पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

देवघर बचाव कार्यात सहभागी झालेल्यांशी पंतप्रधान मोदींनी साधला संवाद


“लोकांचा गणवेशावर खूप विश्वास आहे. जेव्हा जेव्हा संकटात सापडलेले लोक तुम्हाला पाहतात तेव्हा त्यांना विश्वास असतो की त्यांचे जीवन आता सुरक्षित आहे, त्यांच्यामध्ये नवीन आशा जागृत होते”

जिद्द आणि संयमाने आव्हानांचा सामना केला तर यश निश्चित आहे.

"हे संपूर्ण बचावकार्य संवेदनशीलता, प्रसंगावधान आणि धैर्याचे प्रतिबिंब आहे"

या बचाव कार्यात ‘सबका प्रयास’ चीही मोठी भूमिका होती

Posted On: 13 APR 2022 9:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देवघर येथे केबल कार अपघातासंबंधी बचाव कार्यात सहभागी झालेल्या भारतीय हवाई  दल, भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, इंडो-तिबेटियन सीमा पोलीस, स्थानिक प्रशासन यांचे कर्मचारी आणि नागरीकांशी आज संवाद साधला. केंद्रीय मंत्री, अमित शहा, खासदार निशिकांत दुबे, गृह मंत्रालयाचे सचिव, लष्करप्रमुख, हवाई दल प्रमुख, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक, इंडो-तिबेटियन सीमा पोलीस महासंचालक यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी बचावकार्यात सहभागी झालेल्यांचे कौतुक केले. हे उत्तम समन्वयित कार्याचे उदाहरण आहे, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापनाने जीवितहानी रोखण्यावर भर देण्यासाठी पूर्वीच्या मदत-आधारित दृष्टीकोनाच्या पलीकडे जाऊन मदत केली आहे. आज प्रत्येक स्तरावर मदत आणि जीवितहानी टाळण्यासाठी एक एकात्मिक व्यवस्था आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, सशस्त्र दल, आयटीबीपी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने या बचावकार्यात अनुकरणीय समन्वयाने काम केले, असे अमित शहा म्हणाले.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी बचाव पथकांचे कौतुक केले आणि शोकग्रस्त कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त केली. "देशाला अभिमान आहे की आमच्याकडे सशस्त्र दल, हवाई दल, आयटीबीपी, एनडीआरएफ आणि पोलिस कर्मचारी यांच्या रूपात एक कुशल दल आहे, ज्यात संकटाच्या वेळी नागरिकांचे संरक्षण करण्याची क्षमता आहे", ते म्हणाले. तीन दिवस, चोवीस तास, तुम्ही एक कठीण बचाव कार्य पूर्ण केले आणि अनेक देशवासीयांचे प्राण वाचवले. मी याला बाबा वैद्यनाथजींची कृपा देखील मानतो, असेही ते पुढे म्हणाले.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने त्यांच्या धाडस आणि परिश्रमातून स्वतःची ओळख आणि प्रतिमा निर्माण केली आहे, याची पंतप्रधानांनी दखल घेतली. एनडीआरएफ निरीक्षक/जीडी, ओम प्रकाश गोस्वामी यांनी पंतप्रधानांना बचावकार्याचे तपशील सांगितले. पंतप्रधानांनी ओम प्रकाश यांना विचारले की त्यांनी या संकटाची भावनिक  बाजू कशी हाताळली. पंतप्रधान म्हणाले की, एनडीआरएफचे धाडस संपूर्ण देशाने जाणले आहे.

भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन वाय के कांदळकर यांनी संकटकाळात हवाई दलाच्या बचावकार्याची माहिती दिली. तारांजवळ हेलिकॉप्टर चालवणाऱ्या वैमानिकांच्या कौशल्याचा  पंतप्रधानांनी उल्लेख केला.  भारतीय हवाई दलाचे  सार्जंट पंकज कुमार राणा यांनी केबल कारच्या प्रतिकूल परिस्थितीत आणि मुले,महिलांसह प्रवासी संकटात असताना त्यांना वाचवण्यात गरूणा कमांडोची भूमिका स्पष्ट केली. हवाई दलाच्या जवानांच्या विलक्षण धैर्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

अनेक प्रवाशांना वाचवणारे देवघरच्या दामोदर रोपवेचे पन्नालाल जोशी यांनी बचाव कार्यात नागरिकांची भूमिका स्पष्ट केली. इतरांना मदत करणे हा आपल्या संस्कृतीचा भाग असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आणि या लोकांच्या प्रसंगावधानाची आणि धैर्याची प्रशंसा केली.

