युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
नवी दिल्ली आणि धरमशाला येथे एकाच वेळी साजऱ्या झालेल्या योग महोत्सवाचे केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी केले नेतृत्व
योगशास्त्राने अनेकांना रोजगार पुरवले आणि कोविड काळात हा सर्वात पहिला रोगप्रतिकारक्षमता प्रदान करणारा मार्ग होता
Posted On:
14 MAY 2022 11:37PM by PIB Mumbai
21 जून रोजी आयोजित होणाऱा आंतरराष्ट्रीय योग दिवस आता जवळ येऊ लागल्यानं या निमित्ताने केंद्रीय क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्रालयाने आज नवी दिल्ली आणि धरमशाला येथे एकाच वेळी एका आगळ्या वेगळ्या योग महोत्सव संध्येचं आयोजन केलं. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी धरमशाला स्टेडीयम मधून या 40 मिनिटांच्या कार्यक्रमाचं नेतृत्व केलं. या कार्यक्रमात 2000 पेक्षा जास्त खेळाडू आणि योग साधक सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना असलेला योग महोत्सव हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील एक आगळावेगळा कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमात दोन राज्यांमधील सहभागी झालेला युवा वर्ग आणि योग साधकांनी सादर केलेल्या योगाभ्यासाचे अप्रतिम सादरीकरण आजच्या योगसंध्या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आणि या प्रात्यक्षिकांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.
14 मे ते 21 जून पर्यंत आम्ही भारतातील सर्व गावांमध्ये योग महोत्सवाचे आयोजन केले आहे. या वर्षी आम्हाला विक्रम मोडायचा आहे आणि आंतरराष्ट्रीय योग दिनी सर्वोच्च संख्येने लोक सहभागी होतील हे सुनिश्चित करायचे आहे, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. हा कार्यक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्याचा एक भाग आहे आणि योग दिनाबाबत जास्तीत जास्त जागरुकता निर्माण करण्याचा त्याचा उद्देश आहे.
श्री नरेंद्र मोदीजींनी 2014 मध्ये 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये केलेल्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक देशाने एक ठराव संमत केला होता आणि या प्रस्तावाबाबत सहमती व्यक्त केली, असे ठाकूर यांनी सांगितले.
धौलाधार पर्वताच्या नयनरम्य रांगांच्या पायथ्याशी असलेला धरमशाला स्टेडियम वेगळाच भासत होता. योगासन फेडरेशनच्या योग साधकांनी आंतरराष्ट्रीय योग दिन प्रोटोकॉलचे सादरीकरण केले आणि त्याचबरोबर दिव्यांग समुदाय आणि इतर काही समूहांनी आणि काहींनी वैयक्तिक स्वरुपातही प्रात्यक्षिके सादर केली. नव्या पिढीमध्ये योगाभ्यासाविषयी झालेल्या जागरुकतेबाबत बोलताना ठाकूर म्हणाले, “योगशास्त्राने अनेकांना रोजगार दिले आहेत आणि कोविड काळात हा सर्वात पहिला रोगप्रतिकारक्षमता प्रदान करणारा मार्ग होता. युवा भारताने योगशास्त्राचा आणि फिट इंडियाचा पूर्णपणे अंगिकार केला आहे. आता पार्कमध्ये असो वा कार्यालय, सर्वत्र लोक योगसाधना करतात. रेल्वे आणि विमानातही लोक योगाभ्यास करतात. शॉपिंग कॉम्प्लेक्समध्येही आता योग कक्ष आहेत. हे खूपच प्रचंड आहे."
गेल्या महिन्यात बंगळूरु येथे झालेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये योगासनांचे एक खेळ म्हणून पदार्पण झाले. टीव्हीवर हे पाहणाऱ्या अनेकांकडून त्याला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. पुढील महिन्यात पंचकुला येथे होणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्येही योगासनांचा समावेश एक खेळ म्हणून केला जाणार आहे.
***
N.Chitle/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1825442)
Visitor Counter : 200