पंतप्रधान कार्यालय

गुजरातमधील भरुच येथे आयोजित  ‘उत्कर्ष समारोह’ मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 12 MAY 2022 4:04PM by PIB Mumbai

 

नमस्कार.

आजचा उत्कर्ष समारोह खरोखरच  खूप उत्तम आहे आणि सरकार जेव्हा प्रामाणिकपणे, संकल्प घेऊन  लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते, तेव्हा त्याचे किती फलदायी परिणाम प्राप्त होतात याचा हा दाखला आहे. सामाजिक सुरक्षेशी संबंधित 4 योजनांच्या 100 टक्के पूर्ततेच्या व्याप्तीसाठी  मी भरूच जिल्हा प्रशासन, गुजरात सरकारचे तुम्हा सर्वांचे जितके अभिनंदन करावे  तितके कमी आहे. तुम्ही खूप खूप   अभिनंदनासाठी पात्र आहात. आता  मी जेव्हा या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत होतो तेव्हा  ते किती समाधानी आहेत ,त्यांच्यात  किती आत्मविश्वास आहे हे मला दिसले.आव्हानांचा सामना करताना सरकारकडून थोडीफार मदत जेव्हा मिळते, तेव्हा मनोबल किती वाढते आणि समस्या असहाय्य होतात आणि जो त्रास सहन करतो तो बलवान होतो.आज तुम्हा सर्वांशी बोलताना  मी याचा अनुभव घेत होतो.या 4 योजनांमध्ये ज्या भगिनींना, ज्या कुटुंबांना लाभ झाला आहे, ते माझ्या आदिवासी समाजातील बंधू-भगिनी आहेत, माझे दलित-मागासवर्गीय बंधू-भगिनी आहेत, माझे अल्पसंख्याक समाजातील बंधू-भगिनी आहेत,अनेकदा आपण ते पाहतो की, माहितीअभावी अनेक लोक योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. काही वेळा योजना कागदावरच राहतात.काही वेळा काही बेईमान लोक योजनांचा लाभ घेतात.पण जेव्हा इरादा स्पष्ट असतो, हेतू स्पष्ट असतो, काम करण्याचा उद्देश चांगला असतो, आणि याच पद्धतीने मी नेहमी काम करण्याचा प्रयत्न करतो.ते म्हणजे - सबका साथ - सबका  विकासची भावना,ज्यामुळे फलितही प्राप्त होते. कोणत्याही  योजनेला  100% लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे हे मोठे उद्दिष्ट आहे, नक्कीच हे  काम कठीण आहे पण हाच योग्य मार्ग आहे. तुम्ही साध्य केलेल्या  कामगिरीबद्दल मला सर्व लाभार्थी आणि प्रशासनाचे अभिनंदन  करायलाच हवे..

 

