संरक्षण मंत्रालय
लष्कर कमांडरांच्या परिषदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं मार्गदर्शन
Posted On:
21 APR 2022 7:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2022
नवी दिल्ली येथे 18 ते 22 एप्रिल 2022 या कालावधीत भारतीय लष्कराचा सर्वोच्च पातळीवरील द्वैवार्षिक उपक्रम असलेली लष्कर कमांडरांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात भारतीय लष्कराच्या सर्वोच्च पातळीवरील नेते विद्यमान संरक्षणविषयक परिस्थिती, तटवर्ती क्षेत्रातील आणि सीमाभागातील स्थिती, आणि सध्याच्या संरक्षण विषयक बंदोबस्तविषयक आव्हानांच्या सर्व पैलूंबाबत विचार विनिमय करत आहेत. तसेच या परिषदेत, संस्थात्मक पुनर्रचना, वाहतुकीची सोय, प्रशासन, मनुष्यबळ विकास, स्वदेशीकरणाच्या माध्यमातून आधुनिकीकरण, महत्त्वाच्या तंत्रज्ञानांचा वापर आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या परिणामांचे मूल्यमापन या मुद्द्यांवर देखील लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. परिषदेच्या चौथ्या दिवसातील ठळक घडामोड म्हणजे भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकारांना केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेले मार्गदर्शन. या संबोधनापूर्वी “स्वदेशीकरणाच्या माध्यमातून आधुनिकीकरण” करण्याच्या भारतीय लष्कराच्या योजनांविषयी उपस्थितांना थोडक्यात माहिती देण्यात आली.
देशातील सर्वात विश्वसनीय आणि प्रेरणादायी संघटना म्हणून भारतीय लष्करावर असलेला कोट्यावधी नागरिकांच्या विश्वासाचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पुनरुच्चार केला. आपल्या सीमांचे रक्षण करणे आणि दहशतवादाशी मुकाबला करणे यांसह, जेव्हा गरज भासेल तेव्हा नागरी प्रशासनाला मदत करण्यात भारतीय लष्कर निभावत असलेल्या ठळक भूमिकेवर त्यांनी भर दिला. “संरक्षण, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण, वैद्यकीय मदत यांच्याशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात लष्कर उपस्थित राहून देशाची अंतर्गत परिस्थिती स्थिर राखण्यात मदत करत आहे” असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. राष्ट्र उभारणीसोबतच देशाच्या एकंदर विकासात देखील भारतीय लष्कराची महत्त्वाची भूमिका आहे असे त्यांनी सांगितले. लष्कराच्या कमांडरांच्या परिषदेत उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या आणि आपला देश यांच्या ‘संरक्षण आणि सुरक्षा’ या संकल्पनेला यशस्वीपणे पुढे घेऊन जात असल्याबद्दल त्यांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांची प्रशंसा केली.
सध्या निर्माण झालेल्या आणि जगातील प्रत्येक व्यक्तीवर परिणाम करणाऱ्या गुंतागुंतीच्या जागतिक परिस्थितीकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, “आगामी काळातील युद्धांमध्ये मिश्र प्रकारच्या युद्धांसह अपारंपरिक आणि असमान युद्धस्थिती असणार आहे. सायबर, माहिती, संपर्क, व्यापार आणि वित्त हे भविष्यातील संघर्षांचे अविभाज्य भाग असणार आहेत. त्यामुळे, सशस्त्र दलांना त्यांच्या कार्याचे नियोजन आणि धोरणे निश्चित करताना या सर्व बाबी लक्षात घेण्याची गरज निर्माण झाली आहे.”
आघाडीच्या क्षेत्रांमध्ये भेट देताना नेहमीच लष्कराच्या परिचालानात्मक सुसज्जतेचा आणि क्षमतांचा अनुभव येतो अश्या शब्दात प्रशंसा करून संरक्षणमंत्र्यांनी भारतमातेसाठी प्राणार्पण केलेल्या सर्व शूर वीरांना श्रद्धांजली वाहिली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी लष्कराने कार्यान्वित केलेल्या ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेच्या यशाबद्दल त्यांनी लष्कराच्या जवानांचे कौतुक केले.
R.Aghor/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1818791)
Visitor Counter : 233