आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“आत्मनिर्भर भारताची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्याच्या मार्गात, पीएलआय योजना एक महत्त्वाचे पाऊल” : केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडवीय


भारतीय औषधनिर्माण उत्पादक संघटनेच्या हीरक महोत्सवी समारंभाच्या उद्‌घाटनात केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांचे मार्गदर्शन

Posted On: 14 APR 2022 2:36PM by PIB Mumbai

मुंबई, 14 एप्रिल 2022

आत्मनिर्भर भारताची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यात औषधनिर्माण क्षेत्राची भूमिका अतिशय महत्वाची ठरेल, असे मत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण तसेच, रसायने आणि खते मंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केले. भारतीय औषधनिर्माण संघटनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘इंडियन फार्मा-ग्लोबल हेल्थ केअर’ या कार्यक्रमात ते बोलत होते. उत्पादन-संलग्न-प्रोत्साहन म्हणजेच पीएलआय सारखे केंद्र सरकारचे उपक्रम या क्षेत्रासाठी कसे लाभदायक ठरत आहेत, हे त्यांनी यावेळी सांगितले.

उत्पादन-संलग्न-प्रोत्साहन (पीएलआय) योजनेमार्फत, सरकारने देशांतर्गत औषधनिर्मात्यांना प्रोत्साहन देऊन, औषधांची आयात कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. पीएलआय योजनेमुळे देशात या क्षेत्रातल्या 35 पेक्षा अधिक उत्पादनांचे उत्पादन सुरु झाले आहे. असे त्यांनी सांगितले. औषधनिर्माण क्षेत्राने, येत्या 25 वर्षांचा आराखडा तयार करावा, अशी सूचना त्यांनी केली.

देश, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतांनाच, भारतीय औषधनिर्माण उत्पादक संघटना, आपला हीरक महोत्सव साजरा करत असल्याबद्दल, त्यांनी या संघटनेचे अभिनंदन केले. या क्षेत्राला आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी केंद्र सरकार उद्योगांना सक्रियपणे मदत करत आहे, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने  जुन्या औषध आणि सौंदर्यप्रसाधन कायद्यात (1940) सुधारणा केल्यामुळे या क्षेत्रातील उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आम्ही निर्णय प्रक्रियेत देखील उद्योगाला सहभागी करुन घेत आहोत. तसेच, अनेक वेबिनार्सच्या माध्यमातून, केंद्र सरकार उद्योगांपर्यंत आणि इतर हितसबंधियांशी चर्चा करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना डॉ मांडवीय म्हणाले की, सरकार गरीबांचे कल्याण करणारे, शेतकरी समर्थक आहे तसेच उद्योगस्नेही आहे. औषध निर्माण क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करून मंत्री म्हणाले की, भारतीय औषध उद्योगाने भारताला जगातील औषध निर्माता म्हणून ओळखले जाण्याचा मान मिळवून दिला आहे. सरकार आरोग्य क्षेत्राकडे नफा कमावणारा उद्योग म्हणून पाहत नाही. जेव्हा आपण औषधांची निर्यात करतो तेव्हा ती ‘वसुधैव कुटुंबकम्’ या वृत्तीने करतो. कोविड-19 महामारीच्या पहिल्या लाटेत भारताने 125 देशांना औषधांचा पुरवठा केला.

रसायने आणि खत विभागाच्या सचिव श्रीमती एस अपर्णा यांनी फार्मा क्षेत्राची वाढ आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी नावीन्यपूर्ण आणि संशोधनात्मक भूमिकेवर जोर दिला आणि या संधीचा लाभ घेण्यासाठी IDMA ने धोरण विकसित करण्याचे आवाहन केले.

त्यांनी IDMA आणि उद्योगांना रणनीती आणि योजनांमध्ये समस्या सोडवण्याचे आवाहन केले जेणेकरून औषध सुरक्षिततेची स्वीकारार्ह पातळी शाश्वत आधारावर तयार होईल.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री डॉ. मांडवीय आणि  मान्यवरांच्या हस्ते आयडीएमच्या च्या हीरक महोत्सवी वर्षाच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

भारतीय औषध निर्माता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ विरांची शाह, भारतीय औषध निर्माता संघटनेच्या हीरक महोत्सवी आयोजन समितीचे अध्यक्ष भरत शाह, माजी राष्ट्रीय अध्यक्ष महेश दोशी, भारतीय औषध निर्माता संघटनेचे सरचिटणीस मेहुल शाह यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

 

 

 

 

S.Thakur/R.Aghor/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1816744) Visitor Counter : 248