शिक्षण मंत्रालय

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आयआयटी मुंबईच्या  नवीन वसतिगृहाचे उद्घाटन केले


आयआयटीने कर्मचारी नव्हे तर नियोक्ते आणि उद्योजक घडवावेत  अशी माझी अपेक्षा आहे: केंद्रीय शिक्षण मंत्री

पुढील 50 वर्षांसाठी भारताच्या गरजा  जाणून घ्या आणि त्या पूर्ण करण्याच्या दिशेने काम  करा: शिक्षण मंत्र्यांचे  आयआयटी मुंबईच्या  विद्यार्थ्यांना आवाहन

नवीन आणि उदयोन्मुख जागतिक व्यवस्थेत भारताची प्रमुख भूमिका सुनिश्चित करण्याचे  शिक्षण मंत्र्यांनी आयआयटी मुंबईला केले आवाहन

Posted On: 27 MAR 2022 4:42PM by PIB Mumbai

 

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई संकुलात विद्यार्थ्यांसाठी 'हॉस्टेल 17' या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन केले. तसेच त्यांनी वसतिगृह परिसरातील फलकाचे अनावरण आणि वृक्षारोपण देखील केले.

 

उद्घाटनप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिक्षणाचा उत्तम अनुभव मिळावा यासाठी गुणवंत विद्यार्थीअभ्यासक्रम आणि प्राध्यापकांबरोबरच  कॅम्पसचे वातावरण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. वातावरण सकारात्मकता निर्माण करते.  जर तुम्ही सकारात्मक असाल तर तुम्हाला स्फूर्ती मिळेल. प्रत्येकामध्ये नवोन्मेष  आणि योगदान देण्याची क्षमता असते. आज आपण  आयआयटी  मुंबई  या  महान संस्था आणि संकुलात  एक नवीन  पर्व सुरु केले आहे.

नवीन वसतिगृहात 1,115 खोल्या आहेत आणि आज उद्घाटन झालेली  इमारत ही  पहिल्या संचांपैकी एक आहे जी  इमारत आयआयटी मुंबईने पूर्णपणे उच्च शिक्षण वित्त पुरवठा संस्थेच्या (HEFA) च्या निधीतून बांधली आहे. यासाठी अंदाजे 117 कोटी रुपये खर्च आला आहे.

आयआयटीमधून कर्मचारी नव्हे तर नियोक्ते आणि उद्योजक घडतील  अशी अपेक्षा प्रधान यांनी यावेळी व्यक्त केली.  आयआयटी मुंबईच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास व्यक्त करत ते  म्हणाले की, संस्थेचे प्रतिभावान विद्यार्थी  रोजगार निर्माते म्हणून उदयाला येतील, जागतिक कल्याणासाठी कार्य आणि नाविन्यपूर्ण संशोधन करतील आणि एक मजबूत, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या दिशेने देखील काम करतील.

आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या योगदानाची प्रशंसा करताना प्रधान म्हणाले की, त्यांच्या कार्याचे  उत्तम  दस्तऐवजीकरण आणि प्रसार होणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, देशातील सहा मूळ आयआयटींनी मिळून जागतिक अर्थव्यवस्थेत 300 ते 400 अब्ज डॉलर्सचे योगदान दिले आहे. आयआयटी मुंबई संस्थेतून पदवी घेऊन बाहेर पडणारा  कधीही स्वार्थी असू शकत नाही. आपले  माजी विद्यार्थी हे जगाच्या कल्याणाचा विचार करणारे आहेत. आपण आपल्या  योगदानाचे अधिक चांगले दस्तऐवजीकरण करणे आणि आपल्या  क्षमतेला उत्तेजन   देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे आयआयटी मुंबईचे बलस्थान असल्याचे नमूद करून या क्षमतेचे नव्याने ब्रॅण्डिंग करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी  व्यक्त केले.

