अर्थ मंत्रालय
महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याच्या तस्करीचे प्रयत्न हाणून पाडले
लखनौ आणि मुंबई येथून 5.88 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 11 किलो सोने केले जप्त
Posted On:
10 MAY 2022 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मे 2022
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) गेल्या आठवड्यात लखनौ आणि मुंबई येथे सलग दोन वेळा यशस्वी कारवाई करून हवाई मार्गाने संघटीतपणे होणाऱ्या सोन्याच्या तस्करीचे प्रयत्न हाणून पाडले आहेत, ज्यात सोने लपवून नेण्याची सामान्य पद्धत वापरली होती.
कारवाईसाठी अचूक रुपरेषा निश्चित करून, दिनांक 06.05.2022 रोजी, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी दुबईहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, एअर कार्गो कॉम्प्लेक्स, येथे आलेल्या मालाची तपासणी केली.
आयात माहिती कागदपत्रांत याची नोंद, "वेगवेगळे सुटे भाग आणि ड्रम प्रकाराचे सफाई मशीन" म्हणून घोषित करण्यात आले होते, परंतु काळजीपूर्वक तपासणी केल्यावर, 3.10 कोटी रुपये मूल्य असलेले 5.8 किलो सोने चकत्यांच्या आकाराच्या स्वरूपात आयात केलेल्या मशीनच्या दोन मोटर रोटर्समध्ये लपवून ठेवलेले आढळले. हा आयातदार दक्षिण मुंबईत असून त्याला तातडीने कारवाई करून अटक करण्यात आली आहे. या आयातदाराला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
लखनऊमध्ये देखील डीआरआय अधिकाऱ्यांनी मुंबईतील या जप्तीच्या एक दिवस आधी दिनांक 05.05.2022 रोजी आणखी एका जप्तीची कारवाई केली. त्या प्रकरणात देखील,डीआरआयने लखनौच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये "इलेक्ट्रिकल थ्रेडिंग मशीन" असल्याचे सांगितलेल्या आयात माल पकडला आणि तिथेही मशिनमध्ये सोन्याच्या चकत्या लपविल्याचे आढळले.
एकूण 5.2 किलो सोने, ज्याचे मूल्य 2.78 कोटी रुपये आहे,ते या प्रकरणांत जप्त करण्यात आले आहे.
तपासांच्या या मालिकेमुळे हवाई मालवाहू आणि कुरिअर मार्गाने मूळ परदेशी सोन्याची भारतात तस्करी करण्याची नवीन कार्यपद्धती शोधण्यास मदत झाली आहे. अशा तपासण्यांमुळे डीआरआय(DRI) ची तस्करीच्या निरनिराळ्या आणि अत्याधुनिक पद्धती शोधण्याची आणि त्यांचा सामना करण्याची क्षमता मजबूत होत असते. 2021-22 या कालावधीत, महसूल गुप्तचर संचालनालय अधिकाऱ्यांनी एकूण 833 किलो तस्करी करून आणलेले सोने जप्त केले आहे, ज्याचे मूल्य 405 कोटी रुपये इतके आहे.
* * *
S.Kane/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1824172)
Visitor Counter : 253