मित्रांनो,

तुम्‍हाला चांगले माहीत आहे, जेव्हा तुम्‍ही मला गुजरातमधून दिल्लीला देशसेवेसाठी पाठवले, त्यालाही आता 8 वर्षे पूर्ण होतील., आमचे सरकार, 8 वर्षांपासून सेवा, सुशासन आणि गरीबांच्या  कल्याणासाठी समर्पित आहे. आज मी जे काही करू शकतो, ते मी तुमच्याकडून ते शिकलो आहे. तुमच्यामध्ये राहून विकास म्हणजे कायदु:ख काय असते , वेदना काय असते , गरिबी काय असते , संकटे काय असतात , ते खूप जवळून अनुभवले आहे.आणि हाच अनुभव घेऊन मी एका कुटुंबाचा सदस्य म्हणून, संपूर्ण देशासाठी, देशातील कोट्यवधी  नागरिकांसाठी काम करत आहे.गरीब कल्याणाच्या योजनांमधून कोणताही लाभार्थी त्याला मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहू नये , असा सरकारचा सातत्याने प्रयत्न आहे.ज्याचा हक्क आहे त्याचा लाभ प्रत्येकाला मिळायला हवा आणि त्याचा पूर्ण लाभ मिळायला हवा आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा आपण कोणत्याही योजनेत 100 टक्के उद्दिष्ट गाठतो, तेव्हा   100 टक्के ही केवळ एक आकडेवारी नसते.ही केवळ वर्तमानपत्रात जाहिरात देण्याची  केवळ गोष्ट नाही. याचा अर्थ असा आहे  - शासन , प्रशासन, संवेदनशील आहे. ते  तुमच्या सुख-दुःखाचे  सोबती आहेत .हा त्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. आज देशात आपल्या सरकारला आठ वर्षे पूर्ण होत आहेत आणि आठ वर्षे पूर्ण होत असताना आपण नव्या संकल्पाने, नव्या उर्जेने पुढे जाण्याची तयारी करत आहोत. एके दिवशी माझी  एका खूप मोठ्या नेत्याशी, वरिष्ठ नेत्याशी भेट झाली.तसे आम्ही सातत्याने एकमेकांचा विरोध करत आलो आहोत आणि राजकीय विरोध करत आलो आहोत पण मी त्यांचा  आदरही  करत आलो आहे. . तर  काही गोष्टींमुळे ते थोडे नाराज होते  म्हणून एक दिवस ते  भेटायला आले. तर म्हणाले मोदीजी काय करायचे? दोनदा देशाने तुम्हाला पंतप्रधान केले. आता काय करायचे  . दोनदा पंतप्रधान होणे म्हणजे खूप काही झाले असे त्यांना वाटायचे.पण त्यांना हे माहीत नाही की मोदी वेगळ्या मातीतील आहेत.  गुजरातच्या या भूमीने त्यांना  तयार केले आहे आणि म्हणून जे झाले ते चांगलेच आहे, चला आता आराम करूया, नाही माझे स्वप्न आहे - सॅच्युरेशन. 100% लक्ष्यप्राप्तीच्या दिशेने  आपण पुढे जाऊया. सरकारी यंत्रणेला आपण याची सवय लावूया. नागरिकांमध्येही विश्वास निर्माण केला पाहिजे.तुम्हाला आठवत असेल की, 2014 मध्ये तुम्ही आम्हाला सेवेची संधी दिली तेव्हा देशातील जवळपास निम्मी लोकसंख्या शौचालय, लसीकरण सुविधा, वीज जोडणी , बँक खाते या सुविधांपासून शेकडो मैल दूर होती, एकप्रकारे वंचित होती. या वर्षांत आपण  सर्वांच्या प्रयत्नांमुळे अनेक योजनांची पूर्तता  100% च्या जवळ आणण्यात यशस्वी झालो आहोत.  आता आठ वर्षांच्या या महत्त्वाच्या प्रसंगी ,पुन्हा एकदा सर्वांच्या प्रयत्नाने आणि प्रत्येक गरजू, ज्यांचे हक्क आहेत त्या प्रत्येकाला  त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपल्याला पुढे जायचे आहे.मी आधी म्हणालो तसे अशी कामे अवघड आहेत. त्याला हात लावायलाही राजकारणी घाबरतात. मात्र मी राजकारण करण्यासाठी आलो नाही, देशवासीयांची सेवा करण्यासाठी आलो आहे.देशाने 100% लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प केला आहे.आणि जेव्हा ते 100% पर्यंत पोहोचल्यानंतर  पहिल्यांदा जे मानसिक परिवर्तन होऊ लागते ते खूप महत्वाचे आहे.यामध्ये देशाचा नागरिक सर्वप्रथम याचकाच्या अवस्थेतून बाहेर पडतो. तो मागण्यासाठी  रांगेत उभा आहे, ही भावना संपुष्टात येते.  हा माझा देश आहे, हे माझे सरकार आहे, हा माझ्या पैशावरचा हक्क आहे,माझ्या देशातील नागरिकांचा हक्क आहे, असा विश्वास त्याच्यामध्ये निर्माण होतो.ही भावना त्याच्या आत जन्म घेते आणि आणि त्याच्यात कर्तव्याची बीजेही रोवते.

