संरक्षण मंत्रालय

भारत फ्रान्स नौदल सराव वरुण -2022 चे 20 वे वर्ष

Posted On: 31 MAR 2022 2:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 मार्च 2022

यावर्षी 30 मार्च ते 03 एपिल 2022 या कालावधीत अरबी समुद्रात  भारतीय आणि फ्रेंच नौदलाचा 20 वा द्वैवार्षिक संयुक्त युद्ध सराव ‘वरुण-2022’ चे आयोजन करण्यात आले आहे.

भारत आणि फ्रान्स यांच्या नौदलांच्या द्वैवार्षिक संयुक्त युध्द सरावाच्या उपक्रमाची सुरुवात 1993 मध्ये करण्यात आली. वर्ष 2001 मध्ये या सरावाला वरुण असे नाव देण्यात आले आणि आता हा संयुक्त सराव भारत आणि फ्रान्स या देशांमधील धोरणात्मक द्विपक्षीय संबंधांचा अविभाज्य भाग झाला आहे.

दोन्ही देशांची जहाजे, पाणबुड्या, सागरी गस्त घालणारी विमाने, लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स यांच्यासह अनेक विभाग  या सरावामध्ये सहभागी होतील.  हे विभाग सागरी क्षेत्रात त्यांच्या परिचालनविषयक कौशल्यांना अधिक धारदार करून त्यात वाढ करण्याचा प्रयत्न करतील तसेच एकात्मिक शक्ती म्हणून कार्य करताना सागरी संरक्षण मोहिमांमध्ये परस्पर-कार्यक्षमता वाढविणे आणि या प्रदेशात शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य स्थापन करण्याप्रती त्यांची असलेली वचनबद्धता दर्शवतील.

वरुण सराव मालिकेने दोन्ही देशांच्या नौदलांना परस्परांच्या सर्वोत्कृष्ट पद्धती शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. हा सराव दोन्ही देशांच्या नौदलांदरम्यान परिचालनविषयक पातळीवर चर्चा होण्यासाठीचा मुख्य प्रेरणास्रोत ठरला आहे तसेच या सरावाने जागतिक सागरी क्षेत्रामध्ये संरक्षण, सुरक्षितता आणि खुल्या वातावरणाप्रति  दोन्ही देशांची  सामायिक प्रतिबद्धता अधोरखित केली  आहे.


S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1811878) Visitor Counter : 778