On: 20 MAY 2022 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 मे 2022

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील  ‘आत्मनिर्भर भारत’ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील तरुणांना नवीन तंत्रज्ञानाची स्वदेशी कल्पना आणि त्यावर नावीन्यपूर्ण संशोधन करण्याचे आवाहन केले आहे.  20 मे 2022 रोजी पुणे येथील डॉ.  डी वाय पाटील विद्यापीठाच्या 13 व्या दीक्षांत समारंभात संरक्षण मंत्री  विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. हे विद्यापीठ वैद्यकशास्त्र, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी, ऑप्टोमेट्री, आयुर्वेद, होमिओपॅथी, बायोटेक्नॉलॉजी, व्यवसाय व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण प्रदान करते.

राजनाथ सिंह यांनी  कोणत्याही देशासाठी तिथले युवक हेच सर्वात मोठे सामर्थ्य , उत्प्रेरक आणि परिवर्तनाचा स्रोत असल्याचे अधोरेखित  केले. “तरुणांमध्ये कोणत्याही आव्हानाचा सामना करण्याची आणि त्याचे संधीत रूपांतर करण्याची क्षमता आहे. त्यांच्याकडे नवीन तंत्रज्ञान शोधण्याची आणि नवीन कंपन्या आणि संशोधन आस्थापना स्थापन करण्याची क्षमता आहे,”असे ते म्हणाले.

‘आत्मनिर्भर भारत’ साध्य करण्यासाठी संरक्षण उपकरणांच्या देशांतर्गत खरेदीच्या सरकारच्या निर्धाराचा संरक्षण मंत्र्यांनी  पुनरुच्चार केला. ते म्हणाले की भारताने या क्षेत्रातील आपल्या गरजांसाठी इतर देशांवर अवलंबून राहू नये.  सरकारचा युवकांवर विश्वास आहे आणि त्यांची प्रगती तसेच राष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांना पुरेशा संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असे  ते म्हणाले. 'वोकल फॉर लोकल' या पंतप्रधानांच्या आवाहनाबाबत  ते म्हणाले की यामुळे देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील.

सरकारच्या प्रयत्नांमुळे देशात स्टार्टअप उद्योगांसाठी एक चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे जैव-तंत्रज्ञान, व्यवसाय प्रशासन, आणि आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांना आपली स्वप्ने साकार करण्यात मोलाची मदत होणार आहे, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केले. 'स्टार्टअप इंडिया योजना' तरुणाईसाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे, असेही ते म्हणाले. "स्टार्टअप उद्योगांसाठी व्हेंचर कॅपिटल फ़ंडींग म्हणजे उद्योगाच्या भांडवलासाठी निधीपुरवठा करण्याचा पायंडा पाडण्यातही सरकारला यश आले आहे. उद्योग अगदी नवीन असताना, त्या सुरुवातीच्या टप्प्यावर उद्योजकांना साथ देण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे आहे. देशात व्यवसाय क्षेत्रात 100 पेक्षा अधिक युनिकॉर्न्स अस्तित्वात आहेत. स्टार्टअपवर आधारित नवोन्मेषी वातावरण निर्मिती करण्याच्या प्रयत्नांचेच हे यश होय", असेही राजनाथ सिंह म्हणाले.

युवकांच्या चाकोरीबाहेरच्या कल्पना फलद्रुप करण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहाय्य देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 'वैद्यक शाखेच्या आणि जैव-तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी व्यापार-व्यवसायाचे शिक्षण घेणाऱ्या सहाध्यायींना आपल्या कल्पना सांगाव्यात जेणेकरून त्या कल्पनांवर आधारित व्यवसाय सुरु करण्याचे नियोजन त्यांना करता येईल'- असेही त्यांनी सुचविले. यातून भविष्यात भक्कम भागीदारी आकाराला येतील आणि देशाला त्यांचा फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गरिबी आणि भूक या समस्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी चांगले शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र ठरू शकते, असा विचार त्यांनी मांडला. 'आपल्या शिक्षणाचा सदुपयोग होईल याची काळजी घेणे आणि समाजात एक सकारात्मक बदल घडवून आणणे, ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे,' असे संरक्षणमंत्री म्हणाले.

जीवनाच्या भौतिक आणि आधिभौतिक पैलूंमध्ये समतोल साधण्याचे आवाहन, सिंह यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनी ऊर्जाकेंद्र बनून सकारात्मक ऊर्जा प्रसारित करावी आणि समाजाच्या सार्वत्रिक हिताचा विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अन्य गरजांना हानिकारक ठरणार नाही आणि अंतिमतः शांततामय सहअस्तित्वाकडे घेऊन जाईल अशी मूल्यव्यवस्था अंगीकारण्याची गरज आहे, यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला.

 

* * *

S.Patil/Sushma/Jai/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1827000) Visitor Counter : 196