वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"ओमानसोबत प्राधान्याचा व्यापार करार (PTA) करण्याचा भारताचा विचार - पीयूष गोयल


पीयूष गोयल यांचे ओमान सरकारला भारतासोबत औषध उत्पादनांचा व्यापार वाढवण्यासाठी निमंत्रण

उभय देशांच्या सरकारच्या द्विपक्षीय प्रतिबद्धता अधिक वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नांना सहायक ठरण्याचे पीयूष गोयल यांचे भारत-ओमान संयुक्त व्यापार परिषदेला (JBC)आवाहन

Posted On: 12 MAY 2022 7:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मे 2022

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी आज सांगितले की, भारत ओमानसोबत एक प्राधान्य व्यापार करार (PTA) करण्याचा विचार करत आहे.

ते आज नवी दिल्लीत भारत-ओमान संयुक्त व्यापार परिषदेच्या (JBC) 10 व्या बैठकीत बीजभाषणात बोलत होते. भारताचा आधीच आखाती सहकार परिषद (GCC) राष्ट्रांसोबत सर्वसमावेशक व्यापार करार आहे, ज्यामध्ये ओमान हा एक महत्त्वाचा सदस्य आहे असेही त्यांनी सांगितले.

मंत्री म्हणाले की भारत आणि ओमान यांच्यात काल झालेली संयुक्त आयोगाची बैठक (JCM) जी दीर्घकाळ प्रलंबित होती, ती अतिशय फलदायी ठरली. त्यांनी विश्वास व्यक्त केला की दोन्ही बाजूंच्या व्यावसायिक दिग्गजांशी चर्चा ही संयुक्त आयोगाच्या बैठकीतील चर्चेला पूरक ठरेल, आमचे आधीच असलेले मैत्रीचे बंध दृढ करण्यासाठी नव कल्पना घेऊन येईल  आणि आमचा दृष्टिकोन साकार होईल.

भारत आणि ओमान हे 5,000 वर्षांहून अधिक काळ मैत्री आणि बंधुता तसेच घनिष्ठ आणि परस्परांमधील मजबूत संबंधांच्या माध्यमातून जोडलेले आहेत, असे निरीक्षण नोंदवून मंत्री म्हणाले की, इतके घनिष्ठ संबंध असूनही, दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीने अद्याप सर्वोच्च क्षमता गाठलेली नाही. गोयल यांनी यावर भर दिला की संयुक्त आयोगाच्या बैठकीत झालेल्या सर्व गुंतवणुकी, ते आणि ओमानमधील त्यांचे समकक्ष यांच्यातील मैत्री, दोन्ही राष्ट्रांच्या प्रमुखांचे दूरदर्शी नेतृत्व आणि लोकांशी असलेले स्नेहपूर्ण संबंध हे लक्षणीयरित्या वाढून व्यावसायिक गुंतवणूक वाढण्यात त्याचे रुपांतर झाले पाहिजे.

दिवंगत सुलतान काबूस यांना आदरांजली वाहताना, पीयूष गोयल म्हणाले की त्यांना भारताला त्यांच्याविषयी अत्यंत आदर असून त्यांना गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते भारत-ओमान दरम्यानच्या घनिष्ठ   द्विपक्षीय संबंधांचे शिल्पकार होते, असेही मंत्री म्हणाले. त्यांच्या दृष्‍टीकोनाचे प्रत्यक्षात रुपांतर करण्‍यासाठी आणि भारत आणि ओमान मधील भागीदारी खरोखरच पात्रतेच्‍या उंचीवर नेण्‍यासाठी आम्‍ही त्यांचे ऋणी आहोत, असे मंत्री महोदयांनी नमूद केले.

उभय देशातील प्रतिबद्धता वाढवण्यासाठी संयुक्त व्यापार परिषद (JBC) दोन्ही देशांच्या सरकारच्या प्रयत्नांना पूरक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी अधोरेखित केले की हे करार त्यांची खरी क्षमता तेव्हाच गाठतील जेव्हा उद्योजक उत्साह दाखवतील, ज्यामुळे राजकीय नेतृत्वाला धाडसी निर्णय घेण्यास मदत होईल. त्यांनी दोन्ही देशांतील व्यवसायांना विशेषत: सेवा, गुंतवणूक, अन्न सुरक्षा, शाश्वतता, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि स्टार्टअपमध्ये नवीन संधी शोधण्याचे आवाहन केले.

विशेषत: महामारीच्या काळात ओमानच्या लोकांनी प्रवासी भारतीयांची केलेली सेवा, काळजी आणि दाखवलेला स्नेह यांचा उल्लेख मंत्र्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, ओमान हा आखाती सहकार परिषदेतील भारतातील कोवॅक्सिनचा वापर अधिकृत करणारा पहिला देश आहे. दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि पाककला विषयक स्नेहसंबंधांचा उल्लेख करून मंत्री म्हणाले की, या संबंधांमुळे दोन्ही देशांतील लोक आणखी जवळ आले आहेत.

मंत्र्यांनी ओमान सरकारला भारतासोबतचा औषधी व्यापार वाढवण्यासाठी आमंत्रित केले. काल संयुक्त आयोगाच्या बैठकीत सादर करण्यात आलेल्या औषध निर्माण क्षेत्रातील सहकार्यावरील बाजार अभ्यासाचा उल्लेख करून मंत्री महोदयांनी विश्वास व्यक्त केला की, ओमानी बाजारपेठेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या भारतीय कंपन्यांसाठी हा अहवाल अमूल्य ठरेल. आमच्या औषध निर्माण कंपन्या ओमानमधील ग्राहकांसाठी स्पर्धात्मक किमतीत दर्जेदार उत्पादने आणतील आणि आरोग्यसेवेचा खर्च कमी करण्यास मदत करतील, असे आश्वासन त्यांनी दिले. ब्रिटन, युरोपियन महासंघ आणि अमेरिकेसारख्या मजबूत नियामक वातावरणाने आधीच मंजूर केलेल्या भारतीय औषधांसाठी जलदगतीने मान्यता देण्यास सहमती दिल्याबद्दल त्यांनी ओमानचे आभार मानले.

भारत आणि ओमानमधील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी एकत्र काम करताना दोन्ही देशांनी कोणतीही कसर सोडू नये असे आवाहन मंत्र्यांनी केले.

ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस बिन मोहम्मद अल युसेफ म्हणाले की, दोन्ही राष्ट्रांची संयुक्त आयोगाची यशस्वी बैठक झाली आणि भारत आणि ओमानचा एकमेकांवर खूप भरवसा आणि विश्वास आहे. त्यांनी भारतीय कंपन्यांना ओमानमध्ये गुंतवणूक आणि व्यवसाय करण्यासाठी आमंत्रित केले.

ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस बिन मोहम्मद अल युसेफ, विशेष राजदूत आणि पूर्णाधिकारी शेख हमद बिन सैफ बिन अब्दुल अझीझ अल-रावही, ओमानमधील भारतीय राजदूत अमित नारंग, भारतीय आणि ओमानी उद्योगाचे दिग्गज आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

S.Patil/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1824871) Visitor Counter : 151


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu