उपराष्ट्रपती कार्यालय

वंचितांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे: उपराष्ट्रपतींचे आवाहन

Posted On: 18 MAY 2022 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 मे 2022

समाजातील वंचित आणि गरजू घटकांपर्यंत शिक्षण पोहचवून ते अधिक समावेशक बनवण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे  आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.  देशाच्या शैक्षणिक परिदृश्यात बदल करण्यासाठी आणि ते अधिक न्याय्य, सर्वसमावेशक आणि सर्वांना उपलब्ध व्हावे यासाठी  सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. "शिक्षण आणि सामाजिक-आर्थिक विकासाच्या बाबतीत समाजातील कोणत्याही घटकाला मागे पडू देणे आपल्याला परवडणारे नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे" असे नायडू पुढे म्हणाले. तामिळनाडूतील निलगिरी, लवडेल इथल्या लॉरेन्स शाळेला त्यांनी आज भेट दिली. यावेळी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन करताना ही निरीक्षणे नोंदवली.

शिक्षण हा बदलाचा सर्वात शक्तिशाली घटक आहे. देशाच्या विकासाच्या गतीला तो चालन देऊ शकतो आणि त्याला विश्वासाचा गुणात्मक आधार देतो असे ते म्हणाले. भारत आज जगातील आघाडीच्या राष्ट्रांपैकी एक होण्याच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे निरीक्षण उपराष्ट्रपतींनी यावेळी नोंदवले. राष्ट्रीय शिक्षण धोरण  शैक्षणिक संस्थांना थेट राष्ट्रीय विकासात सहभागी करण्याचा एक स्पष्ट मार्ग आपल्याला  प्रदान करते याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ‘भारतीयता’ किंवा ‘भारतीयत्वाचा’प्रचार आणि प्रसार करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. आपण भारतीय संस्कृती आणि परंपरांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भारतीय संस्कृती ही कोणत्याही एका धर्माची नसून ती सर्वांची आहे, असेही नायडू म्हणाले.

शाळांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासावर भर दिला पाहिजे. खेळांसाठी आवश्यक वातावरण आणि सुविधाही पुरवल्या पाहिजेत. असे नायडू म्हणाले. विद्यार्थ्यांनी त्यांना आवडणाऱ्या आणि आरोग्यदायी जीवनशैली घडवणाऱ्या क्रीडा उपक्रम, खेळ किंवा व्यायामाच्या कोणत्याही एका प्रकाराचा अंगिकार करावा असेही त्यांनी सांगितले.

 

S.Kane/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1826403) Visitor Counter : 153