 

मित्रांनो,

जेव्हा सॅच्युरेशन होते , तेव्हा भेदभावाची सर्व व्याप्ती संपते. कोणाच्याही शिफारशीशी गरज पडत नाही. प्रत्येकाला  विश्वास वाटतो की, भले दुसऱ्याला आपल्या आधी मिळाले असेल पण नंतर मलाही मिळेल.दोन महिन्यांनी मिळेल, सहा महिन्यांनी मिळेल, पण मिळणार आहे.त्याला कोणाच्या शिफारशीची गरज नाही आणि जो देणार आहे तो कोणालाही सांगू शकत नाही की तू माझा आहेस, म्हणूनच मी देत आहे.तो माझा  नाही, म्हणून  मी देत नाही. भेदभाव करू शकत नाही आणि 100% लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प देशाने केला आहे, आज 100% पूर्तता झाली  की   तुष्टीकरणाचे राजकारण संपुष्टात येते. यासाठी कुठेही  जागा उरत नाही. 100% लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे म्हणजे समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे. ज्यांचे कोणीही  नाही त्यांच्यासाठी सरकार असते . सरकारचे संकल्प असतात. सरकार त्याचा सोबती म्हणून चालते. याच भावनेने ,देशाच्या दूरवरच्या जंगलात राहणारा  माझा  आदिवासी असू दे, झोपडपट्टीत राहणारी माझी गरीब माता भगिनी  असू दे, म्हातारपणात एकटा राहणारा  व्यक्ती असो या प्रत्येकामध्ये, आपल्या दारात येऊन आपल्या हक्काच्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहेहा विश्वास निर्माण झाला पाहिजे .

 

मित्रांनो,

100% लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे म्हणजेच प्रत्येक धर्म, प्रत्येक पंथ, प्रत्येक वर्गाचा समान रीतीने, सर्वांना सबका साथ, सबका विकास याचा  100% लाभ.   गरीब कल्याणाच्या कोणत्याही  योजनेपासून कोणीही वंचित राहू नये. हा मोठा संकल्प आहे. आज तुम्ही  सर्व विधवा मातांनी जी राखी दिली आहे , माझ्यासाठी इतकी  मोठी राखी बनवली आहे ना, हा केवळ धागा नाही आहे.  ही तुम्ही मला एक शक्ती दिली आहे, सामर्थ्य दिले आहेआणि तुम्ही जी स्वप्ने पाहात आहात ती पूर्ण करण्यासाठी शक्ती दिली आहे. म्हणूनच आज तुम्ही मला दिलेली राखी ही मी अनमोल भेट मानतो.ही राखी मला देशातील गरिबांच्या सेवेसाठी, सरकारला 100% पूर्ततेच्या दिशेने नेण्यासाठी नेहमीच प्रेरणा, धैर्य आणि पाठबळ देईल.हाच तर आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि  सबका प्रयास. आज राखी देखील सर्व विधवा मातांच्या प्रयत्नातून बनली आहे. आणि मी गुजरातमध्ये असताना पुन्हा पुन्हा सांगायचो , कधी कधी बातम्या यायच्या.  माझ्या सुरक्षेबद्दल बातम्या येत होत्या..एकदा तर माझ्या आजारपणाची बातमी आली, तेव्हा मी म्हणायचो  कोट्यवधी माता भगिनींचे   संरक्षण कवच मला मिळालेले आहे. जोपर्यंत मला या कोट्यवधी  माता-भगिनींचे संरक्षण मिळालेले  आहे, तोपर्यंत हे संरक्षण कवच  भेदून मला कोणीही काही करू शकणार नाही. आणि आज मला प्रत्येक पावलावर, प्रत्येक क्षणी माता-भगिनी दिसत आहेत, त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. या माता-भगिनींचे माझ्यावर जेवढे ऋण आहेत ते फेडावे तितके कमी आहे.आणि म्हणूनच मित्रांनो, या संस्कारामुळे मी लाल किल्ल्यावरून एकदा बोलण्याचे धाडस केले,होते कीहे अवघड काम आहे, मी पुन्हा सांगतो  आहे. मला माहित आहे की हे एक कठीण काम आहे, मला माहित आहे की ते करणे किती कठीण आहे.मला माहित आहे की, सर्व राज्यांना प्रेरित करणे आणि सोबत घेणे हे अवघड काम आहे. या कामासाठी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना त्यामागे  धावायला लावणे  अवघड आहे हे मला माहीत आहे.पण हा स्वातंत्र्याचा  अमृत काळ आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली आहेत. या अमृत काळात मुलभूत सुविधा योजनांच्या पूर्ततेबद्दल  मी लाल किल्ल्यावरून सांगितले होते.आमचे शंभर टक्के  सेवा अभियान हे  सामाजिक न्यायाचे मोठे माध्यम आहे.मला आनंद आहे की आमचे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल यांच्या  नेतृत्वाखाली गुजरात सरकार हा संकल्प पूर्ण करण्यासाठी पूर्ण समर्पणाने कार्यरत  आहे.

 

मित्रांनो,

आपल्या सरकारच्यावतीने सामाजिक सुरक्षा, जनकल्याण आणि गरीबांच्या प्रतिष्ठेसाठी माझ्या या  सर्व मोहिमा आहेत. त्याविषयी अगदी एका शब्दात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, गरीबाची प्रतिष्ठा! गरीबाच्या प्रतिष्ठेसाठी सरकार! गरीबाच्या प्रतिष्ठेसाठी संकल्प आणि गरीबाच्या प्रतिष्ठेचा संस्कार. हीच गोष्ट तर मला प्रेरणा देत आहे. आधी ज्यावेळी सामाजिक सुरक्षेविषयी चर्चा ऐकत होतो, त्यावेळी नेहमीच इतर लहान-लहान देशांचे उदाहरण दिले जात होते. भारतामध्ये या सर्व गोष्टी लागू करण्याचे जे काही प्रयत्न झाले आहेत, त्याची व्याप्ती आणि प्रभाव असे दोन्हीही खूप मर्यादित होते. परंतु वर्ष 2014 नंतर देशाने आपली व्याप्ती प्रचंड वाढवली. देश सर्वांना बरोबर घेवून जात आहे. त्याचा परिणाम आपल्या सर्वांच्या समोर आहे. 50 कोटींपेक्षा अधिक देशवासियांना पाच लाख रूपयांपर्यंत मोफत औषधोपचाराची सुविधा मिळाली आहे. करोडो लोकांना चार लाख रूपयांपर्यंत दुर्घटना आणि जीवन विम्याची सुविधा मिळाली आहे. कोट्यवधी भारतीयांना वयाच्या साठीनंतर एक निश्चित रक्कम निवृत्ती  वेतन म्हणून मिळण्याची व्यवस्था तयार केली आहे.

