अल्पसंख्यांक मंत्रालय

मुंबईत सध्या भरलेल्या हुनर हाटला भेट देण्याची पाच महत्त्वाची कारणे

Posted On: 22 APR 2022 5:37PM by PIB Mumbai

मुंबई, 22 एप्रिल 2022

हे आपले शहर आहे!

या हुनर हाट मध्ये जाण्यासाठी  ना तुम्हांला तिकीट काढण्याची गरज आहे आणि ना सामानाच्या बॅगा भरण्याची कटकट आणि तुमचे पालक तसेच मित्रमंडळींना भेट देण्यासाठी अस्सल वस्तु विकत घेण्यासाठी अनोळखी शहराच्या रस्त्यांवरून फिरण्याची देखील गरज नाही. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाने आपल्यासाठी सर्व गोष्टींची खातरजमा करून सोयीसुविधांची व्यवस्था करून ठेवली आहे. तुम्हांला फक्त तुमच्या आवडत्या मुंबई शहरात बांद्रा-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर यायचे आहे.

मुंबईत या एकाच ठिकाणी तुम्हांला देशभरातील तब्बल 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उत्पादित वस्तूंची खरेदी करता येईल. या ठिकाणी तुम्हा सर्वांना, देशभरातून आलेल्या कलाकारांच्या 400 स्टॉल्स मध्ये ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेचा सुगंध देखील अनुभवता येईल.

 

 खरेदीची हौस भागविण्यासाठी उत्पादनांची विस्तृत श्रेणी येथे उपलब्ध: तब्बल 419 स्टॉल्स !

 

तुम्ही फक्त तुम्हांला हवे असलेल्या वस्तूचे नाव घ्या, ती वस्तु हुनर हाटमध्ये तुमच्यासाठी हजार आहे. खरंच! वैशिष्ट्यपूर्ण हस्तकलेच्या वस्तुपुरातन संग्राह्य वस्तु, प्रत्येक राज्याचे वैशिष्ट्य असणाऱ्या कलाकुसरीच्या वस्तु, सेंद्रिय उत्पादने, जीआय(भौगोलिक निर्देशांक प्राप्त) उत्पादने, येथे काय नाही असे नाही! या प्रदर्शनात एकूण 419 स्टॉल्स आहेत, आणि त्यापैकी जवळपास 362 स्टॉल्समध्ये हस्तकलेशी संबंधित वस्तु आहेत.

तुम्हांला तुमचे घर अथवा कार्यालय यांना नवा चेहरामोहरा द्यायचा आहे का? तुमच्या प्रियजनांना देण्यासाठी तुम्ही एखादी विशेष भेटवस्तू शोधात आहात का? तुम्हांला तुमच्या सध्या वापरात असलेल्या कपड्यांचा कंटाळा आला आहे म्हणून तुम्ही ते बदलण्यासाठी पर्यायांच्या शोधात आहात का? स्वतःच्या घरी वापरण्यासाठी तुम्हांला पर्यावरण-स्नेही भांडी आणि इतर वस्तु पाहिजे आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हांला हुनर हाटमध्ये आल्यावर मिळतील. येथे तुमच्या या सर्व गरजा पुरविणारी खात्रीलायकउत्पादने किफायतशीर दरात उपलब्ध आहेत.

देशभरातील सुप्रसिद्ध आणि लज्जतदार पदार्थ तुमच्यासाठी हजर!

तुमच्या जिभेला आणि पोटाला अपूर्व मेजवानी द्या. येथे असलेल्या ‘मेरा गांव, मेरा देश’  नामक अन्नपदार्थांच्या विभागात तुम्ही अनेक किंवा सर्वच वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचा आस्वाद घेय शकता. या विभागातील स्टॉल्सची रचना  संकल्पनांवर आधारित आहे. भारताच्या विविध राज्यांतील पारंपारिक पाककृती तुम्हांला येथे चाखायला मिळतील. या हाटमध्ये खाद्यपदार्थांचे  60 हून अधिक स्टॉल्स मांडण्यात आले आहेत.

एक हजाराहून अधिक कारागीर आणि हस्तकलाकारांना पाठबळ द्या:

भारतात प्रतिभेचा अभाव नाहीच आहे- असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या हाटच्या उद्घाटनप्रसंगी म्हटले होते. तुम्हांला या ठिकाणी आपल्या देशातील अनेक हस्तकलाकार आणि कारागीर यांचे कौशल्य आणि प्रतिभा अनुभवायला मिळेल.आणि त्याचबरोबर त्यांची उत्पादने आणि बुद्धीमत्ता यांचे कौतुक करण्याची, त्या कलाकारांशी संवाद साधण्याची आणि त्यांना प्रोत्साहन देण्याची देखील संधी तुम्हांला येथे मिळेल.

तुम्हांला येथे भेटलेल्या कलाकारांपैकी अनेक जण विविध देशांना त्यांची उत्पादने निर्यात करत आहेत. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी ते कलाकार करत असलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याची संधी सोडता कामा नये असे तुम्हांला नक्कीच वाटत असेल, हो ना?

मौजमजेचा आनंद घेण्यासाठीची जागा!

तुम्ही तुमच्या मुलांना सर्कस दाखवायला कधी नेले होते ते तुम्हांला आठवतंय का? किंवा तुमच्या आई-बाबांना त्यांच्या आवडत्या गायकाच्या कार्यक्रमाला तुम्ही कधी घेऊन गेला होतात?

तुम्ही लहान असताना सर्कसला जाण्यासाठी किती उत्सुक असायचात हे तुम्हाला आठवतंय ना? तुमची मुले आणि तुमच्यात अजूनही दडून बसलेले लहान मूल यांच्यासाठी धमाल करण्याची आणखी एक संधी येथे आहे. या हुनर हाटमध्ये 25 हून अधिक सर्कस कलाकार दररोज त्यांच्या विविध  कौशल्यपूर्ण कसरती सादर करत आहेत. दुपारी १, 3 आणि 5 वाजता तुम्हांला त्यांचे कार्यक्रम पाहता येतील.

मुंबईत 12 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात तुम्हांला विविध सुप्रसिद्ध कलाकारांच्या संगीतविषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येईल. या वेळच्या हुनर हाटमध्ये, अन्नू कपूर, पंकज उधास, सुदेश भोसले, सुरेश वाडकर, साधना सरगम, अमित कुमार, शैलेन्द्र सिंग, शब्बीर कुमार, महालक्ष्मी अय्यर, भूमी त्रिवेदी, कविता पौडवाल, दलेर मेहंदी, अल्ताफ राजा,रेखा राज, उपासना सिंग (हास्यकलाकार), एहसान कुरेशी (हास्यकलाकार), भूपिंदर सिंग भूपी, राणी इंद्राणी, मोहित खन्ना, प्रिया मलिक, जॉली मुखर्जी, प्रियाना मैत्रा, विवेक मिश्रा,दीपक राजा (हास्यकलाकार), अदिती खांडेगल, अंकिता पथक, सिद्धांत भोसले, राहुल जोशी, सुप्रिया जोशी, भूमिका मलिक, प्रेमा भाटीया, पोश जेम्स अन इतर अनेक कलाकार सहभागी होणार आहेत.

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1819054) Visitor Counter : 192


Read this release in: English , Urdu , Hindi