संरक्षण मंत्रालय

तंत्रज्ञानात भविष्यकालीन गरजानुसार प्रगती ही काळाची गरज: डीआरडीओ इथे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कार्यक्रमात संरक्षण राज्यमंत्र्यांचे प्रतिपादन


देशांतर्गत खरेदीद्वारे संरक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची अजय भट्ट यांची माहिती

Posted On: 11 MAY 2022 3:58PM by PIB Mumbai

 

संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी वैज्ञानिक समुदायाला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या तंत्रज्ञानामध्ये प्रगती करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून भविष्यातील धोक्यांना तोंड देण्यासाठी देश सज्ज असेल. ते 11 मे 2022 रोजी नवी दिल्ली इथे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेद्वारे (DRDO) आयोजित राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कार्यक्रमाला संबोधित करत होते. सरकार देशांतर्गत खरेदीद्वारे संरक्षण आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी संरक्षण परिसंस्थेतील सर्व क्षेत्र एकत्रितपणे काम करतील असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारतया संकल्पनेच्या अनुषंगाने सशस्त्र दलांना अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देणारी आत्मनिर्भर संशोधन आणि विकास परिसंस्था स्थापन करण्याच्या डीआरडीओ च्या प्रयत्नांचे संरक्षण राज्यमंत्यानी कौतुक केले. डीआरडीओने अत्यंत अत्याधुनिक शस्त्रे प्लॅटफॉर्म/यंत्रणेची रचना, विकास आणि उत्पादनाद्वारे स्वतःला सिद्ध केले आहे. त्यात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढला आहे. या प्रयत्नांमुळे, भारत आता संरक्षण उपकरणांची निर्यात करणार्‍या अव्वल 25 देशांमध्ये आहे, ते म्हणाले.

सन 1998 मध्ये पोखरण येथे झालेल्या अणुचाचण्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन पाळला जातो. शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील एकात्मिक दृष्टीकोनही यावर्षीची संकल्पना आहे. ही संकल्पना देशाच्या प्रगतीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित करते असे अजय भट्ट यांनी सांगितले.

देशाची तांत्रिक स्वप्ने साकार करण्यासाठी उत्कृष्ट कौशल्य दाखविल्याबद्दल वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींना 2019 वर्षासाठीच्या डीआरडीओ पुरस्कारांचे वितरण या कार्यक्रमादरम्यान संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कारांच्या श्रेणीमध्ये जीवनगौरव पुरस्कार, तंत्रज्ञान नेतृत्व, वरिष्ठ वैज्ञानिक पुरस्कार, अकादमी उत्कृष्टता, तंत्रज्ञान -व्यवस्थापकीय, आत्मनिर्भर आणि कामगिरी पुरस्कारांचा समावेश आहे.

डीआरडीओ चे माजी संचालक डॉ. के.जी. नारायणन यांनी लिहिलेले एन्डेव्हर्स इन सेल्फ-रिलायन्स डिफेन्स रिसर्च (1983-2018)’ आणि डीआरडीओ चे माजी महासंचालक डॉ. जी. अथिथन यांनी लिहिलेले कन्सेप्ट्स अँड प्रॅक्टिसेस फॉर सायबर सिक्युरिटीया दोन प्रबंधांचे प्रकाशनही अजय भट्ट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डिफेंस टेक्नॉलॉजी स्पेक्ट्रमचेही प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात डीआरडीओच्या शास्त्रज्ञांची प्रगत तंत्रज्ञानावरील तीन भाषणेही ऐकायला मिळाली.

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओ चे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी त्यांच्या भाषणात शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन केले आणि आत्मनिर्भर संरक्षण परिसंस्था निर्माण करण्यासाठी त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. अंतराळ विभागाचे सचिव आणि अंतराळ आयोगाचे अध्यक्ष एस सोमनाथ; संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि डीआरडीओचे शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित होते.

***

S.Patil/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1824424) Visitor Counter : 310