आपले स्वमालकीचे पक्के घरकूल, शौचालय, गॅस जोडणी, वीज जोडणी, नळ जोडणी, बँकेमध्ये खाते, अशा सुविधांसाठी गरीबाला कार्यालयामध्ये वारंवार चकरा मारव्या लागत होत्या. यामध्येच त्याचे आयुष्य खर्ची पडत होते आणि व्यवस्थेपुढे गरीब हार पत्करत होता. आमच्या सरकारने ही सगळी परिस्थितीच बदलून टाकली आहे. योजनांमध्ये सुधारणा घडवून आणल्या आहेत. नवीन लक्ष्य निर्माण केले आणि ते गाठण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू ठेवले. या मालिकेमध्ये शेतकरी बांधवांना पहिल्यांदाच थेट मदत मिळाली. लहान शेतक-यांना तर आधी कोणी विचारतही नव्हते. आणि आपल्या देशामध्ये 90 टक्के लहान शेतकरी आहेत. 80 टक्क्यांपेक्षा जास्त, जवळ-जवळ 90 टक्के शेतकरी असे आहेत कीज्यांच्याकडे जेमतेम दोन एकर जमीन आहे. त्या लहान शेतक-यांसाठी आम्ही एक योजना बनवली. आमच्या मच्छीमार बंधू भगिनींना बँकवाले विचारायचेही नाहीत. आम्ही किसान क्रेडिट कार्डची सुविधा मच्छिमारांना उपलब्ध करून दिली. इतकेच नाही तर ठेलेवाले, हातगाडीवरून सामान विकणारे फिरस्ते विक्रेते, यांनाही पीएम स्वनिधीच्या रूपाने बँकेतून पहिल्यांदाच वित्तीय मदत सुनिश्चित केली. आणि माझी अशी इच्छा आहे की, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सर्व नगरांमध्ये फिरावे, आणि सगळ्या पथारीवाल्यांना, हातगाडीवरून माल विक्री करणा-यांना स्वनिधीचे पैसे मिळावेत, यासाठी मदत करावी. त्यांचा व्यापार व्याजाच्या दुष्ट चक्रातून मुक्त व्हावा. हे फिरस्ते विक्रेते, जी काही मेहनत, परिश्रम करतात, त्यातून मिळणारे सगळे उत्पन्न त्यांच्या घरासाठी उपयोगी पडावे. यासाठी एक अभियान चालवावे, असे मला वाटते. भरूच असो, अंकलेश्वर असो, वालिया असो सर्वांनी आपल्या या शहरातल्या फिरत्या विक्रेत्यांना योजनेचा लाभ कसा मिळेल, हे पहावे, असे मी आपले भाजपाचे सी आर पाटील यांनाही सांगितले आहे. वास्तविक भडूचमध्ये सर्वांची प्रत्यक्ष भेट घ्यायला पाहिजे होती, आणि बराच काळ झाला, मी या भागात आलो नाही, त्यामुळे मनात खूप इच्छा आहे. कारण भडूचचे आणि माझे खूप आधीपासून ऋणानुबंध आहेत. आणि भडूच तर आपला सांस्कृतिक वारसा आहे. व्यापाराचेसांस्कृतिक वारशाचे हे हजारो वर्षापासूनचे जुने केंद्र आहे. एकेकाळी संपूर्ण दुनियेला एकत्रित आणण्यासाठी भरुचचे नाव प्रसिद्ध होते. आणि आपली संस्कृती, वारसा, आपले शेतकरी, आपले आदिवासी बंधू आणि आता तर व्यापार, उद्योग यांच्यामुळे आपले  भरुच- अंकलेश्वर  अधिक समृद्ध झाले आहेत. भरुच- अंकलेश्वर आता जुळी शहरे बनली आहेत. असे काही होईल, अशी कोणी याआधी कल्पनाही केली नसेल. आणि मी जितका काळ इथं राहिलो आहे, ते सर्व दिवस मला चांगले आठवत आहेत. आज आधुनिक विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असलेले भरुच म्हणून या जिल्ह्याचे नाव होत आहे. अनेक कामे होत आहेत आणि ते स्वाभाविकच आहे.  ज्यावेळी मी भरुचच्या लोकांकडे येतो, त्यावेळी सगळ्या जुन्या लोकांची आठवण निघते. अनेक लोक, जुने-जुने मित्र, वरिष्ठ मित्र, या सर्वांबरोबर अजूनही अधून-मधून संपर्क होत असतो. अनेक वर्षांपूर्वी मी ज्यावेळी संघाचे काम करीत होतो, त्यावेळी बसमधून उतरून चालत-चालत मुक्तीनगर सोसायटीमध्ये जात होतो. मूळचंदभाई चौहान यांच्या घरी, आमचे बिपीनभाई शहा, आमचे शंकरभाई गांधी, असे जुने-जुने अनेक मित्र माझे आहेत. आणि आता तुम्हा लोकांना पाहतो त्यावेळी मला माझे शूरवीर सहकारी, समाजासाठी जगणारे शिरीष बंगाली यांची खूप आठवण येते. आणि मला हे शहर चांगले माहिती आहे, लल्लूभाई यांच्या गल्लीतून निघाले की आपला  पाचबत्ती विस्तार भाग येतो. आत्ता जे 20-25 वर्षांचे युवक-युवती आहेत, त्यांना तर हे माहितीही नसणार की, या पाचबत्ती आणि लल्लूभाई यांच्या गल्ल्यांचे कसे हाल होते. अतिशय अरूंद गल्ली, रस्ता होता. तिथून स्कूटर जाणेही खूप अवघड होते. आणि या रस्त्यावर इतके खड्डे होते, तेही मला चांगले आठवत आहे. मला आधीच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारे सार्वजनिक सभा घेण्याची संधी मिळत नव्हती. अनेक वर्षांपूर्वी भडूचवाल्यांनी मला आपल्या शक्तीनगर सोसायटीमध्ये पकडले. त्यावेळी तर मी राजकारणात आलोही नव्हतो. शक्तीनगर सोसायटीमध्ये एक सभा ठेवली होती. त्याला 40 वर्ष उलटली असतील. आणि मी सभेला झालेली गर्दी पाहून  एकदम अचंबित झालो. त्यावेळी सोसायटीमध्ये उभे राहण्यासाठी जागाही शिल्लक नव्हती. इतक्या प्रचंड संख्येने लोक आले होते. इतके सारे लोक आशीर्वाद देण्यासाठी आले होते. तोपर्यंत माझे काही खूप नाव झाले होते, असेही नाही. मला कोणी फारसे ओळखतही नव्हते, तरीही इतकी प्रचंड आणि जबरदस्त सभा झाली होती. त्यादिवशी तर राजकारणामध्ये मी कोणीही नव्हतो. अगदी नवखा होतो, खूप काही शिकत होतो. त्यावेळी माझे भाषण संपल्यानंतर मला कितीतरी पत्रकार मित्र भेटायला आले. मी त्यांना म्हणालो, तुम्ही माझे शब्द लिहून ठेवा, या भरुचमध्ये काँग्रेस कधीच जिंकणार नाही. असे मी त्यावेळी म्हणालो होतो. 40 वर्षांपूर्वी मी हे वाक्य बोललो होतो. त्यावेळी सर्वजण हसायला लागले, माझी खिल्ली उडवायला लागले. आणि आज मला हे सांगायचे आहे की, भडूचच्या लोकांनी आपल्या प्रेमाने आणि आशीर्वादाने माझे बोलणे सत्य ठरवले. इतके भरभरून प्रेम भडूच आणि इथल्या आदिवासी कुटुंबांकडून मिळाले. कारण मी सर्व गावांमध्ये हिंडत होतो. त्यावेळी अनेक आदिवासी जातींच्या परिवारामध्ये राहण्याचा, त्यांच्या सुख-दुःखामध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला. आमचे एक चंदूभाई देशमुख आधी होते, त्यांच्याबरोबर मी काम केले. नंतर आपल्या मनसुखभाईंनी सर्व कामकाज सांभाळले होते. आम्हा कार्यकर्त्यांची खूप मोठी जबाबदारी त्यांनी घेतली होती. आणि इतके सर्व सहकारी, इतक्या सर्व लोकांबरोबर काम केले आहे, त्या सर्व आठवणी आज तुमच्यासमोर आल्यानंतर जाग्या झाल्या आहेत.  प्रत्यक्ष तुम्हाला भेटण्याचा योग आला असता तर कितीतरी अधिक मजा आली असती. आपण इतके दूर आहोत, तरीही सर्व आठवणी येत आहेत. त्यावेळच्या काळातली आठवण सांगायची म्हणजे, एखाद्या भाजीवाल्याला खडबडीत रस्त्याचा किती त्रास होत होता, समोरून दुसरा कोणी आला तर त्याची भाजी खाली त्या खड्ड्यामध्ये रस्त्यावर पडायची. अशी अवस्था त्यावेळी होती. आणि मी एकदा त्या रस्त्यावरून जात होतो, त्यावेळी कुणा गरीबाची भाजीची पिशवी जर उलटली तर मी ती सरळ करून देत असे. अशा काळात मी भरुचमध्ये काम केले आहे. आणि आज चोहोबाजूंनी आपले भडूच विकसित होत आहे. रस्ते सुधारले आहेत, जीवन व्यवस्था सुधारली आहे. शिक्षण-संस्था, आरोग्य व्यवस्था चांगल्या आहेत. अगदी वेगाने आपला भडूच जिल्हा पुढे जात आहे. मला माहिती आहे, संपूर्ण आदिवासी विस्तार उमरगावापासून ते अंबाजीपर्यंत आहे. या आदिवासी पट्ट्यातले, गुजरातमध्ये आदिवासी मुख्यमंत्री होते. परंतु येथे मात्र विज्ञानाची शाळा नव्हती, याचा अर्थ मी मुख्यमंत्री बनल्यानंतर इथे विज्ञान शाळा सुरू करण्याची संधी मिळाली.  