वेगाने बदलणारे  भू-राजकीय वास्तवाचे युग आणि महामारीमुळे उद्भवलेल्या जागतिक आव्हानांमुळे आपल्यासमोर अमाप  संधी उपलब्ध झाल्या आहेत असे शिक्षण मंत्री म्हणाले.  आज आपण अनेक मोठ्या आव्हानांना सामोरे जात आहोत.  महामारी आणि चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीसारख्या परिस्थितीचा आपल्याला सामना करावा लागत आहे.  2020 पासून गेल्या  तीन वर्षांत आपण महामारीच्या तीन लाटा पाहिल्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन नवीन जागतिक व्यवस्थेत भारताला त्याचे योग्य स्थान मिळेल हे सुनिश्चित करण्यात  आयआयटी मुंबई  मोठी भूमिका बजावेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

21 वे शतक हे ज्ञानाचे युग असणार आहे आणि त्यात आयआयटी मुंबईने प्रमुख भूमिका बजावावी असे आवाहन त्यांनी केले. मला ठाम विश्वास आहे की देशात फक्त काही मोजक्या प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत ज्यांच्याकडे 21 व्या शतकातील समस्यांवरची उत्तरे आहेत आणि आयआयटी मुंबई ही त्यापैकी एक आहे असे ते म्हणाले. भारताकडे ज्ञानाची कमतरता नाही आणि भारताने वेळोवेळी हे दाखवून दिले आहे की जगातील जटिल  समस्यांवर भारताकडे उपाय आहे असे त्यांनी नमूद केले.  आयआयटीने पुढील 50 वर्षांसाठी आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वतता या क्षेत्रांसह भारताच्या गरजा जाणून घ्याव्यात  आणि त्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने काम करावे अशी सूचना त्यांनी केली.

आयआयटी मुंबईने यापुढील  दशकांमध्ये देशाच्या वाटचालीला आकार देण्यात निर्णायक भूमिका बजावावी असे  आवाहन त्यांनी केले. "जेव्हा आपण 5-10 वर्षांनंतर मागे वळून पाहू, तेव्हा आपण आत्मविश्वासाने सांगू शकू की आयआयटी मुंबईने 21 व्या शतकाला अनुरूप कामगिरी केली आणि इतिहासाला आकार देण्यात  योगदान दिले आहे."

आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शुभाशीष चौधरी यांनी प्रधान यांना संस्थेबद्द्ल विस्तृत माहिती दिली आणि संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीबाबत अवगत केले.

आपल्या भाषणात, प्रा.शुभाशीष चौधरी म्हणाले: केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या मदतीमुळे आयआयटी संस्थेची भरभराट झाली आहे आणि आमच्या माजी विद्यार्थ्यांनी  निवडलेल्या करिअरच्या विविध क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. मला विश्वास  आहे की हे अत्याधुनिक वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी परिसरातले वातावरण आणखी सुधारण्यास मदत करेल.

आयआयटी मुंबईच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. पवन गोयंका यांनी संस्थेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारकडून दिले जात असलेल्या  सहकार्याबद्दल आणि मदतीबद्दल सरकारचे  आभार मानले.

 

हॉस्टेल क्र.17 ची वैशिष्ट्ये:

a. तळमजला + 9 मजले

b. एकूण खोल्यांची संख्या: 1,115

c. नियमित खोल्यांची संख्या: 1,059

d. दिव्यांगांसाठी सिंगल रूमची  संख्या : 50

e. दिव्यांगांसाठी शौचालयासह  डबल रूमची  संख्या:  6

f. बांधकामासाठी लागलेला  वेळ: 40 महिने

 

उपलब्ध सुविधा:

      (i) व्यायामशाळा: 1

      (ii) कॉमन कॉम्प्युटर रूम: 1 .

      (iii) प्रत्येक खोलीत वायफाय आणि लॅन कनेक्शन

      (iv) म्युझिक रूम  : 1

      (v) कॉमन लौंड्री : कपडे धुणे आणि वाळवणे (40 )

      (vi) प्रथमोपचार कक्ष: 1

      (vii) स्टुडंट काऊन्सिल रूम : 1

      (viii) विद्यार्थ्यांच्या ब्रेक-आउट सत्रासाठी जागा: 72

      (ix) स्टोअर रूम: 1

      (x) प्रत्येक खोलीत अग्निशमन यंत्रणा (स्प्रिंकलर पाइपिंग) प्रदान केली आहे

      (xi) सार्वजनिक उद्घोषणा  प्रणाली (आपत्कालीन  स्थितीसाठी )

      (xii) सीसीटीव्ही प्रणाली

 

या उद्घाटन कार्यक्रमाला  प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसह 200 हून अधिक लोक उपस्थित होते.

हा कार्यक्रम : https://youtu.be/-UOg6Z2qnCc या लिंकवर पाहता येईल.

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1810243) Visitor Counter : 319


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil