उपराष्ट्रपती कार्यालय

आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन


वैद्यकीय व्यावसायिक आणि खासगी संस्थांनी लोकांसाठी नियमित आरोग्य जागृती शिबिरे आयोजित केली पाहिजेत: उपराष्ट्रपती

बैठी जीवनशैली टाळा, सकस आहाराच्या सवयी लावा: नायडू

नवीन महाजन इमेजिंग सुविधेचे उपराष्ट्रपतींनी केले उद्घाटन

Posted On: 10 APR 2022 2:09PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज भारतातील आरोग्यसेवा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याच्या गरजेवर भर दिला. भारताच्या आरोग्यसेवेच्या गरजा पूर्ण करणे हे एक मोठे काम आहे हे लक्षात घेऊन, त्यांनी खासगी क्षेत्राला सरकारी प्रयत्नांना पूरक असे काम करण्याचे आवाहन केले आणि वैद्यकीय व्यवसाय आणि संबंधित उपक्रमांना एक अभियान म्हणून स्वीकारण्याचे आवाहन केले.

नवी दिल्लीतील सफदरजंग विकास क्षेत्रात नवीन महाजन इमेजिंग सुविधेचे उद्घाटन करताना, नायडू म्हणाले की, जागतिक दर्जाच्या आरोग्य पायाभूत सुविधा आणि निदान पद्धती लोकांना उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. नायडू म्हणाले की, उच्च दर्जाच्या निदान पद्धती डॉक्टरांना अधिक अचूक निदान करण्यास आणि सुरक्षित हस्तक्षेप करण्यास सक्षम करतील.

भारतातील असंसर्गजन्य आजारांच्या वाढत्या चिंताजनक प्रमाणावर प्रकाश टाकत, नायडू यांनी खासगी क्षेत्रातील वैद्यकीय व्यावसायिकांना लोकांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये, बैठी जीवनशैली आणि निकृष्ट दर्जाच्या आहाराच्या सवयींमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले. नायडू यांनी लोकांना बैठी जीवनशैली सोडून निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

नायडू म्हणाले की, कोविड महामारी आणि झपाट्याने बदलणारे हवामान "आम्हाला आपल्या सवयी आणि जीवनशैलीबद्दल बरेच धडे शिकवते". निसर्गाच्या सान्निध्यात अधिक वेळ घालवण्याचे आणि अधिक शाश्वत जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.

महाजन इमेजिंगच्या व्यवस्थापनाने प्रगत निदान सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी त्यांचे कौतुक केले. महाजन इमेजिंगचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ हर्ष महाजन, कार्यकारी संचालक रितू महाजन आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

***

Jaydevi PS/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1815403) Visitor Counter : 221