इथल्या शाळेमध्ये विज्ञान शिकविण्याची सुविधाच नव्हती तर मग अभियंता बनायचे असेल, डॉक्टर बनायचे असेल तर कसे काय शक्य होणार होते? आत्ताच आमचे याकूबभाई बोलत होते, मुलीला डॉक्टर बनायचे आहे, मग, आता मुलगी डॉक्टर बनण्याची शक्यता इथे निर्माण झाली आहे  की नाही? कारण आता अभ्यास सुरू झाला आहे! इथे आज परिवर्तन घडून आले आहे, म्हणूनच या मुलीनेही निश्चय केला आहे की, आपण डॉक्टर बनायचे. याच पद्धतीने भरुचमध्ये औद्योगिक विकास झाला आहे. आणि आता तर आपल्या भरुचमध्ये अनेक मुख्य मार्ग, वाहिन्या, फ्रंट कॉरिडॉर आणि बुलेट ट्रेन असो, एक्सप्रेस वे असो, सगळे काही इथे आहे. आता वाहतुकीचे कोणतेही साधन उरले नाही, की जे भडूचमधून उपलब्ध नाही. म्हणूनच एक प्रकारे भडूच युवकांच्या स्वप्नातला जिल्हा बनतोय. नवयुवकांच्या आकांक्षांचे शहर आणि विस्तार केंद्र बनत आहे. आणि नर्मदा माता, स्टॅच्यू ऑफ युनिटीनंतर तर आता आपले भरुच असो अथवा राजपिपला असो, संपूर्ण हिंदुस्तानात आणि अवघ्या दुनियेमध्ये आपले नाव चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. बंधूनो, स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचे असेल तर कुठून जायचे, आपल्या भडूचवरूनच राजपिपला येथे जावे लागते. आणि आता आम्ही दुसरा वियरबनवत आहोत. माझ्या चांगले स्मरणात आहे, भरुचमध्ये नर्मदेच्या पात्रातले पाणी पिण्यासाठी वापरणे अवघड होते. नर्मदा वाहती आहे, नदीचा किनारा आहे आणि प्यायला नर्मदेचे पाणी नाही, अशी परिस्थिती इथे होती. त्यावर काय उपाय असणार? हा उपायही आम्हीच शोधून काढला. आम्ही या समुद्राच्या वरच्या संपूर्ण भागावर मोठा वियरबनवला. या उपाय योजनेमुळे समुद्राचे खारे पाणी वरच्या बाजूला येणार नाही, अशी सुविधा केली. त्यामुळे नर्मदेचे पाणी एका विशिष्ट स्थानी थोपवून धरणे शक्य झाले. नर्मदेचे पाणी केवडियामध्ये भरणे यामुळे शक्य झाले. आणि जर कधी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला तर त्यावरही उत्तर मिळाले. आणि मी तर भूपेन्द्रभाई यांचे अभिनंदन करतो, कारण हे  काम  तेच पुढे नेत आहेत. या कामामुळे किती मोठा लाभ होणार आहे, याचा आपण कोणीही अंदाज लावू शकणार नाही. म्हणूनच मित्रांनो, मला तुम्हा सर्वांना भेटण्याची संधी मिळाली, याचा खूप खूप आनंद वाटतोय. जुन्या-जुन्या मित्रांची आठवण येणे अगदी स्वाभाविक आहे. आम्ही जे नील अर्थव्यवस्थेवर काम करीत आहोत, त्यामध्येही भडूच जिल्हा खूप काही करू शकतो. सागराच्या पोटामध्ये जी अमाप संपदा आहे, आपली सागरखेडू योजना आहे, त्याचा लाभ घेवून आपल्याला पुढे जायचे आहे. शिक्षण असो, आरोग्य असो, जहाज बांधणी असो, संपर्क यंत्रणा असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगाने पुढे जायचे आहे. आज मला आनंद वाटतो की, भरुच जिल्ह्याने पुढे पाऊल टाकले आहे, नवीन प्रारंभ केला आहे. तुम्हा सर्व लोकांचे खूप- खूप अभिनंदन करतो. शुभेच्छा देतो.

जय-जय गरवी गुजरात! वंदे मातरम्!!

***

S.Thakur/S.Patil/S.Chavan/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1825444) Visitor Counter : 170