नागरी उड्डाण मंत्रालय
आरसीएस उडान अंतर्गत केशोड-मुंबई मार्गावरील विमानसेवेचा प्रारंभ
गुजरातमध्ये 2 नवीन ग्रीनफील्ड विमानतळहोणार : सिंदिया
Posted On:
17 APR 2022 5:17PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या आरसीएस -उडान योजनेंतर्गत नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने काल (16.04.2022) केशोड -मुंबई मार्गावर विमान सेवा सुरू केली.
उडान आरसीएस-4.1 लिलाव प्रक्रियेअंतर्गत अलायन्स एअरला हा हवाई मार्ग प्रदान करण्यात आला.यासह, उडान आरसीएस योजनेअंतर्गत 417 हवाई मार्ग कार्यान्वित केले जातील.
या उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया , गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, गुजरात सरकारमधील रस्ते आणि इमारत, नागरी हवाई वाहतूक, पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विभाग मंत्री पुरेश मोदी, गुजरातचे पशुसंवर्धन राज्यमंत्री देवभाई मालम, पोरबंदरचे खासदार रमेश धाडूक, जुनागढ-गिरचे खासदार सोमनाथ राजेश चुडासामा, गुजरातमधील मानवदर येथील विधानसभा सदस्य जवाहर चावडा, पोरबंदरचे विधानसभा सदस्य बाबुभाई बोखरिया, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाधी, अलायन्स एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत सूद, आणि गुजरात राज्य सरकार, केंद्रीय हवाई वाहतूक ,मंत्रालय , भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि अलायन्स एअर मधील इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
ही विमानसेवा बुधवार, शुक्रवार आणि रविवारी आठवड्यातून तीन वेळा उड्डाणे चालवेल आणि मार्गावरच्या कमी अंतराच्या उड्डाणांसाठी रचना केलेली एटीआर 72-600, 70-सीटर टर्बो प्रॉप विमाने तैनात केली जातील. यासह उडान योजनेंतर्गत केशोड ला मुंबईशी जोडणारी अलायन्स एअर ही पहिली विमान कंपनी ठरणार आहे.
यावेळी बोलताना ज्योतिरादित्य एम. सिंदिया म्हणाले, “आपल्या इतिहासात विशेष स्थान असलेल्या गुजरातमध्ये विशेषतः केशोडमध्ये आल्याने मला धन्य आणि सन्मानित वाटत आहे आणि आजपासून सुरू होणार्या या नवीन विमानसेवेमुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे प्रिय स्थान आपल्या देशाच्या आर्थिक राजधानीशी जोडले जाईल. जगप्रसिद्ध पर्यटन स्थळे - सोमनाथ मंदिर आणि गीर राष्ट्रीय उद्यान केशोड जवळ आहेत. नवीन मार्ग सुरू झाल्याने पर्यटकांना दोन्ही ठिकाणी सहज भेट देता येणार आहे.याशिवाय केशोड मध्ये फर्निचर, कापड, रसायने, सिमेंट इत्यादी विविध उद्योगांची स्थापना झाली असून या उद्योगांनाही नवीन उड्डाण मार्ग सुरू झाल्याचा फायदा होणार आहे.
केशोड विमानतळ हे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय ) मालकीचे आहे.सुरुवातीला, 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात नियोजित कार्यान्वयन सुलभ करण्यासाठी विमानतळाचे नूतनीकरण आणि पुनर्बांधणी करण्यात आली. गेल्या 21 वर्षांपासून या विमानतळावर व्यावसायिक विमाने उतरलेली नाहीत.भारतीय विमानतळ प्राधिकरणाने केशोड विमानतळाची श्रेणीसुधारणा करण्यासाठी 25 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
नवीन उडान योजनेअंतर्गत हा हवाई मार्ग केशोडला राष्ट्रीय हवाई नकाशावर आणेल आणि प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देईल. केशोड हे गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील एक पर्यटन स्थळ आहे आणि ते अरबी समुद्र आणि सुंदर जंगलांनी वेढलेले आहे. केशोड जवळ सोमनाथ मंदिर आणि गीर राष्ट्रीय उद्यान आहे. सध्या केशोड ते मुंबई हे अंतर रस्त्याने जाण्यासाठी सुमारे 16 तासांचे आहे नवीन विमानसेवा सुरु झाल्याने हे अंतर केवळ 1 तास 25 मिनिटांवर येणार आहे.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1817578)
Visitor Counter : 283