उपराष्ट्रपती कार्यालय

पोलीस दलात सुधारणा लागू करण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन


सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे आणि ऑनलाईन घोटाळे प्रभावीपणे हाताळण्यासाठी पोलिसांचे कौशल्य अद्ययावत करण्याच्या आवश्यकतेवर  उपराष्ट्रपतीनी दिला भर

“स्ट्रगल फॉर पोलीस रिफॉर्म्स इन इंडिया ” या पुस्तकाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन

Posted On: 08 MAY 2022 4:46PM by PIB Mumbai


 

उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी आज प्रगतीशील, आधुनिक भारत देशात जनतेच्या लोकशाहीविषयक आकांक्षा पूर्ण करणारे पोलीस दल असायला हवे या मुद्द्यावर अधिक भर दिला आणि पोलीस दलात सुधारणा लागू करण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याचे आवाहन केले.

भारतीय पोलीस सेवेतील माजी अधिकारी प्रकाश सिंग यांनी लिहिलेल्या स्ट्रगल फॉर पोलीस रिफॉर्म्स इन इंडिया या पुस्तकाचे प्रकाशन  केल्यानंतर उपराष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधित केले. सायबर गुन्हे आणि आर्थिक गुन्हे यांसारख्या अत्याधुनिक आणि अनेकदा सीमापार स्वरूप असल्यामुळे तपासविषयक विशेष कौशल्याची आवश्यकता असलेल्या 21 व्या शतकातील गुन्हे परिणामकारक हाताळण्यासाठी आपल्या पोलिसांची कौशल्ये अधिक अद्ययावत करण्याच्या आवश्यकतेवर   त्यांनी  भर दिला.

उपराष्ट्रपतींनी पोलीस दलातील मोठ्या संख्येने असलेल्या रिक्त जागा भरणे आणि आधुनिक युगातील पोलिसी कारवाईच्या गरजांनुसार देशातील पोलीस विषयक पायाभूत सुविधा बळकट करणे या कामांसह काही समस्या युद्धपातळीवर सोडविण्याच्या गरजेला विशेषत्वाने सर्वांसमोर मांडले. बहुतांश गुन्ह्यांमध्ये त्वरित प्रतिसाद देणाऱ्या अगदी तळाकडच्या पोलीस दलाला अधिक मजबूत करण्याचे त्यांनी विशेषत्वाने आवाहन केले. पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या निवास सुविधेत देखील सुधारणा केली पाहिजे असे ते म्हणाले.

पोलिसांकडून सामान्य माणसाला दिली जाणारी वागणूक विनम्र आणि मैत्रीपूर्ण असायला हवी असे आग्रही प्रतिपादन करत उपराष्ट्रपतींनी यासंदर्भात स्वतः उदाहरण घालून देण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना केले.

देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच भारताच्या आर्थिक विकासाला आधार देण्यासाठी पोलीस दलांमध्ये सुधारणेची गरज आहे याचा देखील उपराष्ट्रपती नायडू यांनी पुनरुच्चार केला. प्रगती करण्यासाठी शांतता पूर्वापेक्षित आहे, ते म्हणाले.

वर्ष 2006 मधील पोलीस सुधारणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश लागू न करण्याबद्दल निर्माण झालेल्या निराशेची दखल घेत उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, पोलीस दले हा राज्य सरकारांच्या अखत्यारीतील विषय आहे आणि पोलिसांच्या संदर्भातील सुधारणा लागू करण्यासाठी राज्य सरकारांनी पुढाकार घ्यायला हवा. देशात अत्यंत गरजेच्या पोलीसविषयक सुधारणा लागू करण्यासाठी सर्व राज्य सरकारे आणि केंद्र सरकार भारतीयत्वाच्या संघभावनेने एकत्र येऊन काम करतील अशी मला आशा आहे, ते म्हणाले.

पोलिसांच्या अधिक उत्तम कार्यासाठी केंद्र सरकारने, कायद्याचे उल्लंघन तसेच किरकोळ गुन्ह्यांचे गुन्हेगारीकरण रद्द करण्यासाठीचा प्रकल्प आणि शंभर वर्षांहूनही अधिक काळापूर्वी मंजूर झालेल्या कैद्यांची ओळखनिश्चिती कायदा, 1920 मध्ये सुधारणा करण्याची घडामोड यांसह अनेक उपक्रम हाती घेतल्याबद्दल उपराष्ट्रपती नायडू यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी पोलीस दलाला स्मार्ट दल म्हणजे कठोर आणि संवेदनशील, आधुनिक आणि त्वरित हालचाली करणारे, सावध आणि जबाबदार, विश्वसनीय आणि प्रतिसाद देणारे, तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुसज्ज आणि प्रशिक्षित असलेले दल करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाची देखील प्रशंसा केली.  

समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात पोलिसांचे महत्त्व अधोरेखित करत नायडू यांनी पोलिसांच्या दैनंदिन कार्य पद्धतीमध्ये तंत्रज्ञानाचा जास्त प्रमाणात वापर करण्याला सरकार अधिक प्राधान्य देत असल्याबद्दल प्रशंसा केली.

राजकारण, कायदे मंडळे आणि न्यायव्यवस्था यांच्यासह सामाजिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सुधारणा आवश्यक आहेत असे सांगत उपराष्ट्रपतींनी, पोलीस यंत्रणेवर सामान्य लोकांचा विश्वास कायम ठेवण्याच्या दृष्टीने राजकारणी व्यक्ती तसेच नागरी सेवकांविरुद्धच्या गुन्ह्यांवर जलद कारवाई करण्याच्या गरजेवर भर दिला. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये नीतीला सोडून होणाऱ्या पक्षांतराच्या घटनांना रोखण्यासाठी पक्षांतर-विरोधी कायद्यात सुधारणा करण्याचे देखील आवाहन नायडू यांनी केले.

देशातील पोलीस सुधारणांच्या उद्देशाने प्रयत्न करण्याबद्दल पुस्तकाचे लेखक सिंग यांचे कौतुक करत, उपराष्ट्रपती म्हणाले की त्यांचे हे पुस्तक म्हणजे एक पोलीस अधिकारी त्याच्या एकट्याच्या प्रयत्नांतून काय साध्य करू शकतो याचे उल्लेखनीय वर्णन आहे.

गुन्हेगार, दहशतवादी, अतिरेकी आणि देशाच्या विविध भागांमध्ये बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्या अनेक प्रकारच्या समाजकंटकांशी लढा देण्याचे कर्तव्य पार पाडताना ज्या पोलिसांनी प्राणार्पण केले त्यांना उपराष्ट्रपती नायडू यांनी या प्रसंगी श्रद्धांजली वाहिली.

***

N.Chitale/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1823653) Visitor Counter : 302