जलशक्ती मंत्रालय
सिंगापूर आंतरराष्ट्रीय जल सप्ताह 2022 मध्ये राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानाचे महासंचालक सहभागी
नमामि गंगे कार्यक्रमाचा सकारात्मक परिणाम अधोरेखित करत 'अर्थ गंगा'च्या महत्त्वावर राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानाच्या महासंचालकांनी दिला भर
Posted On:
17 APR 2022 4:08PM by PIB Mumbai
सिंगापूर आंतरराष्ट्रीय जल सप्ताह, जल परिषद 2022 मध्ये राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानाचे (एनएमसीजी) महासंचालक जी. अशोक कुमार यांनी आभासी माध्यमातून सहभाग घेतला आणि भारतातील सांडपाणी निर्मिती, प्रक्रिया आणि व्यवस्थापनाची स्थिती : राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानाच्या उपक्रमांद्वारे यश याविषयावर सादरीकरण केले. जल परिषदेची संकल्पना 3 अंतर्गत, 17 एप्रिल रोजी एनएमसीजीने आयोजित केलेल्या महत्वाच्या समस्यांसंदर्भातील कार्यशाळेत ''विकसनशील देशांमधील शाश्वत सांडपाणी व्यवस्थापन: नदी पुनरुज्जीवनासाठी एक अभिनव भारतीय दृष्टीकोन' यासंदर्भात कुमार यांनी आपले विचार मांडले.
भारतातील पाण्याची परिस्थिती आणि पाणी आणि सांडपाणी क्षेत्रातील प्रमुख सरकारी योजनांची रूपरेषा, जी. अशोक कुमार यांनी 2019 मध्ये जलशक्ती मंत्रालयाच्या स्थापनेला “ऐतिहासिक क्षण” असल्याचे सांगत जलशक्ती अभियानांतर्गत ‘कॅच द रेन : व्हेअर इट फॉल्स, व्हेन इट फॉल्स’ मोहिमेच्या यशाबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
कुमार यांनी नमामि गंगे कार्यक्रमाचा आढावा घेतला आणि प्रकल्पाचे काही सकारात्मक परिणाम आणि फलित अधोरेखित केले. अर्थ गंगाबद्दल सांगताना त्यांनी श्रोत्यांना शून्य खर्च नैसर्गिक शेती, उपजीविका निर्मितीच्या संधी, सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन, रोखीकरण आणि गाळ आणि सांडपाण्याचा पुनर्वापर, लोकसहभाग आणि संस्थात्मक बांधणी या अभियानाच्या सहा उद्दिष्टांबद्दल माहिती दिली.
यमुनेसारख्या गंगेच्या उपनद्यांमध्ये सांडपाण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे विकास प्रकल्पांमध्ये वाढ करणे यावर नमामि गंगे कार्यक्रमाच्या टप्पा -2 अंतर्गत लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे असे राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानाच्या महासंचालकांनी सांगितले. पुनर्निर्मिती, पुनर्वापर आणि पुनरुपयोग यावर लक्ष केंद्रित करणारे चक्रीय अर्थव्यवस्था मॉडेल विकसित करणे यासाठीच्या राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार त्यांनी केला. भविष्यातील कामाच्या प्रमुख क्षेत्रांपैकी एक म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण भागात मैला आणि मलमूत्र व्यवस्थापन असेल, असे ते म्हणाले.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1817584)
Visitor Counter : 253