संरक्षण मंत्रालय
पूर्वावलोकन : YD 12707 (सुरत) आणि YD 12652 (उदयगिरी) चे जलावतरण
Posted On:
16 MAY 2022 4:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मे 2022
स्वदेशी युद्धनौका निर्मितीच्या इतिहासात उद्या 17 मे 2022 रोजी देश एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होईल, जेव्हा भारतीय नौदलाच्या दोन आघाडीच्या युद्धनौका सुरत , प्रोजेक्ट 15B विनाशिका आणि उदयगिरी, प्रोजेक्ट 17A युद्धनौकेचे मुंबईतील माझगाव डॉक्स लिमिटेड येथे एकाच वेळी जलावतरण होईल. या दोन्ही कार्यक्रमांसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे प्रमुख पाहुणे असतील.
प्रोजेक्ट 15B श्रेणीतील जहाजे ही मुंबईतील माझगाव डॉक्स लिमिटेड येथे तयार करण्यात आलेली भारतीय नौदलाची अद्ययावत स्टेल्थ मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका आहेत. 'सुरत' हे प्रोजेक्ट 15B विनाशिका श्रेणीतील चौथे जहाज आहे ज्याची निर्मिती P15A (कोलकाता श्रेणी) विनाशिकेत महत्त्वपूर्ण बदल करून केली आहे.
'उदयगिरी' हे प्रोजेक्ट 17A श्रेणीतील तिसरे लढाऊ जहाज आहे. सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणालीसह P17 फ्रिगेट (शिवालिक श्रेणी ) नुसार याची बांधणी केली आहे.
15B आणि P17A या दोन्ही जहाजांची रचना नौदल आरेखन संचालनालयाने (DND) केली आहे, जे देशातील सर्व युद्धनौकांच्या संरचनेचे काम पाहते. कारखान्यात उभारणीच्या टप्प्यात असताना उपकरणे आणि अन्य प्रणालीच्या सुमारे 75% ऑर्डर्स एमएसएमईसह स्वदेशी कंपन्यांना देण्यात आल्या. देशातील 'आत्मनिर्भरतेचे ' हे ठळक उदाहरण आहे.
S.Kulkarni/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1825791)
Visitor Counter : 282