इंडो-तिबेटियन सीमा पोलीस उपनिरीक्षक अनंत पांडे यांनी त्यांच्या दलाची बचावकार्यातील भूमिका स्पष्ट केली. आयटीबीपी च्या सुरुवातीच्या यशामुळे अडकलेल्या प्रवाशांचे मनोबल उंचावले. पंतप्रधानांनी संपूर्ण चमूच्या संयमाचे कौतुक केले आणि सांगितले की, आव्हानांचा निश्चय आणि संयमाने सामना केला जातो तेव्हा यश निश्चित असते.

देवघरचे जिल्हा दंडाधिकारी आणि उपायुक्त, मंजुनाथ भजंतारी यांनी बचावकार्यात स्थानिक समन्वय आणि हवाई दलाची मदत मिळेपर्यंत प्रवाशांचे मनोबल कसे राखले गेले याचे वर्णन केले. त्यांनी बहु-संस्थात्मक समन्वय आणि संप्रेषणाच्या माध्यमांची माहिती देखील दिली. वेळेवर मदत केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. बचावकार्यादरम्यान त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्श्वभूमीचा कसा वापर केला याविषयी पंतप्रधानांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना विचारले. अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळता यावी यासाठी पंतप्रधानांनी घटनेची योग्य ती कागदपत्रे मागितली.

ब्रिगेडियर अश्विनी नय्यर यांनी बचावकार्यात लष्कराची भूमिका कथन केली. खालच्या स्तरावर केबल कारपासून बचाव करण्याबद्दल त्यांनी माहिती दिली. सांघिक कार्यातील समन्वय, वेग आणि नियोजनाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

पंतप्रधान म्हणाले की अशा परिस्थितीत नियंत्रण मिळवताना प्रतिसाद वेळ महत्त्वाचा असतो. गणवेश पाहिल्यानंतर लोकांना आश्वस्त वाटत असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान पुढे म्हणाले, लोकांचा गणवेशावर खूप विश्वास आहे. जेव्हा जेव्हा संकटात सापडलेले लोक तुम्हाला पाहतात तेव्हा त्यांचा विश्वास असतो की त्यांचे जीवन आता सुरक्षित आहे, त्यांच्यामध्ये नवीन आशा जागृत होते.

बचावकार्यादरम्यान लहान मुले आणि वृद्धांच्या गरजा कायम लक्षात ठेवल्या गेल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रत्येक अनुभवाने सैन्यात सातत्याने होत असलेल्या सुधारणांचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी सैन्याच्या दृढनिश्चयाचे आणि संयमाचे कौतुक केले. संसाधने आणि उपकरणांच्या बाबतीत बचाव दलांना अद्ययावत ठेवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. "हे संपूर्ण बचावकार्य संवेदनशीलता, प्रसंगावधान आणि धैर्याचे प्रतिबिंब आहे", ते म्हणाले.

संयम आणि धैर्य दाखवणाऱ्या प्रवाशांच्या चिकाटीची पंतप्रधानांनी दखल घेतली. त्यांनी समर्पण आणि सेवा भावनेबद्दल स्थानिक नागरिकांचे विशेष कौतुक केले. वाचलेल्या प्रवाशांचे मोदींनी अभिनंदन केले. या संकटाने पुन्हा एकदा हे स्पष्ट केले आहे की जेव्हा जेव्हा देशावर कोणतीही आपत्ती येते तेव्हा आम्ही त्या आव्हानाचा सामना करण्यासाठी एकजुटीने लढा देतो आणि विजयी होतो. या बचावकार्यात ‘सबका प्रयास’नेही महत्त्वाची भूमिका बजावली होती, मोदी म्हणाले.

त्यांनी पीडित कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आणि जखमींच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केली. बचावकार्यात सामील असलेल्या सर्वांना तपशील दस्तावेजीकरण करण्याची आणि भविष्यातील वापरासाठी काळजीपूर्वक शिकण्याची विनंती करून त्यांनी संवादाचा समारोप केला.

 

 S.Kane/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1816762) Visitor Counter : 183