राष्ट्रपती कार्यालय

तुर्कमेनिस्तान भेटीदरम्यान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे प्रसारमाध्यमांना निवेदन

Posted On: 02 APR 2022 6:50PM by PIB Mumbai

 

महामहिम राष्ट्राध्यक्ष सेरदार बर्दिमुहामेदोव्ह,

सज्जनहो, बंधू आणि भगिनींनो,

1. भारताच्या राष्ट्रपतींनी तुर्कमेनिस्तानला दिलेली ही पहिलीच भेट आहे आणि तुर्कमेनिस्तानच्या नवीन आणि तरुण नेत्याने आयोजित केलेल्या पहिल्या भेटींपैकी एक आहे. तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या माझ्या आणि माझ्या शिष्टमंडळाच्या स्वागताबद्दल आणि उदार आदरातिथ्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो. तुमच्या कृतीतून आपल्या दोन महान राष्ट्रांमधील मैत्रीचे चैतन्य प्रतिबिंबित होते.

2. उभय देशातील दुसरा मैलाचा टप्पा म्हणजे भारत आणि तुर्कमेनिस्तान दरम्यान प्रस्थापित राजनैतिक संबंधांचा 30 वा वर्धापन दिन. गेल्या तीन दशकांमध्ये आणि विशेषत: गेल्या दशकात आमच्या बहुआयामी द्विपक्षीय संबंधांच्या विकासाबाबत समाधानी असण्याची आमच्याकडे उत्तम कारणे आहेत.

 

बंधू आणि भगिनींनो,

3. तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या आजच्या माझ्या भेटीदरम्यान, आम्ही राज्य आणि द्विपक्षीय संबंधांच्या शक्यतांवर तपशीलवार चर्चा केली. महत्त्वाच्या विविध प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही आम्ही विचारांची देवाणघेवाण केली. आमची बहुआयामी भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करण्याचे आम्ही मान्य केले आहे.

4. आर्थिक संबंध हे द्विपक्षीय संबंध मजबूत करतात. द्विपक्षीय व्यापाराचा विस्तार करण्यासाठी आम्ही आणखी काही करण्यास सहमती दर्शवली जी माफक राहिली आहे. आमच्या व्यावसायिक समुदायांनी त्यांची प्रतिबद्धता वाढवली पाहिजे, एकमेकांचे नियम समजून घेतले पाहिजेत आणि व्यापार आणि गुंतवणुकीची नवीन क्षेत्रे ओळखली पाहिजेत.

5. मला विश्वास आहे की आज भारताच्या फायनान्शिअल इंटेलिजेंस युनिट आणि तुर्कमेनिस्तानच्या फायनान्शिअल मॉनिटरिंग सर्व्हिसमधील सामंजस्य करार दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्याची चौकट मजबूत करेल.

6. कोणत्याही व्यापार व्यवस्थेसाठी कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असते. या दिशेने, आम्ही आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर (INSTC) आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक आणि ट्रान्झिट कॉरिडॉरवरील अश्गाबात कराराचे महत्त्व अधोरेखित केले. भारताने इराणमध्ये बांधलेल्या चाबहार बंदराचा उपयोग भारत आणि मध्य आशियामधील व्यापार सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो, याकडे मी लक्ष वेधले.

7. ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य हे आजच्या आमच्या चर्चेतील प्रमुख मुद्यांपैकी एक होते. TAPI (तुर्कमेनिस्तान अफगाणिस्तान पाकिस्तान भारत) पाइपलाइनवर, मी सुचवले की पाइपलाइनच्या सुरक्षेशी संबंधित समस्या आणि मुख्य व्यवसाय तत्त्वे तांत्रिक आणि तज्ञ स्तरावरील बैठकींमध्ये हाताळली जाऊ शकतात.

8. सहकार्याची नवीन क्षेत्रे देखील आम्ही निवडली आहेत जसे की आपत्ती व्यवस्थापन ज्यावर आम्ही आज एक सामंजस्य करार केला आहे. डिजिटलायझेशनच्या दिशेने असलेल्या मोहिमेत तुर्कमेनिस्तानसोबत भागीदारी करण्याची भारताची तयारी मी व्यक्त केली. अंतराळ हे परस्पर फायदेशीर सहकार्याचे दुसरे क्षेत्र असू शकते.

