पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते आसाममधल्या सात कर्करोग रुग्णालयांचे लोकार्पण आणि आसाममधील आणखी नव्या सात कर्करोग रुग्णालयांची पायाभरणी


आसाममधील कर्करोग रुग्णालये, ईशान्य भारतात तसेच दक्षिण आशियात आरोग्य सुविधांची क्षमता वाढविण्यास उपयुक्त ठरतील

“स्वास्थ्य के सप्तऋषि’ या नावाने, आरोग्यव्यवस्थेतील सात स्तंभ पंतप्रधानांनी केले विशद

“देशातल्या सर्व नागरिकांना केंद्र सरकारच्या सर्व योजनांचे लाभ मिळावेत, असे प्रयत्न असून देशाच्या कुठल्याही भागात त्यांच्यावर यासाठी बंधने नकोत. एक देश, एक आरोग्य यामागे हीच भावना”

केंद्र आणि आसामचे सरकार चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या लाखों कुटुंबांना उत्तम जीवनमान देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे

Posted On: 28 APR 2022 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 एप्रिल 2022 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसामच्या  डिब्रूगढ़ इथल्या कार्यक्रमात, सहा कर्करोग रुग्णालयांचे लोकार्पण केले. ही रुग्णालये, डिब्रूगढ़, कोकराझार, बारपेटा, दारांग, तेजपूर, लखीमपूर आणि जोरहट इथे बांधण्यात आली आहेत. डिब्रूगढ़ इथल्या आणखी एका रुग्णालयाचे लोकार्पण पंतप्रधानांनी सकाळी केले, आणि त्यावेळी त्यांनी रुग्णालय परिसराला देखील भेट दिली. त्याशिवाय, आणखी सात कर्करोग रुग्णालयाची पायाभरणी देखील त्यांच्या हस्ते झाली. यात, धुबरी, नालबारी, गोलपारा, नागाव, सिवसागर, तीनसुखिया आणि गोलाघाट इथे, दोन टप्प्यात बांधली जाणार आहेत. आसामचे राज्यपाल, जगदीश मुखी, मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा, केंद्रीय मंत्री सर्वांनंद सोनोवाल, रामेश्वर तेली, माजी सरन्यायाधीश  आणि राज्यसभा सदस्य रंजन गोगोई, आणि सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा देखील उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पंतप्रधानांनी, सध्याच्या उत्सवी ऋतुचे वर्णन केले आणि आसामचे भूमी पुत्र आणि कन्याना अभिवादन केले. आज आसामधील ज्या कर्करोग रुग्णालयांचे लोकार्पण झाले, आणि ज्यांच्यासाठी पायाभरणी केली गेली, त्यामुळे, केवळ ईशान्य भारतच नाही, तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध होतील. कर्करोग आज केवळ आसाममध्येच नाही, तर एकूणच ईशान्य प्रदेशात गंभीर समस्या ठरली आहे, याची त्यांनी दखल घेतली. “आपल्या गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.” काही दिवसांपूर्वीपर्यंत रुग्णांना कर्करोगावरील उपचारांसाठी मोठ्या शहरात येणे भाग पडे, त्यामुळे, गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना  मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत असे. मात्र, आता आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिसव सरमा आणि केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल तसेच टाटा ट्रस्ट ने पुढाकार घेत, आसामचा हा प्रलंबित प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी चिकाटीने प्रयत्न केले, असे पंतप्रधानांनी सांगितले. यंदाच्या अर्थसंकल्पात , प्रधानमंत्री ईशान्य भारत विकास उपक्रमाची घोषणा करण्यात आली असून, त्यासाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देखील कर्करोगावरील उपचारांवर भर देण्यात आलेला आहे, आणि गुवाहाटी इथे तशा सुविधाही दिल्या जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

आरोग्यक्षेत्रासाठी केंद्राच्या दृष्टिकोनाविषयी बोलतांना त्यांनी ‘स्वास्थ्य के सप्तर्षि’ या संकल्पनेचा विस्तार केला. सरकारचा पहिला प्रयत्न असा आहे की आजार येऊच नये, ‘ म्हणूनच, आमच्या सरकारने प्रतिबंधक आरोग्यसुविधांवर भर दिला आहे. योग, फिटनेसषी संबंधित कार्यक्रम देखील याच कारणाने राबवले जात आहेत.” असे त्यांनी सांगितले. दुसरे, जर आजार झालाच, तर त्याचे निदान लवकर झाले पाहिजे. यासाठी, लाखो नवे चाचणी केंद्र बांधले जात आहेत. तिसरा भर, लोकांना उत्तम उपचार पद्धती त्यांच्या घराजवळ मिळतील, यावर देण्यात आला आहे.  यासाठी, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दर्जात सुधारणा केली जात आहे. चौथा प्रयत्न हा आहे, की गरिबांना उत्तम रुग्णालयात मोफत सुविधा मिळाव्या. यासाठी, आयुष्मान भारत सारख्या योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून पांच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. आमचे पाचवे उद्दिष्ट आहे उपचारांसाठी मोठ्या शहरांवर अवलंबून राहावे लागू नये. यासाठी, आमचे सरकार आरोग्यविषयक पायाभूत सुविधामध्ये अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले, “ 2014 पूर्वी, देशात केवळ 7 एम्स होते. यापैकी, एक दिल्लीतले एम्स वगळता, इतर ठिकाणी, एमबीबीएस अभ्यासक्रम नव्हता किंवा बाह्य रुग्ण विभाग नव्हते. काही ठिकाणी काम अपूर्ण होते. आम्ही या सगळ्या कमतरता दूर केल्या. आणि  देशात नवे 16 एम्स बांधण्याची घोषणा केली. एम्स गुवाहाटी ही त्यापैकीच एक आहे. सहाव्या मुद्दयाबद्दल बोलतांना पंतप्रधान म्हणाले, “आपले सरकार डॉक्टरांची कमतरता भरुन काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

गेल्या सात वर्षांत एमबीबीएस आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ७० हजारांहून अधिक नवीन जागांची भर पडली आहे. 5 लाखांहून अधिक आयुष डॉक्टरांनी अॅलोपॅथी डॉक्टरांच्या बरोबरीने  उपचार करण्याला आमच्या  सरकारने मान्यता दिली आहे. .” आरोग्य सेवांचे डिजिटायझेशन हे सरकारचे सातवे उद्दिष्ट आहे.उपचारासाठी लागणाऱ्या लांबलचक रांगा, उपचाराच्या नावाखाली होणाऱ्या त्रासातून सुटका व्हावी, हा सरकारचा  प्रयत्न आहे. यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत, असेही मोदी म्हणाले.  केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ संपूर्ण देशातील नागरिकांना मिळावा, यासाठी देशात कुठेही कोणतेही बंधन नसावे, असा प्रयत्न आहे, यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. ही एक राष्ट्र, एक आरोग्य ही  भावना आहे. या भावनेने 100 वर्षांनंतर आलेल्या  सर्वात मोठ्या महामारीतही देशाला बळ दिले, आव्हानाला सामोरे जाण्याचे सामर्थ्य दिले. कर्करोगाच्या उपचाराचा प्रचंड खर्च हा लोकांच्या मनात असलेले मोठे दडपण  आहे.या खर्चामध्ये  कुटुंबाला कर्जात  आणि नापिकीत ढकलण्याची क्षमता असल्यामुळे विशेषतः महिलांनी उपचार टाळले. अनेक औषधांच्या किंमती  जवळपास निम्म्याने कमी करून, रुग्णांच्या  किमान 1000 कोटी रुपयांची बचत करून सरकार कर्करोगावरील औषधे परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देत आहे. जनऔषधी केंद्रांमध्ये आता 900 हून अधिक औषधे परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. आयुष्मान भारत योजनेंतर्गत अनेक लाभार्थी कर्करोगाचे रुग्ण आहेत, असे मोदी यांनी सांगितले. आयुष्मान भारत आणि निरामयता केंद्रे  कर्करोगाचे निदान  लवकर होईल हे सुनिश्चित करत आहेत. आसाम आणि देशाच्या इतर भागांतील निरामयता केंद्रांमध्ये 15  कोटींहून अधिक लोकांनी कर्करोगाची तपासणी केली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. राज्यातील वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्याबद्दल पंतप्रधानांनी आसाम सरकारचे कौतुक केले.प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची राष्ट्रीय संकल्पना राबवण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांचा चमू  प्रशंसनीय  काम करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आसाममध्ये ऑक्सिजनपासून व्हेंटिलेटरपर्यंत सर्व सुविधा सुनिश्चित करण्याच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. सरकारने लहान मुलांच्या  लसीकरणाला  आणि प्रौढांसाठी प्रिकॉशन मात्रा द्यायला मान्यता देऊन  लसीकरणाची व्याप्ती वाढवली असल्याचे सांगत  मोदी यांनी  सर्वांना लसीकरण करण्याचे आवाहन केले.

चहाच्या बागेत काम करणाऱ्या लाखो कुटुंबांना चांगले जीवन देण्यासाठी केंद्र आणि आसाम सरकार प्रामाणिकपणे काम करत आहेत.विनामूल्य  रेशनपासून ते हर घर जल योजनेंतर्गत उपलब्ध सुविधांपर्यंत, आसाम सरकार चहाच्या बागेत काम करणाऱ्या कुटुंबांपर्यंत वेगाने पोहोचत आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

लोककल्याणाच्या बदललेल्या संकल्पनेकडे  पंतप्रधानांनी लक्ष वेधले. आज लोककल्याणाची व्याप्ती वाढली आहे.यापूर्वी केवळ काही अनुदानेच  लोककल्याणाशी जोडलेली दिसत होती. पायाभूत सुविधा, संपर्क सुविधांचे  प्रकल्प कल्याणाशी जोडलेले दिसत नव्हते .तर,संपर्क सुविधांअभावी , सार्वजनिक सेवांचे वितरण करणे खूप कठीण होते. गेल्या शतकातील संकल्पना मागे टाकून आता देश पुढे जात आहे.आसाममध्ये, रस्ते, रेल्वे आणि हवाई सेवा नेटवर्कचा विस्तार झालेला  दिसत आहे, यामुळे  गरीब, तरुण, महिला, बालके , वंचित आणि आदिवासी समुदायांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत.सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या भावनेने आम्ही आसाम आणि देशाच्या विकासाला गती देत आहोत, असे पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना सांगितले.

आसाम सरकार आणि टाटा ट्रस्टचा संयुक्त उपक्रम असलेले आसाम कॅन्सर केअर फाउंडेशन ,राज्यभर पसरलेल्या 17  कर्करोग उपचार रुग्णालयांसह दक्षिण आशियातील सर्वात मोठे परवडणारे कॅन्सर केअर नेटवर्क तयार करण्याचा प्रकल्प राबवत आहे.प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 10 रुग्णालयांपैकी सात रुग्णालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर तीन रुग्णालयांचे बांधकाम विविध स्तरावर आहे.प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सात नवीन कॅन्सर रुग्णालये बांधण्यात येणार आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Kane/R.Aghor/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1821055) Visitor Counter : 265