वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताला जागतिक पातळीवर फॅशनची राजधानी बनवण्यासाठी काम करा: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे एनआयएफटी संस्थेच्या तरुण पदवीधारकांना आवाहन

Posted On: 16 APR 2022 10:07PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज एनआयएफटी संस्थेच्या तरुण पदवीधारकांना भारताला जागतिक पातळीवर फॅशनची राजधानी म्हणून आकार देण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहन केले. मुंबईतील एनआयएफटी अर्थात राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलताना ते म्हणाले की, भारतीय डिझायनर्स आणि कलाकारांकडे विविध कौशल्ये आणि अभिनव कल्पना आहेत. एनआयएफटी संस्थेच्या पदवीधरांसह सर्व भारतीय डिझायनर्स जागतिक पातळीवर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कार्य करत आहेत असे ते पुढे म्हणाले.

आज पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले, तुमच्यापैकी प्रत्येक जण स्वप्ने पाहणारा आहे; तुम्ही नव्या कल्पना, नवी डिझाईन्स आणि नव्या संकल्पनांसह काम करा. कोल्हापुरी चपला आणि पैठणी साड्या या स्थानिक उत्पादनांची उदाहरणे देत ते  पुढे म्हणाले, पारंपरिक भारतीय कला आणि हस्तकला यांच्यात जागतिक पातळीवरील फॅशन ट्रेंड होण्याची क्षमता आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले, फॅशन अभ्यासक्रमाचा विद्यार्थी म्हणून तुमच्यापैकी प्रत्येक जण सखोल संवेदनशीलतेचे प्रतिनिधित्व करतो. आणि तुमच्या कामाच्या दर्जातून तसेच तुम्ही तुमच्या कामगारांना, विणकरांना कशा पद्धतीची वागणूक देता आणि त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळेल याची सुनिश्चिती कशी करता यातून ही संवेदनशीलता दिसून येत असते. एनआयएफटी संस्थेच्या पदवीधरांकडून कामामध्ये उच्च दर्जा राखणे आणि नैतिक मूल्यांचे पालन करणे या अपेक्षा आहेत असे त्यांनी सांगितले.

एनआयएफटीच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे कौतुक करताना वस्त्रोद्योग मंत्री म्हणाले की, एनआयएफटीचे अनेक पदवीधर लवकरच बॉलीवुडसाठी डिझाइन करण्यास सुरुवात करतील.

केंद्रीय मंत्री गोयल यांनी नमूद केले की बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आणि मास्टर्स ऑफ फॅशन मॅनेजमेंट यां अभ्यासक्रमांना केंद्रीय विद्यापीठ आयोगाने मान्यता दिली आहे. ते म्हणाले, यूजीसी मान्यताप्राप्त तांत्रिक पदवी तुम्हाला जगभरात उच्च शिक्षणासाठी चांगल्या संधी मिळण्यास मदत करतील. सर्व अभ्यासक्रमांचे एकसमान मानकीकरण केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्य वाढण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

गोयल  यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा-महाविद्यालय  आणि राष्ट्राच्या विकासाकरिता योगदान  देण्याचे आवाहन केले. एनआयएफटी  हातमाग विणकर, हस्तकला कारागीर आणि इतरांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांची आखणी  आणि कारागीरांना  मार्गदर्शन करण्यात संस्थेला मदत करण्याची विनंती केली. ते म्हणाले, ज्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणाची संधी मिळत नाही त्यांना ते मिळवून  देण्याचा विचार करा. विणकरांचा एखादा समूह दत्तक घेता येईल , तुमच्या कामगारांचे  कौशल्य वाढवण्याचा विचार करा, त्यांना अधिक चांगले काम करण्यासाठी शिक्षित करा, उत्तम  डिझाइन, पॅकेजिंग, मार्केटिंग, ब्रँडिंगद्वारे त्यांचे उत्पन्न सुधारण्यास मदत करा,असे  ते पुढे म्हणाले.

2020 आणि 2021 मध्ये अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 627 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध अभ्यासक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदके, प्रमाणपत्रे आणि बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

***

S.Patil/S.Chitnis/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1817418) Visitor Counter : 238