9. आपल्या देशांमध्ये शतकानुशतकांपासून जुने नागरी आणि सांस्कृतिक संबंध आहेत. एकमेकांच्या देशात नियमितपणे असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे महत्त्व मी अधोरेखित केले.  मला खात्री आहे की आज स्वाक्षरी झालेला 2022-25 या कालावधीसाठीचा संस्कृती आणि कला सहकार्य हा कार्यक्रम आपल्या सांस्कृतिक सहकार्याला नवी दिशा देईल.

10. आपल्या दोन्ही देशांच्या जनतेला झळ पोहोचवणाऱ्या कोविड-19 या  महामारीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी दोन्ही देशांनी एकत्र येऊन सहकार्य करण्याच्या आवश्यकतेवर आम्ही भर दिला.  दोन्ही देशांनी परस्परांच्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रांना मान्यता दिल्याने आमच्या नागरिकांचा प्रवास सुकर होईल, असे मी प्रस्तावित केले.

11. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या भारत-मध्य आशिया शिखर परिषदेच्या पहिल्या बैठकीचे यजमानपद भारताने या वर्षी जानेवारीमध्ये भूषविले होते,त्या भारत-मध्य आशिया शिखर परिषदेच्या चौकटीत तुर्कमेनिस्तान हा भारतासाठी महत्त्वाचा भागीदार आहे. भारत-मध्य आशिया शिखर परिषदेच्या त्या चौकटी अंतर्गत सहकार्य आणखी वाढविण्यास आम्ही सहमती दर्शवली आहे.

12. भारत-मध्य आशिया सांस्कृतिक सहकार्याच्या कक्षेत त्वरित भारतात युवा शिष्टमंडळ पाठवण्याच्या तुर्कमेनिस्तानच्या उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो.  आज स्वाक्षरी झालेल्या युवा व्यवहारविषयक सामंजस्य करारामुळे आपल्या तरुणांमध्ये अधिक जास्त प्रमाणात देवाणघेवाण होईल.

13. आंतरराष्ट्रीय प्रासंगिकतेच्या मुद्द्यांवर संयुक्त राष्ट्रांसह प्रादेशिक आणि बहुपक्षीय मंचांवर सहकार्य सुरू ठेवण्यावरही आमच्या चर्चेत भर देण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रांच्या सुधारित आणि विस्तारित सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी तसेच 2021-22 या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा (UNSC) अस्थायी सदस्य म्हणून भारताने घेतलेल्या पुढाकारात सहकार्य करण्यासाठी तुर्कमेनिस्ताने दिलेल्या योगदानाबद्दल  मी त्यांचे आभार मानले.

14. अफगाणिस्तानचे जवळचे शेजारी म्हणून आपले देश त्या देशातील घडामोडी आणि त्यामुळे होणाऱ्या बाह्य परिणामांबद्दल स्वाभाविकपणे चिंतित आहेत.  आम्ही अफगाणिस्तानशी संबंधित मुद्द्यांवर एक व्यापक 'प्रादेशिक एकमत' सामायिक करतो, ज्यामध्ये अफगाणिस्तानात प्रातिनिधिक आणि सर्वसमावेशक सरकारची स्थापना, दहशतवाद आणि अंमली पदार्थांची तस्करी नष्ट करणे, संयुक्त राष्ट्रांची केंद्रीय भूमिका, अफगाणिस्तानच्या लोकांसाठी तात्काळ मानवतावादी सहाय्य प्रदान करणे आणि महिला, मुले आणि इतर राष्ट्रीय वांशिक गट आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण करणे या बाबी समाविष्ट आहेत.

 

महामहिम, भगिनींनो, सज्जनहो, आणि माध्यम प्रतिनिधींनो,

15. मी राष्ट्रपती श्री. सेरदार बर्दिमुहामेदोव्ह यांचे मधल्या काळात परस्परांना सोयीस्कर अशा तारखेला भारतात स्वागत करण्यास उत्सुक आहे.

16. आणि, अश्गाबातच्या या सुंदर आणि विस्मयकारक अशा "शुभ्र संगमरवरी" शहराला पाहून मी आणि माझे प्रतिनिधी मंडळ किती प्रभावित झालो हे सांगून मी निवेदनाचा समारोप करतो.

अनेकानेक धन्यवाद!

***

S.Patil/V.Joshi/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1812794) Visitor Counter : 221


Read this release in: Urdu , English , Hindi , Tamil