संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 दरम्यान सरकारच्या सर्वांगीण प्रयत्नांमुळे भारतीय अर्थव्यवस्था व्ही-आकारात उभारी घेत असल्याचे लखनौमधील एका कार्यक्रमात संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन

Posted On: 14 MAY 2022 4:01PM by PIB Mumbai

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 14 मे 2022 रोजी उत्तर प्रदेश मधील लखनौ येथे भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या (ICAI) सेंट्रल इंडिया रिजनल कौन्सिल (CIRC) च्या लखनौ शाखेने आयोजित केलेल्या वित्तीय बाजारावरील कार्यशाळेला संबोधित केले. अर्थव्यवस्थेशी संबंधित नवीन घडामोडींबद्दल सहभागींना अद्ययावत माहिती देण्यासाठी आणि या क्षेत्राशी संबंधित भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी आणि उद्युक्त करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सनदी लेखापाल हे आर्थिक व्यवस्थापन आणि लेखापरीक्षणाचा आधारस्तंभ असल्याचे सांगत राजनाथ सिंह यांनी देशाची  व्यावसायिक परिसंस्था योग्य दिशेने चालविण्यात सनदी लेखापालांच्या (सीए) योगदानाची प्रशंसा केली. सनदी लेखापालांनी त्यांची कर्तव्ये पार पाडताना प्रामाणिकपणाची खात्री करणे आवश्यक आहे कारण त्यांच्यामुळे लोकांचा वित्तीय संस्थांवर विश्वास राखला जातो .

कोविड-19 महामारी आणि आता रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि लॉजिस्टिक अडथळ्यांमुळे जागतिक अर्थव्यवस्था अत्यंत कठीण टप्प्यातून जात असल्याचे मत संरक्षण मंत्र्यांनी मांडले. सध्या सुरू असलेल्या संघर्षाचा संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे.

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या व्यत्ययामुळे आणि अनिश्चिततेमुळे खासगी वापरावरील खर्च कमी झाल्याचे नमूद करून राजनाथ सिंह म्हणाले की, या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत आणि त्याचे परिणाम दिसत आहेत. अनेक एजन्सींच्या सर्वेक्षणांनुसार, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून प्रगती करत आहे. आमची निर्यात नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे आणि त्यात आणखी वृद्धी होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियासोबत एक मोठा मुक्त व्यापार करार करण्यात आला आहे आणि इतर भागीदार देशांसोबतही असेच करार करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

संरक्षण मंत्र्यांनी सकल जीएसटी महसूल संकलनाबद्दल देखील माहिती दिली जे एप्रिल 2022 साठी आत्तापर्यंतचे सर्वाधिक 1.68 लाख कोटी रुपये होते. ते पुढे म्हणाले की जागतिक आणि देशांतर्गत स्तरावर नवीन गुंतवणूक केली जात आहे ज्यामुळे पुरवठा साखळीवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.

रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे आणि जहाजबांधणी यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे बांधकाम हे सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक आहे यावर संरक्षण मंत्र्यांनी भर दिला. उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेमुळे खासगी गुंतवणुकीत वाढ झाली आहे ज्यामुळे अर्थव्यवस्थेतील मागणी वाढेल असेही ते म्हणाले.

राजनाथ सिंह म्हणाले की या प्रयत्नांमुळे देशांतर्गत मागणी, मग ती गुंतवणूक असो वा उपभोग, झपाट्याने वाढत आहे. आम्ही महामारीनंतर व्ही-आकाराच्या पुनर्प्राप्तीचे साक्षीदार आहोत. पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्सवर आमचे लक्ष केंद्रित केल्याने पुरवठ्यातील अडथळे दूर होऊ लागले आहेत. आमच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या यशामुळे संपर्क-आधारित सेवांनाही गती मिळत आहे. आपली अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी हे सुचिन्ह आहे, ते म्हणाले.

तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी, संरक्षण मंत्री म्हणाले, सरकार संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) सारख्या संशोधन आणि विकास आस्थापनांमध्ये सुधारणा करत आहे.

संस्थांना बळकट करण्यासाठी आणि त्यांना व्यवसाय सुविधा देणार्‍यांमध्ये रूपांतरित करण्यासाठी उचललेल्या पावलांबद्दलही राजनाथ सिंह यांनी माहिती दिली. 

***

N.Chitle/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1825417) Visitor Counter : 212