राष्ट्रपती कार्यालय

जमैका संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपतींनी केले संबोधित


भारत जमैकासोबत भागीदारी करण्यास आणि आपली तंत्र विषयक कौशल्ये, ज्ञान आणि तज्ञ सल्ला सामायिक करण्यास तयार, यामुळे जमैकाच्या शिक्षण आणि व्यवसाय क्षेत्रात येईल परिवर्तन: राष्ट्रपती कोविंद

Posted On: 18 MAY 2022 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 मे 2022

किंग्स्टनमध्ये जमैका संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती, राम नाथ कोविंद यांनी काल (17 मे, 2022) संबोधित केले.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे प्रतिनिधी म्हणून जमैकाच्या चैतन्याने सळसळणाऱ्या लोकशाहीच्या नेत्यांच्या मेळाव्याला संबोधित करणे ही त्यांच्यासाठी खरोखरच सन्मानाची बाब आहे असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले.  केवळ भारतीय वंशाचे लोक आणि सांस्कृतिक बंधच आपल्या दोन्ही देशांना एकत्र आणत नाहीत तर लोकशाही आणि स्वातंत्र्यावरील आपला विश्वास देखील आपल्याला एकत्र बांधून ठेवतो. सर्व नागरिकांची निर्मिती समानच झाली  ही कल्पना जमैकाच्या राज्यघटनेचा मध्यवर्ती स्तंभ आहे.  आमच्या संस्थापकांनीही असाच विश्वास व्यक्त केला आणि भारतातील प्रत्येक नागरिकासाठी वैयक्तिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला.  त्यांनी एक आधुनिक राष्ट्र निर्माण केले. त्यात स्वातंत्र्य, लोकशाही आणि समानता आहे. असे करताना, आम्ही 'विविधतेत एकता' साजरी करावी हे त्यांनी सुनिश्चित केले. हे  जमैकाच्या 'आऊट ऑफ मेनी, वन पीपल' या ब्रीदवाक्याप्रमाणेच आहे.

समृद्ध नैसर्गिक संसाधने, धोरणात्मकदृष्ट्या मोक्याचे स्थान, तरुण लोकसंख्या आणि गतिमान नेतृत्व यामुळे जमैका आणखी मोठ्या आर्थिक यशासाठी सज्ज आहे. कॅरीकॉम प्रदेशातील त्यांचे नेतृत्व, आंतरराष्ट्रीय नियम-आधारित वर्तन आणि अधिक जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा यामुळे ते इतर देशांसाठी पसंतीचे भागीदार ठरत असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.

काही आघाडीच्या जागतिक अर्थव्यवस्थांच्या सान्निध्यातील जमैकाचे धोरणात्मक स्थान आणि हुशार इंग्रजी भाषक तरुणाई, त्याला 'ज्ञान महामार्ग' बनण्याची आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीचा लाभ घेण्यासाठी उत्कृष्ट संधी प्रदान करत आहे असे राष्ट्रपती म्हणाले.  एक समृद्ध आणि शाश्वत अर्थव्यवस्था बनून आपल्या लोकांना सशक्त बनवणे आणि सुरक्षित, एकसंध आणि न्याय्य समाज सुनिश्चित करण्याच्या जमैकाचे व्हिजन 2030 उद्दिष्ट भारत सामायिक करतो असेही त्यांनी सांगितले.

जमैकासोबत भागीदारी करण्यास आणि आपली तांत्रिक कौशल्ये, ज्ञान आणि तज्ञ सल्ला सामायिक करण्यास भारत तयार आहे. त्यामुळे जमैकाच्या शिक्षण आणि व्यवसाय क्षेत्रात परिवर्तन घडून येऊ शकते असे राष्ट्रपती म्हणाले.  त्यांनी नमूद केले की जमैकातील आघाडीचे उद्योग आधीपासूनच भारतातील तंत्रज्ञान कंपन्यांकडून सॉफ्टवेअर आणि इतर तांत्रिक सहकार्य घेत आहेत असे त्यांनी नमूद केले. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी भारत आणि जमैका आंतरराष्ट्रीय सौर आघाडी अंतर्गत सहकार्य करत आहेत. भारताची सामर्थ्यस्थळे असलेल्या रेल्वे आणि कृषी क्षेत्रात भागीदारी करण्याची मोठी क्षमता आहे, असेही ते म्हणाले.

लोकसंख्या 30 लाखांपेक्षा कमी असूनही ऑलिम्पिक, जागतिक स्पर्धा आणि इतर प्रमुख क्रीडा स्पर्धांमध्ये, जमैका ऍथलेटिक्समधील आपला दबदबा राखून आहे हे पाहणे खरच आश्चर्यकारक आहे.  जमैकाकडून क्रीडा आणि अॅथलेटिक्सचे धडे घेण्यास भारत इच्छुक आहे असे ते म्हणाले. संगीत आणि मनोरंजनामध्ये परस्पर-देवाणघेवाण केल्यास दोन्ही देशातील मनोरंजन उद्योग समृद्ध होतील. तसेच आदरातिथ्य आणि पर्यटनात एकमेकांकडून सहकार्य आणि शिकण्यास खूप वाव आहे असेही राष्ट्रपती म्हणाले.

आपले अभिसरण आणि पूरकता परस्परांसाठी फायदेशीर ठरेल असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. आपल्या सामायिक आदर्शांचे व्यावहारिक सहकार्यात रूपांतर करण्यासाठी आणि अधिक न्याय्य जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण एकत्र काम करत राहिले पाहिजे असे ते म्हणाले. भारत-जमैका भागीदारी केवळ आपल्या लोकांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या दिशेनेच नेत नाही तर अधिक एकसंध, मानवीय आणि समृद्ध जगासाठी एक सेतू म्हणून काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

जमैकाचे गव्हर्नर जनरल सर पॅट्रिक ऍलन यांनी काल संध्याकाळी (17 मे, 2022), आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमाला राष्ट्रपती उपस्थित होते. राष्ट्रपतींनी यावेळी जमैकाच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर स्वागत केल्याबद्दल सर पॅट्रिक ऍलन यांचे आभार मानले. जमैकाचे, भारत आणि भारतीयांमधे विशेष स्थान आहे असे त्यांनी सांगितले.  जॉर्ज हेडली, मायकेल होल्डिंग आणि ख्रिस गेल यांसारख्या क्रिकेटताऱ्यांचे भारतातील क्रिकेटप्रेमी पिढ्यांनपिढ्या कौतुक करतात. उसेन बोल्टची महानता भारतीय क्रीडाप्रेमींना सर्वश्रुत आहे.

व्यापार आणि आर्थिक सहकार्य हे भारत-जमैका मैत्रीचे महत्त्वाचे स्तंभ आहेत असे राष्ट्रपती म्हणाले. केवळ व्यापारासाठीच नव्हे तर डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही आमच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक असल्याचे पाहतो. आपल्या तरुणाईने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स, जमैकन पारंपारिक औषधे आणि आयुर्वेद यासारख्या अनेक क्षेत्रात एकत्रितपणे काम करायला हवे आणि हवामान-स्मार्ट जग मिळून तयार केले पाहिजे. समृद्ध, प्रगतीशील आणि शांततामय समाज निर्माण करण्यासाठी आपण त्यांची कल्पनाशक्ती आणि ऊर्जेचा उपयोग केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

 राष्ट्रपती आज (18 मे, 2022), त्यांच्या सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी रवाना होतील.

S.Kane/V.Ghode/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1826453) Visitor Counter : 159