निती आयोग
नीती आयोग येत्या 25 एप्रिल रोजी ‘नाविन्यपूर्ण शेती’ या विषयावर एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करणार
Posted On:
23 APR 2022 5:31PM by PIB Mumbai
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, नीती आयोग दिनांक 25 एप्रिल 2022 रोजी ‘नाविन्यपूर्ण शेती’(‘इनोव्हेटिव्ह ॲग्रीकल्चर') या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करत आहे.
या कार्यशाळेला केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पुरषोत्तम रुपाला, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, सदस्य (कृषी) डॉ. रमेश चंद आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत हे संबोधित करतील.
ही कार्यशाळा भारत आणि परदेशातील नाविन्यपूर्ण शेती आणि नैसर्गिक शेती पद्धतींच्या क्षेत्रात काम करणाऱ्या हितसंबंधितांना एकत्र आणेल अशी अपेक्षा आहे.नैसर्गिक शेतीचे संवर्धन करणे, मातीचे आरोग्य पुनर्संचयित करण्यात त्याची भूमिका अधोरेखित करणे आणि हवामान बदल कमी करणे या प्रमुख विषयांवर या कार्यशाळेत चर्चा केली जाईल.
नैसर्गिक शेती पद्धती मुख्यतः अन्न आणि कृषी संघटना (FAO) द्वारे पुरस्कृत केलेल्या कृषी पर्यावरणाच्या तत्त्वांशी सुसंगत आहे. ही पद्धत रासायनिक शेतीचा पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करत शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी व्यवहार्य उपाय करायला सांगते.
माननीय पंतप्रधानांनी विविध प्रसंगी नैसर्गिक शेतीच्या महत्त्वावर भर दिला आहे. अगदी अलीकडे,16 डिसेंबर 2021 रोजी नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषदेदरम्यान, त्यांनी नैसर्गिक शेती ही जनचळवळीत रूपांतरित व्हावी, असे आवाहन केले होते. 2022-23 च्या अर्थसंकल्पातही संपूर्ण देशभरात रसायन मुक्त नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे, ज्याची सुरुवात गंगा नदीच्या 5 किमी रुंद प्रट्ट्यातील शेतांपासून झाली आहे.
आपण हा कार्यक्रम नीती आयोगाच्या यूट्यूब वाहिनीवर थेट पाहू शकता.
***
S.Patil/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1819334)
Visitor Counter : 158